आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रलयानंतरचे उपाय : पूरग्रस्तांसाठी राज्यात ४४१ तात्पुरती निवारा केंद्रे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हल‍वण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या नागरिकांसाठी ४४१ तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३३ पथकांसह लष्कर, नौदल, तटरक्षक दलाची एकूण १११ बचाव पथके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील ७० तालुक्यांना पुराचा फटका बसला अाहे. यातील पूरग्रस्त गावांची संख्या ७६१ आहे.  सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांत १०५ बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४, तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील २ लाख ४७ हजार ६७८, तर सांगली जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील १ लाख ७३ हजार ८९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०८, तर सांगली जिल्ह्यात १०८ तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
सातारा जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ११८ गावांमधील ९ हजार ५२१, ठाणे जिल्ह्यामधील ७ तालुक्यांतील २५ गावांमधील १३ हजार १०४, पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील १०८ गावांमधील १३ हजार ५००, नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ५ गावांमधील ३ हजार ८९४, पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील ५८ गावांमधील २ हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १२ गावांमधील ६८७, रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ६० गावांमधील ३ हजार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १८ गावांमधील ४९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
 

अलमट्टीतून ५.४० लाख विसर्ग
अलमट्टी धरणातून ५ लाख ४० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे साेमवारी सकाळी ८.३० वाजता बंद झाले असून, सध्या धारणातून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून ४८ हजार ८९३ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी आज सकाळी दिली. काेल्हापुरातील पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी साेमवारी सकाळी ७ वाजता ४९ फूट हाेती. एकूण ८४ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत.  
 

राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे ६० डॉक्टरांचे पथक  
सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील पूरग्रस्तांवर उपचार करण्यासाठी, त्यांना आवश्यक आराेग्य सुविधा देण्यासाठी राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने ६० डॉक्टरांच्या ६ टीम रवाना झाल्या आहेत. 

पूरग्रस्त महिलांना ४५ हजार सॅनिटरी नॅपकिन्स
सांगली, कोल्हापूर व सातारा येथील पूरग्रस्त महिलांना महिला व बालकल्याण खात्याकडून प्रत्येकी ८ याप्रमाणे एकूण ४५ हजार सॅनिटरी नॅपकिन्स पाठवण्यात येणार आहेत. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी हा निर्णय घेतला.
 

संभाजीराजे, आठवलेंकडून घोषणा, रितेशकडून २५ लाख
> पूरग्रस्त लाेकांच्या मदतीसाठी खासदार निधीतून ५ काेटी रुपये खर्च करण्याची छत्रपती संभाजीराजे यांची घाेषणा
> सांगली, काेल्हापुरातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ५० लाखांचा खासदार निधी देण्याची घाेषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
> अभिनेता रितेश देशमुख व पत्नी जेनेलिया यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश दिला.
 

मुंबई- पुणे मार्गावर एसटीच्या जादा बसेस
मुंबई- पुणे मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत नसल्याने एसटी महामंडळाच्या जादा बसेस या मार्गावर साेडण्याचा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. शिवनेरीच्या दरराेज ३२ अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या आहेत.
 

पुण्यातून ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू रवाना, आणखी पाठवणारपुणे | पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत ३२ ट्रक भरून जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठवण्यात आल्या आहेत. अभिनेते सुबोध भावे यांनी आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या पूरग्रस्तांना कोणत्या वस्तू व साहित्याची आवश्यकता आहे, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. आयुक्त कार्यालयाने त्यांना आवश्यकता असणाऱ्या वस्तूंची यादी दिली.
 

साधेपणाने ईद साजरी करत मुस्लिम बांधवांकडून मदत
सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यातील पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी सोमवारी अत्यंत साधेपणाने बकरी ईद साजरी केली. तसेच सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक मदतीसह वस्तूरूपाने साहाय्य केले. पुराने कोकणासह पश्चिम महाराष्ट्र मोठ्या संकटात असताना बकरी ईदचा हा सण साधेपणाने साजरा करण्याचा समाजबांधवांनी एकत्रितपणे निर्णय घेतला.  सकाळी नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसह कपडे, अन्य सामान एकत्र केले. ते पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...