आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, ठाणे, कोकणात युतीची एकी; कणकवलीत बेकी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1) खारघरमध्ये पंतप्रधान माेदींच्या प्रचार सभेत सहभागी भाजपचे उत्साही कार्यकर्ते. 2) काँग्रेसच्या प्रचाराची धुरा आता मुंबईचे अध्यक्ष एकनाथ गायकवाडांवरच आहे. - Divya Marathi
1) खारघरमध्ये पंतप्रधान माेदींच्या प्रचार सभेत सहभागी भाजपचे उत्साही कार्यकर्ते. 2) काँग्रेसच्या प्रचाराची धुरा आता मुंबईचे अध्यक्ष एकनाथ गायकवाडांवरच आहे.

चंद्रकांत शिंदे  

मुंबई- ठाणे-कोकण हा विधानसभेचे ७५ मतदार संघ असलेला पट्टा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१४ च्या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले तेव्हा कोकणात तर गेल्या वेळी भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र गेल्या पाच वर्षांत भाजपने कोकणातही आपली ताकद वाढवली आहे. आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सोबत घेतल्याने या वेळी कोकणात भाजप खाते उघडण्याची आशा निर्माण झाली आहे. परंतु युती असली तरी भाजप उमेदवार नितेश राणे यांना शिवसेनेने कणकवलीत विरोध केलेला असल्याने या ठिकाणी काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. नारायण राणे यांच्यासाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ची स्थिती आहे. कोणत्याही परिस्थितीत नितेशला विधानसभेत पाठवायचेच असा प्रण त्यांनी केलेला असून त्यादृष्टीने साम, दाम, दंड, भेद अशा सर्व प्रकारांचा अवलंब केला जात आहे. त्यासाठीच त्यांनी आपला ‘स्वाभिमान’ भाजपमध्ये गुंडाळूनही ठेवला आहे.

२०१४ मध्ये वेगळे लढलेल्या शिवसेना आणि भाजपने यावेळी युती केली असली तरी अनेक ठिकाणी दाेन्ही पक्षांना बंडखाेरीला सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे २०१४ ला मिळालेल्या जागा कायम राखण्याचे दोन्ही पक्षांसमोर आव्हान असेल. ‘मातोश्री’च्या अंगणातच म्हणजे वांद्रे पूर्व येथून मावळत्या आमदार तृप्ती सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकवत शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना आव्हान दिले आहे. दुसरीकडे अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेच्या रमेश लटके यांना भाजपचे नगरसेवक मूरजी पटेल यांनी आव्हान दिले आहे. या दोन्ही बंडखोरांना शांत करण्यात वा त्यांच्यावर कारवाई करण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना अपयश आलेले आहे.

विधानसभेच्या गेल्या चार निवडणुकांमध्ये दोन मोठ्या नेत्यांनी आपल्या मूळ पक्षातून फारकत घेत नवीन पक्ष स्थापन केला. त्यापैकी शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीने सलग तीन टर्म सत्तेपर्यंत मजल मारली. तर राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मनसेची ताकदच संपुष्टात आली आहे. आता त्यांनी कमीत कमीत विरोधी पक्षनेते पद तरी द्या अशी मागणी मतदारांकडे सुरु केली आहे. मुंबई, ठाण्यात काँग्रेसची कधी काळी ताकद होती परंतु त्यांचे नेतेच आता मनातून खचले आहेत. संजय निरुपम यांनी पक्षाचा राजीनामा दिला नसला तरी पक्षविरोधी कारवाया सुरु असून काँग्रेसचा प्रचार न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजप उमेदवारांचा प्रचार सुरू केला आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे कसा फायदा होत आहे त्यावर ते भाषण देत भाजप उमेदवारासाेबत फिरत आहेत. त्यामुळे काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीच्याच विजयी उमेदवारांच्या संख्येत गेल्या वेळेपेक्षा नक्कीच वाढ होईल, असा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी १४३ जागांवर उमेदवार उभे केले होते तेव्हा मुंंबई, ठाण्यात शिवसेनेला मोठा फटका बसला होता. मुंबईच्या सहाच्या सहा जागा शिवसेना मनसेसमोर हरली. मुंबईच्या ३६ जागांपैकी काँग्रेसने १७, राष्ट्रवादी ३ अशा एकूण २० जागांवर विजय मिळवला तर शिवसेनेने ४ आणि भाजपने पाच अशा एकूण ९ जागांवर विजय मिळवला होता. ठाणे जिल्ह्यातील २४ जागांपैकी शिवसेना- भाजप युतीने १०, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ६, मनसे २, समाजवादी पक्ष, बहुजन आघाडीने  दोन जागांवर तर सीपीएम आणि अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला होता. मनसे व समाजवादी पक्षाने जिल्हयात प्रथमच खाते उघडले होते. या निवडणुकीत काँग्रेसला ठाण्यात अपयश आले. कोकणात शेकाप ३, राष्ट्रवादी ५, काँग्रेस २, शिवसेना ४, भाजपा १ अशा जागा जिंकल्या होत्या. एकूणच मुंबईसह कोकणातील ७५ पैकी ३३ जागा काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी, मनसे ८ आणि शिवसेना, भाजपला फक्त १४ जागा मिळाल्या होत्या. मनसेला कल्याण ग्रामीण व कल्याण पश्चिम अशा दोन जागा तर समाजवादी पक्षाला भिवंडीतील दोन्ही जागा मिळाल्या. हितेंद्र ठाकूर यांच्या विकास आघाडीला दोन, कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड यांच्या रुपाने एक अपक्ष तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एक जागा मिळाली होती.

२०१४ मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. परंतु एक पक्ष सर्व २८८ जागांवर उमेदवार देऊ शकला नाही. उमेदवारी मिळत आहे हे पाहून अनेक पक्षांच्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात जाणे सुरु केले होते. स्वबळावर लढत असतानाही मोदी लाटेत या तीन जिल्ह्यात शिवसेनेने २७ जागांवर विजय मिळवला. भाजपने मोदी लाट आणि आघाडी सरकारच्या विरोधात असलेल्या जनमताचा फायदा घेत २५ जागा जिंकल्या होत्या काँग्रेसला फक्त सहा तर राष्ट्रवादीने आठ जागांवर विजय प्राप्त केला होता. मनसेला या तीन जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नव्हती.
 

पक्षांतराचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फटका
आता काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते आणि आमदारांनी भाजप आणि शिवसेनेची वाट धरल्याने या दोन्ही पक्षांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच मनसे महाआघाडीसाेबत जाईल असे वाटत असताना काँग्रेसने विरोध केल्यामुळे मनसेला आघाडीत जाता आले नाही. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर शिवसेनेत तर  वडाळ्यातील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते गणेश नाईक, त्यांचा मुलगा संदीप नाईक हे भाजपमध्ये आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व या मतदारसंघातील विद्यमान आमदार गणपत गायकवाड हे आता भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील डोंबिवली, कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या तीनही मतदारसंघावर भाजपची ताकद वाढली आहे.
 

वरळी मतदारसंघाकडे सगळ्यांचेच लक्ष
राजकारणाच्या इतिहासात ठाकरे कुटुंबियांपैकी आजवर कोणीही निवडणूक लढवली नव्हती. मातोश्रीवर बसून रिमोट कंट्रोलद्वारे सरकारवर वचक ठेवण्याचाच निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर पडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी सुरक्षित असा वरळी मतदार संघ निवडला. या मतदारसंघात १५ पेक्षा जास्त उमेदवार मैदानात असले तरी त्यांच्यापुढे कडवे आव्हान उभे करणारा एकही उमेदवार नाही. त्यामुळे ते विक्रमी मताधिक्याने निवडून येणार यात शंका नसल्याचे राजकीय धुरिणांना वाटते.
 

वंचित बहुजन आघाडीचा  दाेन्ही काँग्रेसला धसक
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीतही उडी घेतली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही त्यांच्या उमेदवारांचा मोठा फटका काँग्रेस- राष्ट्रवादीलाच बसू शकताे. अॅड. आंबेडकर यांनी काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न केला परंतु जागा वाटपावरून त्यांचे बिनसले. एमआयएमशीही त्यांचे बिनसले. असे असले तरी अॅड. आंबेडकर यांच्यामागे मोठा मतदार असल्याने त्यांचे उमेदवार निवडून आले नाहीत तरी ते काँग्रेस- राष्ट्रवादीचे नुकसान करू शकतात.
 

मनसेची लाेकप्रियता घटली
२००९ मध्ये मनसेची स्थापना करून राज ठाकरे यांनी शिवसेनेसमोर आव्हान उभे केले होते. परंतु सहा वर्षातच त्यांची जादू ओसरली आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप वेगळे लढले असतानाही त्यांना खाते उघडता आले नव्हते. यावेळी शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची महायुती असल्याने पुन्हा एकदा मुंबई- ठाणे- कोकणावर त्यांचाच वरचष्मा राहाणार आहे. राज ठाकरे यांनी आता सत्ता नको तर विरोधी पक्षनेते पद द्या अशी मागणी मतदारांकडे केली असली तरी मनसे यावेळी या पट्ट्यात खाते उघडेल का असा प्रश्न पडला आहे.

२०१४ चे निकाल

कूण जागा : ७५
शिवसेना : २७
भाजप : २५
राष्ट्रवादी : ०८
काँग्रेस : ०६

महत्त्वाचे नेते व मतदारसंघ
कणकवली :  नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत 
मुंब्रा कळवा : जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद
वरळी : आदित्य ठाकरे विरुद्ध सुरेश माने
वांद्रे पश्चिम : आशिष शेलार विरुद्ध आसिफ झकेरिया
मलबार हिल : मंगलप्रभात लोढा विरुद्ध हिरा देवासी
 

२०१४ : सर्वाधिक मताधिक्य ७९,२६७ विनोद तावडे, भाजप, बोरिवली

सर्वात कमी मताधिक्य ७७ : अवधूत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस- श्रीवर्धन

बातम्या आणखी आहेत...