आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबी निर्मूलनाचा ध्यास!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिजित बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी एस्तेय यांच्या कामाकडे सगळ्या जगाचे लक्ष वेधले गेले. मूळ भारतीय आणि जन्माने मुंबईकर असलेले बॅनर्जी पती-पत्नींनी गरिबी निर्मूलनासाठी केलेला अभ्यास, त्यासाठी त्यांनी स्वत: शोधलेली पद्धत, त्यातून सूचवलेले उपाय हे गरिबीशी सामना करणाऱ्या जगातील अनेक देशांच्या सरकारांना एक मार्गदर्शक मैलाचा दगड ठरले आहेत. गरिबी निर्मूलन, गरीब मुलांच्या शिक्षणातले अडथळे, युवकांच्या रोजगारांची समस्या, गरिबांचे आरोग्याचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरील त्यांच्या अभ्यासामध्ये गरीब माण्ूस हा केंद्रस्थानी आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केल्यानंतर एस्तेय डुफ्लो यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याशी लग्न केले. वातानुकूलित खोलीत बसून समोर येणाऱ्या आकडेवारीच्या अभ्यासावर आधारित निष्कर्ष काढणे, उपाय सूचवणे ही अनेक अर्थतज्ज्ञांची खासीयत. पण बॅनर्जी पती-पत्नी हे त्याला अपवाद. प्रश्न आहे त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करणे, प्रयोग, प्रात्यक्षिके करणे, त्यानंतर निष्कर्ष काढत उपाय सूचवणे, पुराव्यांवर आधारित धाेरण निश्चिती ही त्यांच्या कामाची सर्वसाधारण पद्धत. अर्थशास्त्राच्या जगभरातील अभ्यासकांसाठी त्यांची ही पद्धत मोठे दालन खुले करणारी आहे. गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक स्तरावरची मोठी पावले उचलण्यापेक्षा छोट्या गटांच्या किंवा वैयक्तिक स्तरावर उपाय करण्याचा मार्ग हा त्यांच्या अभ्यासातूनच समोर आला. तामीळनाडूत त्यांनी प्राथमिक शाळांमधील शिक्षणातलेे विविध प्रकारचे हस्तक्षेप, कष्टकरी युवकांच्या बाजारपेठेतील समस्या त्यांनी अभ्यासली होती. राजस्थानमध्ये गरीब महिला आपल्या मुलांना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रांकडे आणत नसत. तेथे जाऊन त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी लसीकरण करणाऱ्या मातांना डाळीची पिशवी भेट देण्याची सूचना केली. त्याच्या अंमलबजाणीनंतर लसीकरणाचे ध्येय पूर्ण होऊ लागले. अनेक देशांतील सरकारे सामाजिक कल्याणकारी योजनांवर खूप पैसे खर्च करतात. पण त्यातून निष्पत्ती फारशी हाेत नाही. देशादेशात जाऊन केलेल्या अभ्यासानंतर बॅनर्जी पती-पत्नींनी सूचवलेले उपाय अनेक सरकारांना गरिबी निर्मूलनाची धोरणे ठरवताना उपयुक्त ठरत आहेत. मुक्त व्यापार व त्यातून होणारा विकास यावर आधारित त्यांच्या लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाकडे जगाचे लक्ष आहे. दोन दशकांपूर्वी मुक्त व्यापाराचे सूत्र जगात अमलात आले. त्यातून काही देशांमध्ये पैशाची सूज आली. व्यापार युद्धे होऊ लागली. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्या तेच होते आहे. भारताच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबद्धल त्यांनी नुकतेच केलेल्या एका भाषणात गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याप्रमाणे त्यांचेही परखड मत आहे. अर्थव्यवस्थेचा गाडा योग्य मार्गावर आणण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचा हस्तक्षेप थांबण्याची अवश्यकता त्यांनी व्यक्त केली होती. नोबेल पुरस्कार जाहीर केल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणाऱ्या पंतप्रधानांना ही सूचना पचनी पडणे कठीण आहे.  

बातम्या आणखी आहेत...