आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपनंतर शिवसेना बाद, आता राष्ट्रवादी खेळणार! भाजपची घडामाेडींवर बारीक नजर; लवकरच घेणार निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणूक निकालाच्या १८ दिवसांनंतरही महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा गुंता सुटण्याएेवजी वाढतच चालला आहे. रविवारी भाजपने सत्तास्थापनेत असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली हाेती. त्यामुळे साेमवारी दिवसभर शिवसेना व दाेन्ही काँग्रेसच्या गाेटात हालचालींना वेग आला हाेता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटून पाठिंबा देण्याबाबत अधिकृत प्रस्ताव दिला, पवारांनी ताे तत्त्वत: मान्यही केला. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतरही काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी ताे मान्य न केल्यामुळे अखेर शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फाेल ठरला.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आदींनी साेमवारी सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेस तयार असल्याचे सांगितले, मात्र बहुमतासाठी आवश्यक काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र ते देऊ शकले नाहीत. त्यासाठी दाेन दिवसांची मुदत शिवसेनेने मागितली, मात्र राज्यपालांनी त्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने सत्तास्थापनेची संधी गमावली. त्यापाठाेपाठ राज्यपालांनी आता राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले असून मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत त्यांना १४५ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करायचे आहे.
 

शिवसेनेची अभूतपूर्व कोंडी; राष्ट्रपती राजवटीची भीती
काँग्रेसने एेनवेळी पाठिंब्याचे पत्र न दिल्याने सत्तास्थापनेची पूर्ण तयारी केलेल्या शिवसेनेची माेठी काेंडी झाली. पत्रकारांशी बाेलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आम्ही दिलेल्या मुदतीत राज्यपालांची भेट घेऊन सत्तेचा दावा दाखल केला. मित्रपक्षांनी आम्हाला पाठिंब्याबाबत तत्त्वत: मान्यता दिली. फक्त त्यांची पत्रे मिळण्यासाठी २ दिवसांची मुदत मागितली, मात्र ती राज्यपालांनी नाकारली. सत्तास्थापनेचा दावा मात्र नाकारला नाही. आता राष्ट्रपती राजवट लागते की काय? हे माहीत नाही.’
 

शिवसेना एनडीएतून बाहेर; सावंतांनी साेडले मंत्रिपद
एनडीएतून बाहेर पडली तरच शिवसेनेला पाठिंब्याचा विचार करू,अशी अट काँग्रेस- राष्ट्रवादीने घातली हाेती. त्यानुसार शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी साेमवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत त्यांची ही अट पूर्ण केली.