Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | politics in ahemadnagar municipal corporation election

इनकमिंगसाठी दिग्गजांना मिळतोय लाखोंचा मन्ट्याल! फोडाफोडीसाठी नवा फंडा

प्रतिनिधी | Update - Aug 30, 2018, 09:52 AM IST

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'हुकमी एक्के' गळाला लावण्यासाठी राजकीय पातळीवर अर्थपूर्ण तडजोडींचा नवा फंडा

 • politics in ahemadnagar municipal corporation election

  नगर- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'हुकमी एक्के' गळाला लावण्यासाठी राजकीय पातळीवर अर्थपूर्ण तडजोडींचा नवा फंडा यशस्वी होत आहे. उमेदवारीचा शब्द देऊन लाखोंचा 'मंट्याल' देण्याचीही तयारी काही पक्षांनी दाखवली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण मोठी उलथापालथ होत असल्याने इतर पक्षांतून फुकट 'इनकमिंग'ची अपेक्षा करणाऱ्यांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत. दरम्यान, प्रभागांच्या फोडाफोडीमुळे चाचपणी करणाऱ्यांमध्येही संभ्रम वाढला आहे.


  महापालिकेचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत असल्याने आगामी निवडणुकीची प्रक्रिया प्रारूप प्रभाग रचनेच्या निमित्ताने सुरू झाली आहे. २०१३ मधील निवडणुकीच्यावेळी ३४ प्रभागांत प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून देण्यात आले. पण आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या कमी करत एका प्रभागात चार नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना, तसेच नकाशे प्रसिद्ध झाले असले, तरी प्रभागाच्या चतु:सीमांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. प्रशासनाने नकाशा समजून सांगण्याचीही व्यवस्था केली आहे. दरम्यान, प्रभागरचना होताना प्रभागांची तोडफोड झाल्याने विद्यमानांसह इच्छुकांची गोची झाली आहे. हक्काचे मतदार असलेले नवीन प्रभागरचनेत इतर प्रभागात विखुरले जाऊन नव्याने भाग समाविष्ट झाले. अशा परिस्थितीत इच्छुकांसमोर दोन ते तीन पर्याय उपलब्ध आहेत. नेमका कोणता प्रभाग सोयीस्कर राहील याची दुसऱ्या टप्प्यातील चाचपणी इच्छुकांकडून सुरू आहे.


  कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसण्यासाठी हमखास निवडून येतील, अशा उमेदवारांना गळ घातली जात आहे. प्रथम शिष्टमंडळ जाऊन इच्छुकाशी विरोधात असलेल्या पक्षातील इच्छुकाशी चर्चा करते. या चर्चेनंतर कल ओळखून त्याप्रमाणात भाव ठरवून पक्षात प्रवेश घेण्याच्या बदल्यात लाखो रुपये देण्याची तयारी दर्शवली जाते. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून एक नवी 'अर्थक्रांती' या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकारामुळे कोणीही उघड बोलत नसले, तरी दबक्या आवाजात का होईना, हा विषय चर्चेत आला आहे.


  नगरकर कौल देतील, असे गृहित धरणाऱ्या पक्षीय धुरंधरांनी तडजोडीचे राजकारण पाहून तोंडात बोटे घातली आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी होणार असली, तरी शिवसेना व भाजप पक्ष स्वबळावरच निवडणूक लढवणार आहे. शहर विकासावर सध्यातरी कोणी बोलायला तयार नाही, प्रत्येकजण पक्षाच्या माध्यमातून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे. पक्षांतर्गत प्रवेशही उमेदवारी देण्याच्या बोलीवर होत आहेत. ज्या पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्या पक्षात अंतर्गत बंडाळी उफाळून येण्याची शक्यता आहे.


  सोयीस्कर 'पॅनेल'चाही शोध
  चार जणांचा प्रभाग असल्याने ज्या पक्षातील चारही उमेदवार दिग्गज आहेत, अशा पॅनेलमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी एकही रुपया न घेता उमेदवारी मिळवण्याच्या बोलीवर काहींचा पक्षप्रवेश रखडला आहे, तर ज्या पक्षाचा पॅनेल लंगडा आहे, त्यांनी इतर पक्षातील दिग्गजांना लाखोंचा निवडणूक खर्च देण्याची तयारी दर्शवून गळ घातली. चार उमेदवारांचा सोयीस्कर पॅनेल असलेल्या ठिकाणांचा शोध घेताना कार्यक्षेत्रही तपासून पाहिले जात आहे.


  सोयीस्कर उमेदवारीसाठी प्रयत्न
  डॉ. योगेश चिपाडे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते, पण अचानक त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. प्रसंगी ते प्रभाग ८ मधून सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवू शकतात. दुसरीकडे मनसेचे दत्ता जाधव शिवसेनेच्या वाटेवर आहेत, पण त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यांच्यासाठी प्रभाग १३ सोयीस्कर असल्याचे दिसून येत आहे. प्रभाग १ मध्ये राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर, राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिवसेनेच्या डॉ. सागर बोरुडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. दुसरीकडे दिगंबर ढवण यांनीही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. ज्या पक्षात इच्छुक जास्त आहेत, त्या पक्षांसमोर अंतर्गत बंडाळी रोखण्याचे आव्हान आहे.

Trending