आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Posters Of Three Khalistani Footballers, Including Bhindranwale, Appeared In A Pakistan Video

पाकिस्तानच्या व्हिडिओमध्ये भिंद्रनवालेसह तीन खलिस्तानी फुटीरवाद्यांचे पोस्टर दिसले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्तारपूर कॉरिडॉर अमरिंदर म्हणाले-पाकचा छुपा अजेंडा आहे हे मी आधीपासूनच म्हणत होतो
  • मनमोहन सिंगांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा द्यावी : भारत

नवी दिल्ली : कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे गुरुद्वारासाहिबला जाणाऱ्या भारतीय भाविकांच्या स्वागताप्रीत्यर्थ पाकिस्तान सरकारने एक वादग्रस्त व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत खलिस्तानी फुटीरवादी जर्नैलसिंह भिंद्रनवाले, मेजर जनरल शबेगसिंह आणि अमरिकसिंह खालसा यांचे पोस्टर दिसत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या प्रकरणी चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्याच्या मागे पाकिस्तानचा एक छुपा अजेंडा आहे, हे मी सांगत होतो.


अमरिंदरसिंग म्हणाले की, 'मी पहिल्या दिवसापासूनच म्हणत होतो की, पाकिस्तानचा एक छुपा अजेंडा आहे. पाकिस्तान एकीकडे प्रेम दाखवत आहे, तर दुसरीकडे तो आमच्यासाठी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण त्याच्या उद्देशाबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.' पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे सोमवारी जारी केलेल्या या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला भिंद्रनवाले, शबेगसिंह आणि खालसाचे पोस्टर दिसत आहेत. हे तिघेही जून १९८४ मध्ये सुवर्णमंदिरात झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये मारले गेले होते.

अमृतसरमध्ये लागले सिद्धू, इम्रानच्या प्रशंसेचे होर्डिंग
कर्तारपूर कॉरिडॉर खुला होण्याच्या आधी अमृतसरमध्ये काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची प्रशंसा करणारे होर्डिंग दिसले. एका होर्डिंगवर लिहिले होते की, 'कर्तारपूर कॉरिडॉरमागील खरा नायक. याचे श्रेय नवज्योतसिंग सिद्धू आणि इम्रान खान यांना जाते हे आम्ही पंजाबी स्वीकारत आहोत.' मंगळवारी दिसलेले हे होर्डिंग महानगरपालिकेने हटवले होते. दुसरीकडे, भाजपने निशाणा साधताना म्हटले की, सिद्धू हे भारतात आयएसआय या गुप्तचर संघटनेचे एजंट आहेत हे या होर्डिंगवरून सिद्ध होते.

पासपोर्टपासून सवलत देण्याचा उद्देश काय? : अधिकारी

दिल्ली : कर्तारपूूरला जाणाऱ्या भाविकांना पासपोर्ट आवश्यक आहे की नाही हे पाकिस्तानने स्पष्ट करावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. इम्रान खान यांनी अलीकडेच ट्विट करून म्हटले होते की, पासपोर्टची गरज असणार नाही, पण दोन्ही देशांत झालेल्या करारानुसार तो आवश्यक आहे. सूत्रांनी सांगितले की, जर कुठला बदल झाला असेल तर करारात दुरुस्ती करावी लागेल. आमच्या सुरक्षा संस्था सतर्क आहेत. भारतात फुटीरवादाला बळ देणे हा पाकचा उद्देश आहे. सुरक्षा संस्थांशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांच्या मते, ऐनवेळी पासपोर्टची गरज नसल्याची सवलत देण्याचा हेतू दहशतवाद्यांना घुसखोरी करू देणे हाही असू शकतो.

मनमोहन सिंगांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा द्यावी : भारत
कर्तारपूर कॉरिडॉरने नऊ नोव्हेंबरला पाकिस्तानला जाणाऱ्या उच्चस्तरीय जथ्थ्याच्या सुरक्षेबाबत बुधवारी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ५५० लोकांच्या जथ्थ्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचाही समावेश आहे. हा जथ्था सीमेवरून पुढे गुरुद्वारा साहिबपर्यंत पाकिस्तानच्या सीमेत चार किलोमीटर आत जाईल. मनमोहन सिंग यांच्यासाठी पाकिस्तानने बॅटरीवर चालणाऱ्या आणि चारही बाजूंनी खुल्या असलेल्या वाहनाची सोय केली आहे. त्यांच्या झेड प्लस सुरक्षा प्रोटोकॉलशी हे मिळतेजुळते नाही. भारताने पाकिस्तानला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह संपूर्ण जथ्थ्याला विशेष सुरक्षा व्यवस्था देण्यास सांिगतले आहे. बंदोबस्त पाहण्यासाठी आधी एका चमूलाही तेथे पाठवण्याची परवानगी मागवण्यात आली आहे. अद्यापपर्यंत पाकिस्तानकडून त्यावर कुठलेही उत्तर मिळालेले नाही. पाकिस्तानने कार्यक्रमांचा सर्व तपशीलही दिलेला नाही. सूत्रांच्या मते, पाकिस्तानने त्याला होकार दर्शवला नाही तर डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह संपूर्ण जथ्था स्वत:च्या जोखमीवर जाईल. या जथ्थ्यात केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी आणि हरसिमरत कौर, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल आणि १५० खासदारांचा समावेशही असेल. सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये शीख्स फॉर जस्टिस यांसारख्या खलिस्तानी गटांच्या आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांमुळे सरकार पहिल्या जथ्थ्याच्या सुरक्षेबाबत खूपच चिंतित आहे.
 

बातम्या आणखी आहेत...