Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Polling in Jalgaon's Diwali pollution, Havetay survey in five places with Tavar Chaka

जळगावचे दिवाळीतील प्रदूषण तपासणार, टाॅवर चाैकासह 5 ठिकाणी हाेतेय सर्वेक्षण

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 11:38 AM IST

तीन दिवसांत फटाक्यांची अातषबाजी कमी असली तरी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने त्याची भर भरून काढण्यात अाली.

 • Polling in Jalgaon's Diwali pollution, Havetay survey in five places with Tavar Chaka

  जळगाव - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील हवा व ध्वनी प्रदूषण तपासणीसाठी पाच ठिकाणी स्वयंचलित मशिन लावले अाहेत. यात १५ दिवस हवेची तर तीन दिवस ध्वनी प्रदूषणाची तपासणी केली जाणार अाहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा तीन दिवसांत फटाक्यांची अातषबाजी कमी असली तरी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने त्याची भर भरून काढण्यात अाली.


  दिवाळी म्हटली की दिवे, फराळ अाणि फटाक्यांची अातषबाजी हे समिकरण ठरलेले अाहे. वसुबारसपासून सुरू झालेल्या दीपाेत्सवात दाेन दिवसांपासून चैतन्य संचारले अाहे. बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असले तरी फटाके विक्रीत गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा माेठी उलाढाल नसल्याचे सांगितले जात अाहे. त्यात सर्वाेच्च न्यायालयाने फटाके फाेडण्यासाठी केवळ दाेन तासांची मुदत दिल्यामुळे अनेकांच्या अानंदावर विरजन पडले. त्यात गेल्या काही वर्षांपासून हवा व ध्वनी प्रदूषणासंदर्भात जनजागृती सुरू असल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम जाणवत अाहे. दरम्यान, दिवाळी असल्याने फटाक्यांची अातषबाजी हाेणारच. फटाक्यामुळे हाेणाऱ्या प्रदूषणाचे माेजमाप करण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळावर येऊन ठेपलेली असते.

  त्याचाच भाग म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सर्वेक्षणाची संपूर्ण तयारी करण्यात अाली अाहे. दिवाळीत फटाक्यांमुळे किती ध्वनी व वायू प्रदूषण झाले हे ७ ते ९ नाेव्हेंबर अशा तीन दिवसांच्या नाेंदी घेतल्यानंतर कळणार अाहे. या अनुषंगाने जेथे जास्त फटाके फाेडले जातात, अशी प्रातिनिधीक पाच ठिकाणे निवडण्यात अाली अाहेत. वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फाेडू नये असे अावाहन सामाजिक संस्था, संघटनांनी केले हाेते. मात्र, तरीही यंदा माेठ्या प्रमाणात फटाके फाेडण्यात अाल्याचे चित्र बुधवारी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी प्रकर्षाने समाेर अाले.

  फटाक्यांच्या प्रदूषणाने पक्ष्यांवर येते संक्रांत
  जळगाव | दिवाळीत कानठळ्या बसणारे फटाके वाजवले नाहीत तर हा सण साजराच झाला नाही अशी अनेकांची भावना असते; परंतु याच फटाक्यांमुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागताे. हा दरवर्षीचा अनुभव अाहे. त्यामुळे दिवाळी दाराशी अाल्यावर पक्षिमित्रांची झाेप उडाली असून, यंदा किती पक्षी जखमी हाेतात, या चिंतेने ते अस्वस्थ झाले अाहेत.


  दिवाळी म्हटले की, गोडधोड पदार्थांची लयलूट आणि फटाक्यांच्या आतषबाजीचे दर्शन घडतेच. दिवाळीच्या आनंदात फटाके फोडताना ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे भान ठेवले जात नाही. दिवाळीच्या काळात सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत ध्वनिप्रदूषणाचा स्तर सामान्य स्तरापेक्षा ४४ टक्के अधिक वाढतो. व्यावसायिक भागात ६५ डेसिबल्स, औद्योगिक भागात ७५ ते ८५ डेसिबल्स आणि निवासी भागांसाठी ५५ डेबिबल्सची ध्वनिमर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र ती पाळलीच जात नसल्याने दरवर्षी लाखो पक्ष्यांचा अकाली मृत्यू होतानाचे विदारक चित्र असते.

  हे हाेतात परिणाम : दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत रात्री-अपरात्री वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने झोपेत असणारे पक्षी घाबरून उठतात आणि सैरभैर होतात. त्यातूनच अशा पक्ष्यांचा अपघात होऊन मृत्यू होण्याचीही शक्यता असते. मानवाला १२५ डेसिबल आवाज ऐकता येऊ शकतो; मात्र त्यापेक्षा जास्त आवाज होत असेल तर त्याचे परिणाम श्रवणयंत्रणेवर होतात. पक्ष्यांची श्रवण क्षमता खूपच कमी असते.


  प्रकाश फेकणारे फटाके पक्ष्यांच्या डोळ्यांवर अत्यंत विपरीत परिणाम करतात. अतितीव्र प्रकाशामुळे पक्ष्यांना आंधळेपणा येतो. अंधारात चाचपडत भिंतीवर आदळून त्यांचा मृत्यू होताे. पशू-पक्ष्यांच्या फुप्फुसातही प्रदूषित हवेमुळे श्वसनात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पक्ष्यांचा आदिवास कमी होतो.


  झाडांच्या परिसरात फटाके फुटू लागताच पक्षी बिथरतात
  पक्ष्यांचा अधिवास असलेल्या झाडांच्या परिसरात अचानकपणे फटाके फुटू लागताच पक्षी बिथरतात आणि घबराटीने काही मृत्युमुखी पडतात. फटाक्यांच्या आवाजापासून लांब जाण्यासाठी रात्रीच्या अंधाराची पर्वा न करता भरारी घेतात. मात्र, त्यांची ही भरारीदेखील जीवघेणी ठरते. अडथळ्यांवर आपटून पक्षी जमिनीवर कोसळतात. पर्यावरणस्नेही पद्धतीने दिवाळी साजरी केल्यास पक्षीही या काळात मनसाेक्त विहार करू शकतील.

  मेहरूण तलाव परिसरात फटाके फाेडण्यास मज्जाव

  मेहरूण तलाव परिसरात मोकळ्या जागेत टारगट मुले फटाके उडवतात. यामुळे या पक्ष्यांच्या जीवितासाठी या भागात पाहणी करून गांधीगिरी केली. काही मुलांना पक्ष्यांचे महत्त्व सांगितले. दरम्यान पुढील काही दिवसांसाठी मेहरूण तलाव परिसरात फटाके फोडू नये यासाठी पोलिस गस्त ठेवण्याची मागणी केली आहे. राजेंद्र गाडगीळ, पक्षीमित्र, जळगाव


  पाच ठिकाणांवर यंत्रे
  हवा प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी जुने बी. जे. मार्केट व गिरणा टाकी परिसरात सर्वेक्षण करण्यात येत अाहे. १ ते १४ नाेव्हेंबर दरम्यान प्रदूषणातील बदलाची नाेंद ठेवण्यात येत अाहे. याशिवाय ध्वनी प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी टाॅवर चाैकातील शास्त्री टाॅवर, शिवाजी पुतळा व जिल्हा सामान्य रूग्णालय या ठिकाणी स्वयंचलित मशिनद्वारे सर्वेक्षण केले जात अाहे. ध्वनी प्रदूषणासाठी ७ ते ९ नाेव्हेंबर दरम्यान नाेंदी ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी साेमनाथ कुरमुडे यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना दिली

Trending