आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात राजकारण तापण्याची चिन्हे; आणखी २ काँग्रेस आमदारांचा राजीनामा; काँग्रेस-जेडीएस आघाडीला मानला जाताेय झटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस-जनता दलाचे (से.) आमदार पक्ष साेडण्याचे सत्र सुरूच असून त्यामुळे राज्यात राजकीय अस्थैर्य निर्माण हाेण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वीही सत्ताधारी पक्षांच्या काही आमदारांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला हाेता. त्यात आता अजून दाेन आमदारांची भर पडली आहे. विजयनगरचे काँग्रेस आमदार आनंद सिंह व गाेकाकचे रमेश जारकिहाेळी यांनी साेमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. १३ महिने जुन्या जनता दल (से.) व काँग्रेस आघाडीला हा माेठा झटका मानला जात आहे. 

 

याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह यांनी विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांच्याकडे आपला राजीनामा दिला. यामुळे राज्यात निर्माण झालेले राजकीय नाट्य अधिक वेगवान हाेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच सत्ताधारी पक्षांच्या आणखी काही आमदारांनीही पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे राज्यातील एच. डी. कुमारस्वामी सरकारच्या अडचणी वाढू शकतात. गत महिन्यात कर्नाटक जनता दलाचे (से.) प्रमुख एच. विश्वनाथ यांनी लाेकसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला हाेता. मात्र, पक्षात उपेक्षा हाेण्यासह पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याने विश्वनाथ हे नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच आघाडी सरकारच्या कामकाजाच्या पद्धतीवरून त्यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमय्या यांच्याशी सार्वजनिक ठिकाणी वाद झाले हाेते. दरम्यान, राज्यातील घडामाेडींमुळे येदियुरप्पा यांनी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार असून, तशा शक्यता पडताळून पाहत असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे सिद्धरमय्या यांनी कांॅग्रेस आमदारांची बैठक बाेलावली असून, त्यात ते आढावा घेणार आहेत.  


मला राजीनामा मिळालेला नाही : विधानसभाध्यक्ष 
याबाबत माहिती देताना विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांनी आपल्याला अद्याप काेणताही राजीनामा मिळालेला नसल्याचे सांगून यासंदर्भातील वृत्ताचा स्पष्टपणे इन्कार केला. माझ्याकडे कुणीही राजीनामा देण्यासाठी आले नाही, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे सिंह यांनी याबाबत बाेलताना आपण साेमवारी सकाळीच राजीनामा दिल्याचे सांगितले; परंतु विधानसभाध्यक्षांनी ते नाकारल्याचे एेकले. तसे असेल तर मी पुन्हा राजीनामा देईन, असेही सिंह यांनी सांगितले. मात्र, राजीनामा देण्यामागील कारणांचा खुलासा सिंह यांनी केला नाही. दरम्यान, जेएसडब्ल्यू स्टीलला ३,६६७ एकर जमीन विक्रीविरोधात सिंह यांनी अलीकडेच बल्लारी येथे पत्रकार परिषद घेतली होती.