आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंटेनरच्या धडकेत एका पोलिस कर्मचाऱ्यासह गृहरक्षक दलाचा जवान ठार; एक गंभीर जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येडशी - उस्मानाबाद तालुक्यातील सोलापूर-धूळे राष्ट्रीय महामार्गावर येडशी गावाजवळील उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या तंबूत कंटेनर शिरल्याने कंटेनरच्या धडकेत एक  पोलिस कर्मचारी व होमगार्ड जवानाचा जागीच मृत्यू झाला तर एक पोलिस गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. जखमी कर्मचाऱ्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.

नवरात्रोत्सावामुळे येडशी उड्डाणपुलाखालून वळण व्यवस्था करण्यात आली होती. २१ सप्टेंबर रोजी दै ‘दिव्य मराठी’ने चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे एका मार्गाने वाहतूक व्यवस्था व एका मार्गाने भाविकांची व्यवस्था करण्यात यावी, असे वृत्त प्रकाशित केले होते. मात्र, प्रशासनाने वळण व्यवस्था न केल्यामुळे गुरुवारी पोलिस प्रशासनातील दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. ग्रामीण पोलिसांनी महामार्गावरील येडशी उड्डाणपुलाजवळ तात्पुरता चेक नाका उभारला आहे. हा तंबू सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला होता. पहाटेच्या सुमारास औरंगाबादकडून -उस्मानाबादकडे जाणारा भरधाव कंटेनर (क्र. एन. एल. ०१ एए ००२७) बॅरिकेड्स तोडून रस्त्याच्या शेजारी असलेल्या तंबूत घुसला. त्या वेळी तंबूत असलेले पोलिस कर्मचारी दीपक दिलीप नाईकवाडी (रा तुळजापूर), होमगार्ड संतोष व्यंकट जोशी (रा कळंब) यांचा जागीच मृत्यू झाला तर वसंत गंगाधर गाडे (रा. कळंब) हे गंभीर जखमी झाले.  जखमी गाडे यांना सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. कर्तव्यावर असताना दोन तरुण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कंटेनर चालक अपघातानंतर फरार झाला होता. परंतु, उस्मानाबादजवळ ग्रामीण पोलिसांनी त्यास अटक केली. घटनेची माहिती मिळताच उस्मानाबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, महामार्ग पोलिस निरीक्षक जयंत गादेकर, उपनिरीक्षक राजेंद्र बोरोटीकर, हेड कॉन्स्टेबल बालाजी गिरी, पोलिस नाईक दयाशंकर कंकाळ, पोलिस नाईक जगन्नाथ गुंड, पोलिस नाईक मधुकर शेवाळे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

नाईकवाडींवर मोतीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
नाईकवाडी यांच्या मृत्यूमुळे तुळजापूर शहरात शोककळा पसरली. शहरातील मोतीझरा स्मशानभूमीत दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी श्रध्दांजली वाहिली. पोलिस खात्याच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पोलिस नाईक पदावर असलेल्या दीपक यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सेवानिवृत्त धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होत.

बातम्या आणखी आहेत...