आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांकडून ज्येष्ठांचा आदर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक आनंद पाटील हे साईभक्त आहेत. मुंबईला असताना कित्येकदा ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनास येत होते. वैजापूरला बदली झाल्यानंतरही साईंच्या दर्शनाला जात. वैजापूरला साई सेवाभावी संस्था आणि साई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून साईबाबा सच्चरित्र पारायण आणि साईकथामृत सोहळा आयोजित करण्यात येतो. या दिवशी मी स्वत: साईबाबांसारखा पेहराव करून साईबाबांची भूमिका पार पाडतो. तेही चार वर्षांपासून या सोहळ्यास उपस्थित राहत असल्याने त्यांची व माझी चांगली गट्टी जमली. गेल्या डिसेंबर महिन्यात सासू-सुनेच्या भांडणावरून वैजापूर पोलिसांनी येवल्याहून एका ऐंशी वर्षीय सासूला वैजापूरला पोलिस स्टेशनमध्ये आणले.

सून वैजापूरला असल्याने तिने वैजापूरला साधी केस दाखल केली होती. या प्रकरणाबाबत मला माहिती झाले. मी आनंद पाटील यांना फोन केला, ‘साहेब, ती म्हातारी ऐंशी वर्षांची आहे. खूप वयोवृद्ध आहे. आपण सासू-सुनेत समेट घडवून आणू या.’ त्यांनी मला लगेच पोलिस स्टेशनला बोलावले. सासूबार्इंची तब्येत खराब होती. ती थरथरत होती. तिच्यासोबत तिच्या तीन विवाहित मुली व मुलगाही होता. त्या वृद्ध सासूबार्इंची तब्येत पाहून पाटील यांनी प्रकरण अत्यंत संयम आणि सामजस्याने व माणुसकीच्या नात्याने हाताळून समेट घडवून आणला. एवढेच नव्हे तर त्या वृद्ध सासूबाईचे दर्शन घेऊन पोलिस स्टेशनला आणल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. एका पोलिस अधिका-यांच्या मनस्वी मोकळ्या स्वभावाचे दर्शन घडले. पोलिसांबद्दल अनेकदा विपरीत कहाण्याच छापून येतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही, पण पोलिसांमध्ये माणुसकी असते. वृद्धांबद्दल आदर असतो. ते त्या वृद्धांना आपल्या आई-वडिलांच्या रूपात पाहत असतात. त्यामुळे सहानुभूती निर्माण होतेच. पोलिस दलात हवालदारांपासून मोठ्या पदावरील व्यक्तीमध्येही वृद्धांबद्दल आदराची भावना असते.