आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिन्ही जिल्ह्यांतील दारूबंदी फसली, ती मागे घ्या : काँग्रेस खासदार धानोरकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - “चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात लागू असलेली दारूबंदी पूर्णपणे फसलेली आहे. दारूबंदीचा कुठलाही उपयोग झालेला नाही. शेजारच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून या भागात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. राज्याचा महसूल बुडतो. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांतून दारूबंदी हटली पाहिजे, अशी माझी स्पष्ट मागणी आहे. दारूबंदीचा फायदाच दिसत असेल तर ती संपूर्ण महाराष्ट्रात का लागू करत नाही,’ असे स्पष्ट मत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या चंद्रपूर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव नवनिर्वाचित खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना मांडले.


“कामगार वर्ग वेळेवर कामावर येत नाही म्हणून उत्पादन शुल्कमंत्र्यांनी दारूची दुकाने सकाळी आठ वाजताच सुरू करण्याचे आदेश काढले. त्यांचे दुसरे मंत्री दारूबंदी हवी म्हणून मागणी करतात. यांना तरी दारुबंदी हवी आहे का,’ असा सवालही धानोरकर यांनी केला. 
 

 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा सुफडासाफ झाला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंंघात केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करून बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे सतराव्या लोकसभेत महाराष्ट्रातून धानोरकर हे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव खासदार असतील. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद....

 

प्रश्न : सर्वत्र काँग्रेसची धुळधाण झाली असताना तुम्ही एकमेव निवडून आलात?
धानोरकर :  मी युद्धासारखीच निवडणूक लढतो. अतिशय गांभीर्याने. निवडणूक लढण्याचे संपूर्ण नियोजन माझ्याकडे असते. कुठल्याच गोष्टी सोडत नाही.  आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केले. त्यामुळे हे यश मिळाल्याचे मानतो.


प्रश्न : यशाची नेमकी कारणे काय? 
धानोरकर : हा बाळू धानोरकर खासदार व्हावा ही चंद्रपूरकरांच्या मनातली इच्छा होती. जनतेच्या प्रश्नांसाठी मी आमदार म्हणून रस्त्यावरही उतरलो. शिवसेनेचा आमदार असताना अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांवर बरसलो होतो. जी कामे खासदारांनी करायची ती मी केली. ट्रान्समिशन लाइनच्या प्रश्नावर लोकांना नुकसान भरपाई मिळवून दिली. त्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला.


प्रश्न : तुम्ही केंद्रीय मंत्र्यांस अस्मान दाखवले?
धानोरकर : तेरवी, लग्नसमारंभ, वाढदिवस करणे हे खासदाराचे काम आहे काय? अहिरांनी तेच केले. ते तीन-चार टर्म खासदार राहिले. त्यांचे काय योगदान आहे हे त्यांना सांगता येईल का? कुठलेही ठोस काम नाही. त्यामुळेच लोकांनी या वेळी निर्णय घेतला.


प्रश्न : जातीय समीकरण डोळ्यापुढे ठेवूनच तुम्हाला उमेदवारी मिळाली?
धानोरकर : मला जातीच्या आधारे काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. आघाडीच्या स्थानिक नेत्यांनीच नेतृत्वाला त्यासाठी भाग पाडले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची ती इच्छाच होती. 


प्रश्न: तुमचा अपवाद सोडला तर काँग्रेसला राज्यात सर्वत्र अपयश आले..
धानोरकर : वंचित बहुजन आघाडी सोबत असती तर काँग्रेसला राज्यात फटका बसला नसता. मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले, असे मला वाटते. यापेक्षा अधिक मला सांगता येणार नाही.


प्रश्न : दारुबंदीचा मुद्दा निवडणुकीत बराच गाजला?
धानोरकर : चंद्रपूर तर सोडाच, पण वर्धा आणि गडचिरोलीतही दारुबंदी झालीच नाही. ती पूर्णपणे फसली. शेजारच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रमधून दारू येते. आपला महसूल बुडतो. मग दारुबंदी हवी कशाला? तिन्ही जिल्ह्यांतून ती हटवली गेली पाहिजे. दारुबंदीचा उपयोग वाटत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातच करा ना. 


प्रश्न : तुम्ही स्वत: या व्यवसायात आहात. त्यावरून निवडणुकीत आरोप झाले?
धानोरकर : माझा दारूचा व्यवसाय वीस वर्षांपूर्वीपासूनचा आहे. युतीचा आमदार असताना सारेच माझ्या प्रचाराला आले. त्या वेळी माझी दारूची तीन दुकाने होती. तेव्हा त्यांना माझा दारूचा व्यवसाय आठवला नाही. मीदेखील शिवसेनेचा आमदार असताना अहिरांच्या प्रचारात होतोच. दारूबंदीनंतर माझी चंद्रपूरमधील तीन दुकाने बंद झाली. आता एकच दुकान जिल्ह्याबाहेर सुरू आहे.


प्रश्न : पण दारूबंदीचा निर्णय युती सरकारचा होता?
धानोरकर : युतीचे नेते इकडे दारूबंदी लागू झाली पाहिजे म्हणतात. तिकडे उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे हे दुकाने सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत चालू ठेवा, असा आदेश काढतात. त्यांचे दुसरे मंत्री दारूबंदी पाहिजे म्हणून सांगतात. काय गंमत आहे. कामगार कामावर वेळेवर पोहोचत नाही म्हणून सकाळी आठ वाजताच दारूची दुकाने सुरू करा, असे अफलातून आदेश बावनकुळेंनी काढले आहेत. त्यांना तरी दारूबंदी हवी आहे का?

बातम्या आणखी आहेत...