आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही फुटेजमुळे ११ महिन्यांनी सापडले पोलिसाचे गहाळ पिस्तूल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मागील ११ महिन्यांपासून शहर पोलिसांनी ज्याला शोधण्यासाठी दिवसरात्र एक केले तो चोरटा अखेर बालाजीनगरमध्ये सापडला. पोलिस कर्मचाऱ्याचे हरवलेले पिस्तूल घेऊन तो रोज शहरात राजरोसपणे फिरत होता. गुन्हे शाखेने एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज व हातावर गोंदवलेल्या चाेरट्याचा बारकाईने तपास करत त्याला ७ डिसेंबर रोजी अटक केली. अजय जितेंद्र कांडे (१९, रा. भीमनगर, गेवराई. ह. मु. गल्ली नं. २, बालाजीनगर) असे त्याचे नाव आहे. 
७ जानेवारी २०१८ रोजी अमित शिवानंद स्वामी या पोलिस कर्मचाऱ्याचे ९ एमएम बोरचे पिस्तूल आकाशवाणी चौकात अपघातादरम्यान गहाळ झाले होते. तेव्हापासून पोलिस पिस्तूलचा शोध घेत होते. याचदरम्यान ५ एप्रिल २०१८ रोजी सेव्हन हिल्स चौकातील एसबीआयचे एटीएम फोडण्यासाठी दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्या गोळ्यादेखील याच पिस्तूलमधून झाडल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्यामुळे या चोरीचे गांभीर्य अधिकच वाढले होते. पिस्तूलसोबत दहा जिवंत काडतुसे होती. त्यापैकी दोन काडतुसे वापरली गेली तरी आठ शिल्लक होती. त्यामुळे हे पिस्तूल सराईत गुन्हेगाराच्या हाती लागल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांवर तपासाचा ताण वाढला होता. अखेर गुन्हे शाखेने केलेल्या तपासामुळे अकरा महिन्यांनी हा चोरटा सापडला. सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ, संतोष सोनवणे, बापूराव बाविस्कर, लालखान पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, रितेश जाधव, विजयानंद गवळी, संजीवनी शिंदे, अनिल थोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


सीसीटीव्ही फुटेजमुळे मिळाला पहिला पुरावा : पोलिस कर्मचारी स्वामी याच्याकडून बंदूक गहाळ झाल्यानंतर एकही पुरावा पोलिसांना सापडला नव्हता. मात्र अजयने एटीएमवर गोळीबार केला तेव्हा तोंडाला रुमाल बांधलेले सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. मात्र याद्वारे त्याची ओळख पटत नव्हती. फक्त त्याच्या दोन्ही हाताच्या मनगटावर गोंदलेले होते. एका हातावर लव्ह लिहिलेले स्पष्ट दिसत होते. याचाच आधार घेत गुन्हे शाखेने दोन्ही हातावर गोंदवलेल्या गुन्हेगाराला शोधत आहेत. 


अजय पिस्तूलसह सीसीटीव्हीत कैद झाला होता. 

स्वामी आकाशवाणी चौकातून रिक्षातून येत होता. तेव्हा त्याने मद्यपान केल्याचे तपासात समोर आले होते. ज्या वेळी रिक्षा पलटी झाली त्यावेळी योगायोगाने अजय त्या ठिकाणी होता. स्वामीचे रस्त्यावर पडलेले पिस्तूल त्याने पाहिले आणि ते घेऊन पळ काढला. तेव्हापासून पिस्तूल त्याच्याकडे होते. तो शहरभर घेऊन फिरायचा. 


जवाहरनगर ठाण्यात घरफोडीचा गुन्हा 
जवाहरनगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय गेवराई येथे त्याने चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. चोरी करून मिळालेले पैसे तो मैत्रिणीवर खर्च करत असे. 

बातम्या आणखी आहेत...