Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Police shouted on Minister Gulabrao Patil

रिक्षाचालकांवर कारवाई करणाऱ्या पाेलिसाकडून मंत्री गुलाबराव पाटलांनाही गैरसमजातून अरेरावी

प्रतिनिधी | Update - Dec 09, 2018, 09:39 AM IST

खाकी अन‌् खादीत ठिणगी : पाेलिस निरीक्षक म्हणाले, विसंवादातून घडला प्रकार

 • Police shouted on Minister Gulabrao Patil

  जळगाव - बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना एका रिक्षाचालकाने थेट मंत्री गुलाबराव पाटील यांना फोन केला. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याकडे मोबाइल दिला असता त्याने गैरसमजातून अरेरावी केली. याचा राग आल्यानंतर पाटील यांनी थेट शनिपेठ पोलिस ठाण्यात येऊन कर्मचाऱ्यांना दम भरला. शनिवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

  शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पोलिस पथक बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करीत होते. या वेळी एका रिक्षाचालकाने कारवाई टाळण्यासाठी थेट सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना फोन केला. पोलिस कर्मचाऱ्याकडे फोन देऊन मंत्री पाटील यांच्याशी बोलण्यास सांगितले. गडबडीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने गैरसमजातून फोनवर थेट मंत्र्यांशी अरेरावी केली. यानंतर १० मिनिटांत मंत्री पाटील हे ताफ्यासह शनिपेठ पोलिस ठाण्यात पोहाेचले. पाेलिस ठाण्यात अधिकारी नव्हते. पाटील यांनी रागाच्या भरात पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलाच दम भरला. सट्टा, पत्ता, अवैध दारू सारख्या माफियांवर कारवाई न करता रिक्षाचालकांना का वेठीस धरता? असा प्रश्न विचारत त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना शिव्या हासडल्या. काही कर्मचाऱ्यांनी मंत्री पाटील यांची समजूत काढून शांत केेले.


  गैरसमजातून हा प्रकार घडला असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, सुमारे १० मिनिटे दम भरल्यानंतर मंत्री पाटील पोलिस ठाण्यातून निघून गेले. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात गर्दी झाली हाेती. या विषयाच्या संदर्भात जिल्हा पाेलिस अधीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशिरापर्यंत हाेऊ शकला नाही.

  माेबाइलवरील संवादातून गैरसमज

  मंत्री पाटील यांच्या ऐवजी कोणी दुसरीच व्यक्ती फोनवर बोलत असल्याचा गैरसमज पोलिस कर्मचाऱ्याचा झाला होता. त्यामुळे विसंवाद होऊन हा प्रकार घडला आहे. मंत्री पाटील यांची समजूत काढली विठ्ठल ससे, पोलिस निरीक्षक, शनिपेठ पोलिस ठाणे

  रिक्षाचालकाच्या मदतीसाठी गेलो हाेताे
  पोलिस कारवाई करीत असल्यामुळे अन्याय होत असल्याच्या भावनेतून रिक्षाचालकाने मदतीसाठी फोन केला. त्याच्या मदतीसाठी मी पोलिस ठाण्यात गेलो होतो. कुणावर अन्याय हाेऊ नये? ही भूमिका हाेती. गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री, महराष्ट्र राज्य कारवाई हाेऊ नये म्हणून वापरले जाते बड्या पुढाऱ्यांचे नाव अवैध धंद्यांसह बेशिस्त वाहनचालक, रिक्षाचालक हे पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी नेहमीच राजकीय पुढाऱ्यांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. शनिवारी रिक्षाचालकाने मंत्री गुलाबराव पाटील यांना फोन करून कारवाई टाळली. दरम्यान, अनेकवेळा मंत्री, राजकीय व्यक्तींच्या नावाने बनावट लोकांशी बोलणे करूनही कारवाई टाळण्याचा प्रयत्न हाेतो. त्यामुळे संबंधित रिक्षाचालकाने मंत्री पाटील यांच्याऐवजी कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीला फोन केला असल्याचा समज पोलिस कर्मचाऱ्याचा झाला होता. त्यातून विसंवाद झाला अाणि शनिवारचा हा प्रकार घडला.

Trending