आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’च्या हक्काचं माध्यम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजा तुपे

नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपलेे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न महिला करीत आहेत. नवीन माध्यमांना आत्मविश्वासाने भिडत सुरू असलेली त्यांची ही वाटचाल आणखी गतिमान होईल.


तंत्रज्ञानातलं बायकांना काय कळतं, असा समज आता-आतापर्यंत बाळगला जायचा. अजूनही महिला ऑनलाइन असल्या, की एक तर मोबाइलवर हॉटस्टार किंवा झी फाइव्ह अॅपवर टीव्ही मालिका पाहणार किंवा फेसबुक-व्हॉट्सअप चाळणार, अशा धारणा काही प्रमाणात आहेतच. पण, ऑनलाइन जगातल्या बायकांनी इतक्या विविध प्रकारे इंटरनेटचा वापर केलाय की त्याची काही उदाहरणं पाहिली, तरी या सगळ्या धारणा कोसळून पडतात.फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, यूट्यूब या प्रचलित समाजमाध्यमांचा वापर तर महिलांकडून विविध कारणांसाठी केला जातो आहेच. त्याबरोबरीने ब्लॉगिंग, व्हिडिओ ब्लॉग्ज म्हणजेच व्लॉग्ज, वेब पोर्टल्स, ऑनलाइन मार्केटिंग अशा कित्येक गोष्टी त्या अतिशय हुशारीने करत आहेत. ऑनलाइन माध्यमांत त्या आपली वेगळी स्पेस निर्माण करत आहेत. असंच एक उदाहरण आहे, सई तांबेचं. स्टोरीटेल या ऑडिओ बुक्सच्या एका स्वीडिश कंपनीसाठी ती काम करते. स्टोरीटेल हे एक मोबाइल अॅप आहे, ज्यात विविध भाषांमधल्या गाजलेल्या कथा-कादंबऱ्या ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत. पत्रकारितेतही अलीकडे वेब माध्यमं उत्तम काम करत आहेत. ‘खबर लहेरिया’ हे संपूर्णपणे महिलांमार्फत चालवलं जाणारं वेब पोर्टल त्याचं एक मोठं उदाहरण आहे. विशेष बाब अशी, की या माध्यम कंपनीत दलित, आदिवासी, मुस्लिम या समाजघटकांतल्या गरीब, अल्पशिक्षित महिला काम करतात. मीडियाचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या महिलांना प्रशिक्षण व साधनं पुरवली जातात. या महिला स्थानिक बातम्यांचे िव्हडिओ बनवून ते यूट्यूब चॅनलवर प्रक्षेपित करणं, वृत्तनिवेदन करणं, वेबसाइटसाठी लेख लिहिणं अशी सगळी कामं उत्तम प्रकारे करतात. खबर लहेरियाला आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. ‘िव्हडिओ व्हॉलिंटिअर्स’ ही संस्थाही निम्न आर्थिक वर्गातल्या नि विशेषत: दलित-आदिवासी समाजातील महिलांना मोबाइल जर्नालिझमचं प्रशिक्षण देऊन लॅपटॉप, कॅमेरा, मोबाइल अशा साधनांचा पुरवठा करते. अशा प्रशिक्षित महिलाही वेब पत्रकारितेत महत्वाचं काम करत आहेत. खरं तर, या महिलांमुळे तळागाळातले प्रश्न, मुद्दे लोकांसमोर येत आहेत. अनेक वर्षे एनडीटीव्हीसारख्या वृत्तवाहिनीत काम केलेल्या बरखा दत्त साधारण दोन वर्षांपासून ‘मोजो स्टोरी’ या समांतर वेब चॅनलसाठी काम करत आहेत. आरफा खानुम शेरवानी, भाषा सिंग यांसारख्या अनुभवी पत्रकारही वेब पत्रकारितेत महत्त्वाचं नि आश्वासक काम करत आहेत. सोनाली शिंदे ही मराठी वृत्तवाहिनीत काम करणारी तरुण पत्रकार वेब जर्नालिझमचा महत्त्वाचा भाग असलेलं ‘मोजो’ म्हणजेच मोबाइल जर्नालिझमचं प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळा घेते. ऑनलाइन जगात आणखी एक महत्त्वाचं काम करणारं उदाहरण आहे, वंदना खरे, अंजली जोशी या स्त्रीवादी लेखिकांचं. त्यांनी ‘पुन्हा स्त्री उवाच’ नावाचं डिजिटल त्रैमासिक सुरू केलेलं आहे. या त्रैमासिकापासून वेबसाइट अपडेट ठेवण्यापर्यंत प्रत्येक तांत्रिक काम वंदना खरे स्वत: करतात. त्यासाठी त्यांनी लेख वेबसाइटवर कसे अपलोड करायचे, वेबसाइटची सजावट- मांडणी इ. बाबी आवर्जून शिकून घेतल्या. वेब माध्यमांसाठी आशय, तंत्रज्ञान यांची गणितं वेगळी असतात. शिवाय, हे मनोरंजन माध्यम भारतात तसं नवं आहे. पण, महिला त्यातही धडपड करून जिद्दीने पुढे जाताना दिसत आहेत. विविध विषयांवर व्हिडिओ ब्लॉगिंग करणाऱ्या, ट्रॅव्हलॉग्ज (प्रवास, भटकंती संदर्भातले व्हिडिओ ब्लॉग्ज) बनवणाऱ्या महिलांची असंख्य उदाहरणं आसपास आहेत. शुभांगी थोरात साठीच्या घरातल्या. बँकेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपली लिखाणाची आवड जोपासण्यासाठी ‘काहीही’ नावाचा ब्लॉग सुरू केला. या वयात हे ब्लॉगिंग वगैरे झेपेल का, असा विचार करण्यापेक्षा त्यांनी तंत्रज्ञानाशी मैत्री केली.  
एकंदरीतच, स्त्रियांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या आयुष्याला भेडसावणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. नवी माध्यमं, नव्या तंत्रज्ञानाला आत्मविश्वासाने भिडत नवनिर्मिती करण्याची त्यांची ही वाटचाल कालागणिक आणखी गतिमान होईल.

pooja548@gmail.com

बातम्या आणखी आहेत...