आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसपुत्राने चाकूचा धाक दाखवत केली कारची चोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पंचवटी- सराईत गुन्हेगार असलेल्या पोलिसपुत्राने चाकूचा धाक दाखवत स्विफ्ट कार चाेरून नेली. रविवारी (दि. २३) रात्री १०.३० वाजता श्रीराम सोसायटी, दिंडोरीरोड येथे हा धाडसी प्रकार घडला. म्हसरूळ पोलिसांनी तीन तासांत संशयिताला दिंडोरीरोडवर अटक केली. अंधाराचा फायदा घेत त्याचे दोन साथीदार मात्र फरार झाले. म्हसरूळ पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती आणि दिनेश देशमुख (रा. चोपडा, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री श्रीराम सोसायटी, दिंडोरीरोड येथे स्विफ्ट कार (एमएच १९ सीएफ १४३१ उभी करून मामाच्या मुलांसोबत गप्पा मारत उभे असताना तीन संशयित ज‌वळ आले. यातील एकाने चाकूचा धाक दाखवत देशमुख यांना धक्काबुक्की करत बळजबरीने चावी काढून घेतली. कारसह तिघांनी पोबारा केला. देशमुख यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. काही वेळात म्हसरूळ पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधपथक घटनास्थळी दाखल झाले. संशयितांचे वर्णन आणि गुन्हा करण्याची पद्धत सराईत गुन्हेगार प्रवीण गणपत काकड याच्यासारखीच असल्याने त्याचा शोध सुरू केली. तीन तासांच्या सर्च कारवाईनंतर संशयित दिंडोरीरोडवर निर्जनस्थळी गाडी उभी करून मद्य पित असल्याची माहिती मिळाली.

 

पथकाने तत्काळ संशयितांचा माग काढत काकडच्या मुसक्या आवळल्या. अंधाराचा फायदा घेत त्याचे दोन साथीदार मात्र फरार झाले. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले, एस. एल. भडीकर, विश्वास बागूल, सोमनाथ शार्दुल, प्रशांत वालझाडे, गणेश रेहरे, दिनेश गुंबाडे, योगेश शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांवर यापूर्वी गोळीबार, लुटमार, प्राणघातक हल्ला, खुनाच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. संशयिताचे वडील परिमंडळ २ मधील एका पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, मुलाच्या गुन्हेगारी कारवाईमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले असल्याची माहिती सहकारी कर्मचाऱ्यांनी दिली. 
 

बातम्या आणखी आहेत...