आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध सीए म्हणाला, माझी दृष्टी गेलीय, दूरदृष्टी नाही; मी सोबत विश्वासू सहकारी ठेवून बॅलन्सशीटवर सही करेन !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पुण्यातील भूषण तोष्णीवाल याने अंध असूनही जिद्दीने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण केली. तेव्हा ऑल इंडिया सीए इन्स्टिट्यूट समोर प्रश्न पडला की, हा मुलगा सीए झाला खरा; पण महत्त्वाच्या बॅलन्सशीटवर सही कशी करणार? त्याचे उत्तरही विद्यार्थ्यानेच दिले. माझी दृष्टी गेलीय, दूरदृष्टी नाही. सर्वच सीए विश्वासू सहकाऱ्यावर अवलंबून असतात. मीही विश्वासू सहकारी तयार करेन. अंध असल्याने माझे काम अडणार नाही. या उत्तरानंतर मात्र त्याला सीए म्हणून प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आली. 

 

भूषण पिंपरी चिंचवड येथे राहतो. तो नुकताच औरंगाबादला आला होता. बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वर घोडके या विद्यार्थ्याला सीए परीक्षेचा अभ्यास करताना अपयश आल्याने त्याने अवघ्या विसाव्या वर्षी आत्महत्या केली. यामुळे सीए क्षेत्र हळहळले. नापास विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा औरंगाबाद सीए संघटनेने घेतली. यास भूषण उपस्थित होता. त्याने अडचणींचा डोंगर पार करत मी सीए कसा झालो, कोणत्या अडचणी आल्या, त्यातून मार्ग काढत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत अधिकारी म्हणून नोकरीपर्यंत मजल कशी मारली याची यशोगाथा सांगितली. 

 

सीए होताच संघटनेसमोर पेच : भूषण २०११ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झाला. पण तो बॅलन्सशीटवर सही कशी करणार, असा प्रश्न ऑल इंडिया सीए इन्स्टिट्यूटला पडला. त्याला खास संघटनेसमोर बोलावण्यात आले. तेव्हा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या भूषणला तज्ज्ञांनी विचारले, आपल्या क्षेत्रात डोळ्याने बघितल्याशिवाय बॅलन्सशीटवर सही करता येत नाही. तू हे काम कसे करणार? त्यावर भूषण म्हणाला, सर्व जग विश्वासावरच चालत आहे. मी विश्वासू सहकारी निर्माण करीन. त्यांच्याकडून हे काम करवून घेईल. मोठे सीए देखील विश्वासू सहकाऱ्यांवर अवलंबून असतात. 

 

शास्त्रीय संगीताचे ३०० कार्यक्रम : भूषणने शास्त्रीय संगीतातही करिअर केले आहे. लहानपणीच त्याला गायनाची आवड निर्माण झाली. वडील नंदकिशोर तोष्णीवाल म्हणाले की, आम्ही अनेक ठिकाणी गायनाचा क्लास लावण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा पुण्याचे प्रख्यात गायक, तबलावादक आणि नर्तक बाजीराव सोनवणे त्यांनी घरी येऊन त्याला शिकवणे सुरू केले. वयाच्या पाचव्या वर्षी भूषणने सवाई गंधर्व महोत्सवात पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल यांच्या मैफलीत शास्त्रीय गायन सादर करून वाहवा मिळवली. 

 

आता बनला मोटिव्हेशनल गुरू : भूषण म्हणाला, भारतभर माझे ३०० पेक्षा जास्त संगीताचे कार्यक्रम झाले आहेत. त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला. अपयशाची भीती कधीच वाटली नाही. संगीत श्वास आणि सीए हा ध्यास होता. त्यामुळे दोन्ही क्षेत्रांत करिअर करता आले. तो भावगीत, सुगम गीतांसह कर्नाटकी, गझल गायन करतो. सीएच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्याने मानाचे स्थान पटकावले आहे. या गुणांमुळे तो आता मोटिव्हेशन गुरू बनला आहे. देशभर त्याने २०० पेक्षा जास्त ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर केले आहेत. 

 

जन्मानंतर विसाव्या दिवशी अंधत्व आले 
भूषणची देहबोली एखाद्या सिनेमातील स्टारसारखीच आहे. अंगात निळ्या रंगाचा सूट घालून तो मंचावर आला, तेव्हा तो अंध असल्याचे जाणवलेदेखील नाही. दिव्य मराठीशी गप्पा मारताना त्याने सांगितले की, जन्मानंतर विसाव्या दिवशी अंधत्व आले. त्यामुळे पहिलीपासून अंध शाळेत शिकलो. भूषणला त्याच्या वडिलांनी अंध शाळेतून काढून सामान्य मुलांच्या शाळेत घातले. तेव्हा तो बाजूला बसणाऱ्या मुलांना विचारून अभ्यास करू लागला. दहावीत ८७ टक्के गुण मिळाल्यावर सीए होण्याचे ध्येय ठेवले. बारावीनंतर सीएचा अभ्यास सुरू केला. सीएची कोणतेही पुस्तके ब्रेल लिपीतून किंवा ऑडिओ कॅसेटच्या रूपात नाहीत. त्यामुळे आई-वडील पुस्तके वाचायचे आणि भूषण एेकायचा असा. असा अभ्यास करत तो पहिल्याच प्रयत्नात सीए झाला. 

बातम्या आणखी आहेत...