आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचारी ललितच्या लिंगबदल शस्त्रक्रियेला एक वर्ष पूर्ण; केक कापून केला वाढदिवस साजरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - ‘स्वत:च्या पुरुषी असण्याबद्दल माहिती इतरांना झाल्यावर सुरुवातीला हसलेले लोकच नंतर पाठिंबा व धीर द्यायला पुढे आले.  लिंगबदल शस्त्रक्रिये दरम्यानचा काळ विसरायला लावत मी जणू काही जन्मत: पुरुष होतो अशा पद्धतीने सर्वजण माझ्याशी वागतात. ललिताची ललितकुमार झाल्यानंतर त्यांनी इतक्या सहजतेने मला स्वीकारलं की या लिंग बदलानंतरचं वर्ष कसं सरलं हेही कळलं नाही’ हे उद्गार आहेत  माजलगावचे पोलिस कर्मचारी ललितकुमार साळवे यांचे. २५ मे रोजी त्यांच्या लिंगबदल शस्त्रक्रियेला एक वर्ष झाले अन् भावाचा बर्थ डे मित्रांनीही जल्लोषात केक कापून साजरा केला. 


माजलगावमधील राजापूरच्या ललिता साळवे २०१० मध्ये जिल्हा पोलिस दलात महिला पोलिस शिपाई म्हणून भरती झाल्या. पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य दाखवून त्यांनी अनेक पदके मिळवली. मात्र, शरीरातील बदलांमुळे त्यांनी २०१७ मध्ये पोलिस दलाकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी मागितली अन् त्या देशपातळीवर चर्चेत आल्या. वर्षभर प्रचंड पाठपुरावा, अनेक तपासण्या, नोकरी वाचवून लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत धाव आणि या दरम्यान समाजाकडून सुरुवातीला हेटाळणी नंतर मिळालेला पाठिंबा अशा सर्व प्रकारच्या परिस्थितीतून जात अखेर २५ मे २०१८ रोजी लिंगबदल शस्त्रक्रिया झाली आणि ललिता साळवेची ललितकुमार साळवे असा नवा जन्म झाला. सप्टेंबर २०१७ ते मे २०१८ या हे नऊ महिने संघर्षाच्या कळा सोसल्यानंतर पुरुषाचा नवा जन्म मिळालेल्या ललितकुमार साळवे अवघ्या वर्षभराच्या काळात आता चांगलाच रुळला आहे. 


केवळ स्वत:त बदलाची सवय नाही तर समाजालाही ललिताच्या ललित होण्याचा अगदी सहज स्वीकार केला असून त्याचा मोठा मित्र परिवार या वर्षभराच्या काळात तयार झाला आहे. पूर्वी मैत्रिणीत रमणारा ललित आता मित्रांसोबत दुचाकीवरून फिरताना माजलगाव शहरात दिसतो. शनिवारी या लिंगबदल शस्त्रक्रियेला एक वर्ष पूर्ण झालं. ललितकुमारचा हा पहिला वाढदिवस मित्रांनीही जल्लोषात साजरा केला. ललित म्हणतात, तशी माझी जन्मतारीख २१ जून पण ललितकुमार झाल्याचा हा पहिला वाढदिवस. त्यामुळे माजलगाव, राजापूर, किट्टी आडगावच्या मित्रांनी केक कापला.