MahaElection / MahaElection : राज्यातील पूरपरिस्थितीमुळे निवडणुका पुढे ढकला, राज ठाकरे यांची मागणी

निवडणूक पुढे ढकलन्या संदर्भात निवडणूक आयोगाला लिहिणार पत्र

विशेष प्रतिनिधी

Aug 11,2019 10:51:00 AM IST

मुंबई - सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना तिथे लष्कर का पाठवले नाही? जे नुकसान झाले आहे ते भरून यायला, माणसे स्थिर व्हायला वेळ लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहे. ती पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी केली. तसेच याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी म्हटले.


राज ठाकरे यांनी पूरग्रस्त स्थिती आणि सरकारच्या मदतीबाबत बोलताना म्हटले की, राजकीय पक्षप्रवेश आणि यात्रा यात भाजप आणि शिवसेना मश्गुल आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नाही. आम्ही अन्नाची पाकिटे वाटली, परंतु त्यावर मनसेची लेबले लावली नाहीत. निवडणुकीत २२० जागा येतील असे छातीठोकपणे सांगणाऱ्यांना एवढा पाऊस पडल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज आला नाही का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला.


राज ठाकरे पुढे म्हणाले, पक्ष आणि मतभेद बाजूला ठेवून जे पूरग्रस्त आहेत त्यांना मदत केली गेली पाहिजे. नैसर्गिक संकट येते तेव्हा अशाच धोरणाचा अवलंब करायचा असतो. मात्र या सरकारला निवडणूक आणि सत्ता उपभोगणे याशिवाय काहीही दिसत नाही असेही ते म्हणाले.भाजपला सत्तेचा माज आला आहे. महापुरासारखी घटना घडली तरीही हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करते आहे.

X
COMMENT