आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनैसर्गिक आघाड्यांपेक्षा राजकीय पक्षांनी पुन्हा जनादेश घ्यायला हवा - राजकीय विश्लेषक यशवंत देशमुख

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रमाकांत दाणी 

नागपूर - जनतेने आघाडी किंवा युती म्हणून जनादेश दिल्यावर या राजकीय पक्षांनी सत्तेसाठी विचारधारा व जनतेला दिलेली आश्वासने गुंडाळून अनैतिक आघाडी करणे अत्यंत अयोग्य आहे. महाराष्ट्रातील सध्याचा पेच पाहता राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा जनतेत जाऊन स्पष्ट जनादेश घ्यायला हवा, असे स्पष्ट मत सी व्होटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर यशवंत देशमुख यांनी अतिशय परखडपणे आपले विश्लेषण मांडताना भविष्यात पक्षांतरविरोधी कायद्याच्या तरतुदी राजकीय आघाड्यांनादेखील लागू व्हायला हव्यात, असे वेगळे मत मांडले. राजकीय पक्ष निवडणुकीनंतर स्वत:च्या सोयीसाठी जनतेचा विश्वासघात करीत असतील तर हे आवश्यक असल्याचे यशवंत देशमुख यांनी सांगितले.> प्रश्न : शपथविधी सकाळीच उरकण्याचा राज्यपालांचा निर्णय याेग्य आहे का?

देशमुख : नियम पाहिले तर राज्यपालांनी कुठलाही बेकायदेशीर निर्णय घेतल्याचे दिसत नाही. त्यांनी एकूण प्रक्रियेचे पालन करूनच शपथविधीचा निर्णय घेतल्याचे दिसते. नैतिक दृष्टीने म्हणाल तर तेथे संशयाला वाव आहेच. त्यावर न्यायालय काय तो निर्णय देईलच.

> प्रश्न : नैतिकतेच्या कसोटीवरच हा निर्णय वादग्रस्त ठरतोे का?

देशमुख : हे खरे आहे. पण आज कुठला राजकीय पक्ष नैतिकतेचा विचार करतोय? जनादेश भाजप-शिवसेना युतीला होता. दोघांनीही त्याचे पालन केले नाही. किंबहुना शिवसेना जास्तच दोषी वाटते. आता ते काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जायला तयार आहेत. भाजपची राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी आहे. उरली कुठे नैतिकता? बिहार आणि गोव्यातही भाजपला जनादेश नव्हता तरीही ते सत्तेत सहभागी झाले, ते अत्यंत चुकीचेच होते.

> प्रश्न : पण नैतिकतेचा विचार करून हा राजकीय पेच कसा सुटायला हवा?

देशमुख : पुन्हा राज्यातील निवडणुकीच्या माध्यमातून जनादेश घेऊनच सुटावा. जनतेला स्पष्टपणे सांगावे. आम्ही अमुक गोष्टीसाठी पुन्हा तुमच्या दरबारात आलोय. आम्हाला स्पष्ट असा कौल द्या. जनता ठरवेल काय ते.

> प्रश्न: राष्ट्रवादी पक्षात निर्माण झालेल्या बंडखोरीबद्दल तुम्हाला नेमके काय वाटते?

देशमुख : स्वराज कौशल यांनी शरद पवारांबद्दल मजेदार ट्विट केलेय. पवार तुम्हाला विमानतळावर भेटले असतील तर ते मुंबईचे तिकीट काढतील, बोर्डिंग पास कोलकात्याचा आणि जातील चेन्नईला. त्यामुळे अजित पवारांच्या बंडखोरीबद्दल शरद पवार अनभिज्ञ होते, यावर विश्वास ठेवायला जागा दिसत नाही. त्यांचे आजवरचे राजकारण हे असेच राहिले आहे हे लक्षात घ्या.> प्रश्न : पेचप्रसंगाचा नेमका काय दिसतो?

देशमुख : अगदीच अस्पष्ट चित्र आहे. न्यायालयाचा निर्णय काय येतो हे महत्त्वाचे आहे. शिवाय ३० तारखेला विधानसभाध्यक्षांच्या निवडणुकीतूनच चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होऊ शकते. राष्ट्रवादीच्या आमदारांची नेमकी भूमिका तेथेच स्पष्ट होईल.

> प्रश्न : भाजपकडे बहुमत नाही. सध्याचे वास्तव महाविकासआघाडी हेच दिसतेय?
देशमुख : सध्या तरी तेच दिसतेय. महाविकास आघाडीचे सरकार निश्चितपणे काही काळ चालेल. या आघाडीतील तिन्ही पक्षांकडे कुठलाच उपाय नाही. प्रत्येकाला कॉम्प्रमाइज करावेच लागणार. सरकार किती काळ चालेल यावर मात्र प्रश्नचिन्ह असेल.


> प्रश्न :  शिवसेना या पक्षापुढे आजघडीला नेमक्या काय अडचणी िदसतात तुम्हा
ला?
देशमुख : एक तर शिवसेनेच्या नेतृत्वाला सरकार चालवण्याचा पुरेसा अनुभव नाही. आघाडीचे सरकार चालवणे ही मोठी कसरत असते. सत्तेतील भागीदार (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) तुमच्यापेक्षा अधिक अनुभवी आणि राजकीय चातुर्य बाळगून असतील तर सरकार चालवणे शिवसेनेसाठी मोठे आव्हान असेल.

> प्रश्न : पण संघटना मजबुतीसाठी सत्तेचा फायदादेखील शिवसेनेला हाेऊ शकताे ना? 
देशमुख : हे काळच सांगेल. शिवसेनेला अल्पकालीन लाभ िदसत असले तरी त्यांच्या दीर्घकालीन राजकारणावर निश्चितपणे प्रश्नचिन्ह लागलेले असेल. शिवसेनेचा दुखावला गेलेला अहंकार आणि संघटना वाढीची चिंता हीच त्यांच्या राजकीय हट्टाची मूळ कारणे आहेत. पण अहंकार दुखावला गेला की माणूस विवेक गमावूनही बसतो. शिवसेना सध्या त्याच मानसिकतेतून जात आहे.

> प्रश्न : सरतेशेवटी महाराष्ट्रातील चारही प्रमुख राजकीय पक्षांचे भवितव्य काय असेल?
देशमुख : काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे या राजकारणामुळे नुकसान होईल असे वाटते. काँग्रेसच्या सेक्युलर प्रतिमेला तडा जाण्याची व त्याचा लाभ इतर क्षेत्रीय सेक्युलर पक्ष घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेसने विचारमंथनासाठी इतका वेळ घेतलेला दिसतो. राष्ट्रवादीची ती परिस्थिती नाही. त्यांच्यापुढे विचारधारेच्या मर्यादा तेवढ्या नाहीत. त्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा गड पुन्हा सुस्थितीत आलाय. भाजप विरोधी पक्ष राहिल्यास या पक्षाला सर्वच आघाड्यांवर मोठी स्पेस मिळण्याची शक्यता वाटते. > प्रश्न : पण पुन्हा निवडणूक लढण्याची काेणत्याच पक्षाची तयारी नाही?

देशमुख : हे सारे बहाणे आहेत. राजकीय पक्षांकडून यासाठी सांगितली जाणारी कारणे अतिशय तोकडी आणि न पटणारी आहेत. निवडणुकीचा खर्च परवडणारा नाही, नव्याने निवडून आलेल्या आमदारांना पुन्हा निवडणूक मान्य होणार नाही, अशी कारणे दिली जात आहेत. तुम्हाला लोकशाही टिकवायची तर त्याची थोडीफार किंमत चुकवावीच लागणार. आणि तसेही जगात सर्वात कमी खर्चाच्या निवडणुका भारतातच होतात हे लक्षात घेतले पाहिजे.