Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Pomegranate Rs.1200, and Moosambi Rs.2500 per quintal in Aurangabad

डाळिंब 1200 रुपये, तर मोसंबी 2500 रुपये क्विंटलवर; महिनाभरात तीनपटीने घसरण

महेश जोशी | Update - Dec 09, 2018, 07:12 AM IST

घट- मोसंबीची आवक घटूनही दर स्थिर

 • Pomegranate Rs.1200, and Moosambi Rs.2500 per quintal in Aurangabad

  औरंगाबाद- अत्यंत भरवशाचा आणि खात्रीने उत्पादन देणारा डाळिंबाचा बाजार आता कमालीचा अस्थिर आणि बेभरवशाचा झाला आहे. यामुळे डाळिंबात गुंतवणूक करताना बाजाराचा कल लक्षात घेणे आवश्यक झाले आहे. औरंगाबादच्या बाजारपेठेत डाळिंबाच्या दरात महिनाभरात तिप्पट घसरण झाली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला ३५०० रुपये दर मिळालेले डाळिंब आज १२०० रुपयांवर घसरले. मोसंबीची आवक कमी झाली असतानाही दर मात्र स्थिर आहेत.

  यंदा डाळिंबाच्या बाजाराने दहा वर्षांतील नीचांकी पातळी गाठली असून सातत्याने बाजारभाव दबावात आहेत. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या दहा वर्षांत डाळिंबाच्या बाजाराने नवनवे उच्चांक गाठले. द्राक्षाच्या तुलनेत सोपे आणि कमी भांडवली गुंतवणुकीचे पीक असल्यामुळे त्याकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत प्रथमच अधिक काळ मंदी चालल्याचे व्यापारी सांगतात.

  केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या फलोत्पादनविषयक दुसऱ्या पाहणीत २०१६-१७ मध्ये देशात २०.९ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड आहे. गेल्या तीन वर्षांत देशातील डाळिंबाचे उत्पादन व लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये १३ लाख हेक्टरवर डाळिंबाचे क्षेत्र होते. ते आजघडीला ६० टक्क्यांनी वाढले आहे. उत्पादन २४.४ लाख टनावर पोहोचले. यात ८० टक्क्यांची वाढ दिसतेय. देशातील डाळिंबाखालील क्षेत्र आणि उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. २०१५-१६ मध्ये राज्यातील क्षेत्र १२.८ लाख हेक्टर, तर उत्पादन १४.८ लाख टनांपर्यंत पोहोचले. आधीच्या तीन वर्षांशी तुलना करता क्षेत्रात ४२ टक्के, तर उत्पादनात ५७ टक्के वाढ झाली. २०१५-१६ मधील आकडेवारीनुसार देशातील डाळिंबाच्या क्षेत्रात ६६ टक्के, तर उत्पादनात ६७ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांत डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. मागील तीन वर्षांत महाराष्ट्रातील उत्पादनाच्या दुप्पट वेगाने कर्नाटक आणि गुजरातमधील उत्पादन वाढले आहे हे विशेष.

  राज्यात मराठवाडा, विदर्भात डाळिंबाखालील क्षेत्र लक्षणीय प्रमाणात वाढले. या भागात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव तीव्र नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुका, फुलंब्री, पैठण, पाचोड आदी डाळिंब लागवडीसाठी महत्त्वाचे समजले जातात. इथल्या डाळिंबाला महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, दिल्ली, चेन्नई आणि मध्य प्रदेशातही मोठी मागणी अाहे.

  गेल्या महिनाभराचा विचार केला असता डाळिंबाचे दर सातत्याने घसरत आहेत. १ नाेव्हेंबर रोजी बाजारात ३४ क्विंटल डाळिंब दाखल झाले होते. त्यास ३५०० रुपयांचा दर मिळाला. २० नोव्हेंबर रोजी आवक आणि दरही घटले. २० क्विंटल डाळिंब बाजारात आले. ते २५०० रुपयांनी विकले गेले. ३० नोव्हेंबर रोजी १३ क्विंटल डाळिंबाला १९५० रुपयांचा दर मिळाला, तर ७ डिसेंबर रोजी २० क्विंटल डाळिंबाला अवघा १२०० रुपये दर मिळाला आहे.

  मोसंबीचे दर मात्र स्थिरच
  डाळिंबाचे दर घसरत असताना मोसंबीचे दर मात्र स्थिर आहेत. १ नोव्हेंबर रोजी ४५ क्विंटल मोसंबीला २६०० रुपयांपर्यंतचा दर मिळाला होता. २० नोव्हेंबर रोजी ११४ क्विंटल आवक झाली. ती २५०० रुपयांनी विकली गेली. ३० नोव्हेंबरला आवक घटून २२ क्विंटल झाली. दर मात्र २५०० रुपये स्थिर होते. ७ डिसेंबरलाही २१ क्विंटल मोसंबी बाजारात आली. ती २५०० रुपयांनी विकली गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Trending