आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - माजी राष्ट्रपती व ख्यातनाम शास्त्रज्ञ डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टाेबर हा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जाताे. यानिमित्ताने महाराष्ट्रभर अनेक उपक्रम राबवून वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक राजकारण्यांनाही वाचनाची आवड असते, किंबहुना वाचनातून मिळणाऱ्या ज्ञानातूनच त्यांची वक्तृत्व कला विकसित हाेत असल्याचे मानले जाते. सध्या राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या लगीनघाईतही राज्यातील प्रमुख नेते वेळ काढून वाचनाची आवड जाेपासत आहेत.
किती बिझी असलाे तरी प्रवासात वाचन करतो
काँग्रेसचे ज्येष्ठ नेेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणतात, ‘वाचनाची आवड तर लहानपणापासूनच. नाटकांचे वेडही तितकेच. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत नाटकांमध्ये कामही केले. परिस्थितीने धक्के खात खात राजकारणात प्रवेश केला. पण वाचन काही सुटले नाही. अत्रे, पुलं, जीएंच्या कादंबऱ्यांनी वेडच लावले हाेते. वेळ मिळेल तिथे पुस्तक उघडायचं. प्रवासातला वेळ तर पुस्तके वाचनातच जाताे, त्यामुळे थकवा जाणवत नाही. साहित्य वाचनाने मला नेहमीच ऊर्मी दिलेली आहे. ताजे केलेले आहे. लढ म्हणण्याची ताकद दिलेली आहे.
निवडणुकीत इतर वाचन बंद, मात्र वृत्तपत्रे वाचताे
राष्ट्रवादीचे नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी म्हणतात, ‘हातात येईल ते पुस्तक, पेपर, मासिक मी वाचत असतो. प्रामुख्याने हिंदी, इंग्रजीचेही वाचन करताे, मात्र प्राधान्य मराठीला असते. अत्रे, फडके यांच्यासह अनेक लेखकांची पुस्तके वाचली. कादंबरी आवडते. वाचन व्यक्तिमत्त्वाला दिशा देते. मनोरंजन, प्रबोधनही होते. व्यक्तिमत्त्व संपन्न होते. टीव्ही आल्यापासून वाचन कमी झाले, हे काही प्रमाणात सत्य आहे. निवडणूक काळात इतर वाचन बंद असले तरी राजकीय लोक काय बोलतात हे वृत्तपत्रातून आवर्जून वाचताे. वाचनासोबत चिंतनदेखील करत असताे.
राेज वाचनासाठी वेळ काढताेच
काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार म्हणालेे, ‘रेल्वे, विमान प्रवासात मिळेल ते पुस्तक वाचन करत असताे. परंतु कार प्रवासात रस्ते अनेक ठिकाणी खराब असल्याने वाचन करताना अडथळे येतात. राजकीय धकाधकीच्या जीवनात कितीही गडबड असली तरी बहुतांशी दरराेज रात्री जेवण झाल्यानंतर एक ते दीड तास वाचन करत असताेच. बाळासाहेब भारदे, नामदेव ढसाळ, साने गुरुजी, रावसाहेब कसबे, ना. धाें. महानाेर यांचे वाङ्मय आवडते. जुने दिवाळी अंकही मी जपून ठेवताे. त्यामधील विविध अभ्यासपूर्ण लेख हे माझ्यासाठी बाैद्धिक मेजवानीच असते.
दाैऱ्यात किंडलमुळे भागते वाचनाची भूक
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले, ‘कथा, कादंबऱ्यांपेक्षा मला चरित्र आणि आत्मचरित्रं आवडतात. पुपुल जयकर यांनी लिहिलेलं इंदिरा, माझे आजोबा भाऊसाहेब थोरात यांचे अमृतमंथन, अमृतगाथा ही माझी आवडती पुस्तकं आहेत. टाटायन, एका तेलियाने यासह गिरीश कुबेर यांची बहुतेक पुस्तकं मी वाचली आहेत. सध्या रॉबिन शर्मा यांचं ‘द फाइव्ह ए एम क्लब’ वाचतोय. मोटिव्हेशन, टाइम मॅनेजमेंटवरचं हे छान पुस्तक आहे. अशी पुस्तकं प्रेरणा देतात, जगणं समृद्ध करतात. प्रचार दौऱ्यात प्रवासात मी किंडलवरच वाचन करतोच. माझ्या किंडलमध्ये ३००० पुस्तकं असतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.