आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तो दंडाच्या रकमेसाठी मित्राला विनवत राहिला, पोलिस मात्र हसण्यात व्यग्र, वाहतूक पोलिसांच्या 'दंडवसुली'ने घेतला कारचालकाचा बळी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाहतूक पोलिसांच्या दंडवसुलीच्या नादात एका नागरिकाला हृदयविकाराच्या धक्क्याने जीव गमवावा लागला आहे. सीट बेल्ट लावला नसल्याने पकडलेला कारचालक पाेलिसांसमोर छातीत कळा आल्याने कण्हत होता. एटीएमपर्यंत जाऊ देण्याची विनवणी करत हाेता. पण दंडवसुलीवर ठाम असणारे पाेलिस हसत होते. त्यांनी पैशासाठी एकाला बोलावले. त्रास वाढल्याने पाेलिसांनी त्यास रुग्णालयात दाखल केले. मित्र पाेहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. हिंदी भाषिक असल्यानेच पोलिस अशा पद्धतीने वागल्याचा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. दिव्य मराठीकडे असणाऱ्या कॉल रेकॉर्डिंगमधून पोलिसांची अरेरावी स्पष्ट झाली आहे. 

 

उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील सिसवा येथील ३९ वर्षाय बाबूराम रामदास चौधरी जयभवानीनगरात पत्नी, मुलांसह राहतात. ३१ जानेवारी रोजी कारने सिडको बसस्टँडहून मुकूंदवाडीकडे जात असतांना संध्याकाळी ५ च्या सुमारास एपीआय कॉर्नरजवळ त्यांना सीट बेल्ट लावला नसल्याने वाहतूक पोलिसांनी अडवले. कार एसटी वर्कशॉपजवळील वाहने जमा करण्याच्या तळावर नेली. येथे त्यांना ऱ्हदयविकाराचा धक्का आला. पोलिसांनी आधी धूत हॉस्पीटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त एच.एस. भापकर यांनी दिली. 

 

पैसे होते तरीही 
माेटार वाहन कायद्याच्या कलम १७७ नुसार सीटबेल्ट लावला नसल्यास २०० रूपयांचा दंड लागतो. बाबूराम चौधरी यांच्या खिशात ३५०० रूपये होते. तरी ते मित्राला फोन करून एटीएममधून पैसे आणण्यास सांगतांनाचे कॉलमध्ये आले आहे. यामुळे पोलिस त्यांना वेगळ्याच प्रकरणात पैसे मागत असावेत. याचाच ताण आल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

 

तासभर सुरू होती पोलिसांची अरेरावी 
ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने चौधरी यांचा मृत्यु झाल्याचे पोलिस सांगतात. नातेवाईकांनाही असेच वाटत होते. मात्र, मृताच्या नातेवाईकाकडे असणाऱ्या एका ऑडीओ क्लिपमुळे पोलिसांच्या दाव्याचे बिंग फुटले आहे. गाडी वाहन तळावर नेल्यानंतर पोलिसांची अरेरावी, अर्वाच्च्य भाषेतील शिवीगाळ व दादागिरी सुरू होती. दिव्य मराठीकडे असणाऱ्या या क्लिपमध्ये पोलिस आणि चौधरी यांच्यातील संवाद स्पष्ट होतो. यातच ऱ्हदयावर ताण येऊन त्यांचा जीव गेल्याची शक्यता आहे. 

 

मृत बाबूराम चौधरी 
छातीत दुखत असल्याचे कारचालक सांगत राहिला... तोवर खूप उशीर झाला दैनिक दिव्य मराठीच्या हातात आलेल्या ऑडिओ क्लिप्समधील संभाषण संतापजनक आहे 


- 17 सेेकंद 
क्लिपमध्ये बाबूराम चौधरी त्यांच्या मामाशी संवाद साधतात. त्रस्त होेऊन मामांना जाण्यासाठी सांगताना ते दोन वेळेस तीव्रतेने कण्हतात... 
- 36 सेेकंद 
क्लिपमध्ये चौधरी व पोलिस यांच्यातील शाब्दिक खडाजंगी ऐकू येते. चौधरी पैसे भरण्याची तयारी दर्शवतात. मात्र, आमच्या नोकऱ्या घालवणार का, असा सवाल पाेलिस विचारतात. चौधरी यांना एटीएममधून पैसे काढायचे होते. यासाठी तिथपर्यंत गाडीने जायचे होते. एक पोलिस त्यांना अडवतो. दुसरा जाण्याची परवानगी देताना एेकायला येते. भाषा मात्र अरे-तुरेचीच आहे. यातही चौधरी यांच्या कण्हण्याचा आवाज येतोय. 
- 1:21 सेेकंद 
क्लिपमध्ये पोलिसांचा अत्यंत खालच्या भाषेतील संवाद आहे. बाबूराम चौधरी त्यांचा मित्र रमेश चौधरी यांना फोन करून अडचणीत सापडल्याचे सांगतात. ते म्हणतात, गाडी पकडल्याने उड्डाणपुलाच्या बाजूच्या ठाण्यात आलोय. (कण्हण्याचा आवाज ) लवकर ये. अपघात नाही झालाय. एटीएममधून पैसे काढून दंड भरायचा आहे. हे लोक येऊ देत नाहीत. (जोरात कण्हण्याचा आवाज) तू लवकर ये. पावती फाडायची आहे. पैसे कमी आहेत. पैसे काढून आण लवकर. (कण्हण्याचा आवाज) चौधरी यांचा हा कॉल सुरू असताना पोलिस मागे हसतानाचा आवाज येतोय. 

 

चौकशी करून दोषींवर कारवाई 
चौैधरी यांच्या मृत्यूबाबतची तक्रार आली आहे. डीजी ऑफिसमध्ये असल्याने चौकशी करता नाही आली. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करू. ऑडिओ क्लिप्स अजून मिळाल्या नाहीत. -दीपाली घाटगे, पोलिस उपायुक्त 

 

ऑडिओ क्लिप्स पुरेशा बोलक्या 
पोलिस नेहमीच हिंदी भाषिकांना त्रास देतात. चौधरी यांच्या छातीत वेदना होत असताना पोलिस हसत होते. असा कोणता दंड होता की त्यांना एटीएममध्ये जाण्याची गरज भासली. पावती देऊन त्यांना सोडायला हवे होते. पोलिसांची अरेरावी सिद्ध करण्यासाठी क्लिप्स बोलक्या आहेत. -रवी चौधरी, तक्रारदार 
 

बातम्या आणखी आहेत...