आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय रणकंदन : लोकसभेसाठी भाजप ३ राज्यांत हरली; पवारांच्या तर्काचा भाजपकडून समाचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम संदर्भात शरद पवारांनी उपस्थित केलेली शंका भाजपने हास्यास्पद ठरवली आहे. लोकसभेत आलेले अपयश पचवणे पवारांना जड जातेय, पण अशा विधानांनी ते उरलीसुरली विश्वासार्हतासुद्धा गमावून बसतील, अशी टीका भाजपने केली आहे.  


शनिवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीत पवार यांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली. पवारांच्या विधानाची भाजपने खिल्ली उडवली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांत भाजपला काँग्रेसपेक्षा १ टक्का मते अधिक पडली आहेत. तेथे १५ वर्षे आमची सत्ता होती. आम्ही अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळे पराभूत झालो, असे स्पष्ट करत पवारांना भाजपचं यश पचवणं अवघड जातंय, असा प्रतिआरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. ‘पवार यांनी ईव्हीएमसंदर्भात जनतेची दिशाभूल करणारी विधाने टाळायला हवीत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसची उरलीसुरली विश्वासार्हता शून्यावर येईल. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने अशी हास्यास्पद विधाने करू नयेत. अन्यथा त्यांना कोणी गांभीर्याने घेणार नाही,’ असा इशारा भाजप नेते मधू चव्हाण यांनी दिला. 


पवारांच्या कोलांटउड्या :

लोकसभेच्या मतदानापूर्वी पवार यांनी घड्याळाचे बटण दाबले तर मत कमळाला जात असल्याचा स्वानुभव सांगितला होता. आपली कन्या सुप्रिया पराभूत झाल्यास ईव्हीएमवरचा विश्वास संपुष्टात येईल, असे त्यांनी म्हटले होते. निकालानंतर त्यांनी “आता ईव्हीएमबाबत बोलणे चुकीचे ठरेल, निकाल ग्रेसफुलपणे स्वीकारला पाहिजे,’ असे म्हटले. दोन आठवड्यांतच ईव्हीएमच्या अचूकतेवर शंका व्यक्त केली आहे.


ईव्हीएमविरोधात मोठा लढा :

ईव्हीएमविरोधात मोट बांधण्याच्या कामी आंध्रचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना पवार यांचा पाठिंबा होता. विरोधासाठी २३ पक्ष एकत्रित आले होते. मात्र निवडणूक आयोग व न्यायालयाने ईव्हीएमबाबत विरोधकांच्या शंका चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले होते. निकालानंतर ईव्हीएमविरोधात राष्ट्रीय लढाई उभी करावी व त्याचे नेतृत्व पवारांनी करावे, अशी गळ राज ठाकरे यांनी पवारांना भेटून घातली होती. पण पवारांनी त्याला नकार दिला.
 

‘मध्य प्रदेश, राजस्थानच्या निकालावेळीच शंका’ 
ईव्हीएम यंत्रासंदर्भात माझ्या मनात आधीपासूनच शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये सत्ता असताना तेथील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला. हा पराभव लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी तर भाजपने ओढवून घेतला नाही ना, अशी शंका मला तेव्हा आली होती, असे शरद पवार बैठकीत म्हणाले. 

 

धूल चेहरे पे थी, आईना साफ करते रहे : मुनगंटीवार
विरोधकांकडे आता बोलायला काही नसल्याने ईव्हीएमसंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत. ५० वर्षे राज्य, ६० वर्षे देश यांच्या ताब्यात होता. यांनी जनतेसाठी काही केलेच नाही. त्यामुळे लोकसभेत पराभव झाला, असा दावा करत ‘धूल चेहरे पे थी और ये आईना साफ करते रहे’ अशा शब्दांत भाजप नेते  सुधीर मुनगंटीवारांनी टीका केली.