आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूत्रसंचालकांचा गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही कार्यक्रम होऊन बरीच वर्षे लोटली तरी त्यातील कवित्व मात्र कायम राहते. त्या कार्यक्रमातील एखादे वाक्य कायम स्मरणात राहते. त्या प्रसंगाची आठवण झाली तरी आनंदाच्या उकळ्या फुटतात. अकोल्यातील एका शाळेमध्ये पंधरा-सोळा वर्षांपूर्वी कार्यक्रम झाला. ‘जाणता राजा’ प्रयोगादरम्यान बाबासाहेब पुरंदरे या भागात होते. आयोजकांनी शाळेच्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलावले. कार्यक्रम सुरू झाला. बाबासाहेबांचे भाषण झाले. त्या भाषणाची स्मृती आजही कायम आहे. अतिशय उद्बोधक विचार बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले होते. कार्यक्रम पुढे सरकत होता. दरम्यान, संचालनकर्त्यांनी पुढील वाटचालीसाठी बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद मागितला. त्या वेळी ते अशा काही आविर्भावात म्हणाले, ‘बाबासाहेब देणार ना आम्हाला आशीर्वाद!’ त्यांचे हे आर्जवी वाक्य मला आजही आठवते. अशा अनेक गमती-जमती अकोल्यातील सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमात घडत राहतात. त्यातील काही प्रसंग आयुष्यभर स्मरणात राहतात. दुसरा प्रसंग, अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जनता दल सरकारच्या काळातील घडला. अकोल्यातील एक ज्येष्ठ सर्जन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होते.
तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहंमद सईद कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते. त्यांना यायला उशीर झाला. तेव्हा डॉक्टर साहेबांच्या हाती ध्वनिक्षेपक होता. त्यावरून त्यांनी, ‘हमारे गृहमंत्रीजी का विमान क्यों नही आ रहा,’ असे म्हणताच सगळीकडे हशा उसळला. गृहमंत्र्यांना विलंब व्हायला नेमके काय कारण घडले, हे जनता दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती नव्हते. आयोजकांची घालमेल होत होती. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्यामुळे आयोजकांना काळजी वाटणे साहजिक होते. त्या वेळी डॉक्टरसाहेबांनी अनेक गमतीशीर प्रसंग सांगून लोकांना हसवले. सायंकाळी उशिरा गृहमंत्री सभास्थानी दाखल झाले. आणि कार्यक्रम सुरू झाला. आजही त्या घटनेचे हसू येते.