आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबी आणि स्वाभिमान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूरहून पुण्यास जात असताना आम्ही आरक्षण केलेल्या डब्यात बसलो होतो. बरेच लोक विनाआरक्षणाचे होते. त्यात काही गरीब मजूर आणि म्हातारी माणसे होती. आरक्षण केलेले सर्वजण रेल्वेला शिव्याशाप देत होते. सुखवस्तू माणसे त्या गरिबांकडे तुच्छतेने पाहत होती. गाडी दौंडला थांबली. विक्रेत्यांनी गर्दी केली. एका चहा विक्रेत्याला त्या मजुराने चहा देण्यास सांगितले. त्याने प्लास्टिकच्या कपात चहा दिला. मजुराने त्याला शंभराची नोट दिली. सुटे नसल्याने त्याने ती नोट घेतली नाही. सुट्या पैशांच्या नादात रेल्वे सुटली. मजुराने चहाचा कप विक्रेत्याला परत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तो घेतला नाही. फुकट चहा मिळाला म्हणून तो मजूर खुश होईल, असे सर्वांना वाटले. पण त्याने तो कप दुस-या मजुराकडे देण्याचा प्रयत्न केला. कारण त्याचा स्वाभिमान आड येत असल्यामुळे त्याला तो फुकटचा चहा प्यायचा नव्हता. दुस-यानेही तो कप घेण्यास नकार दिला. त्या चार-पाच मजुरांपैकी कोणीच फुकटचा चहा पिण्यास तयार होईना. मग त्यांनी खाली बसलेल्या एका म्हातारीला चहा देण्याचा प्रयत्न केला. तो चहा घेण्यास तीही तयार नव्हती. शेवटी सर्वांनी मिळून तो चहा त्या गरीब म्हातारीला पाजला.

नाराजीनेच तिने तो घेतला. सर्व प्रकार पाहून प्रवासी थक्क झाले. ज्यांचे हातावर पोट आहे ती माणसे पाच रुपयांचा चहा फुकट मिळाला तरी पिण्यास तयार नव्हती आणि दुसरीकडे जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे बडे नेते, अधिकारी दिसतात. त्यांना त्यात थोडाही संकोच वाटत नाही. कोटींचे घोटाळे करणारी मंडळी न लाजता तुरुंगात जातात. सुटल्यावर मान वर करून समाजात वावरतात. अशा लोकांकडे पाहिल्यावर गरिबांसाठी स्वाभिमान किती महत्त्वाचा असतो हे जाणवते.