आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेला राहुल महाराष्ट्र संघात; कोच जयदीप अंगीरवाल यांच्या मार्गदर्शनात घेतले धडे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत करण्याची जिद्द असली की निश्चित केलेल्या ध्येयाला गाठता येते. यासाठी येणाऱ्या संकटावर मात करण्याचे बळ सहज मिळते, याचाच प्रत्यय प्रतिभावंत युवा फुटबॉलपटू राहुल कडलगने आणून दिला. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत फुटबॉलचे धडे गिरवलेल्या या गुणवंत खेळाडूची प्रतिष्ठेच्या संतोष ट्रॉफीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे. त्याने पात्रता फेरीतच आपली चुणूक दाखवताना संघाला या स्पर्धेच्या मुख्य फेरीचे तिकीट मिळवून दिला. अशा प्रकारे पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीने संतोष ट्रॉफीसाठी तीन वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्र संघाला आपला आठवा खेळाडू दिला. 

 

१९९० च्या चॅम्पियन महाराष्ट्र फुटबॉल संघातील सदस्य खेळाडू आणि माजी प्रशिक्षक जयदीप यांच्या मार्गदर्शनाखाली राहुलला हा पल्ला गाठता आला. त्यांनी या युवा खेळाडूला आठ वर्षे प्रशिक्षण दिले. त्यामुळे राहुलला या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातील आपला प्रवेश निश्चित करता आला. जयदीप यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत क्रीडा प्रबोधिनीच्या सात खेळाडूंनी संतोष ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. 

 

आता राहुल गाजवणार संतोष ट्रॉफी 
पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये आपल्यातल्या फुटबॉलच्या छंदाला जोपासण्यासाठी युवा खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच आजच्या घडीला या ठिकाणावरून टॉप-५ चे फुटबॉलपटू घडले. यात निखिल कदमपासून सुखदेव पाटील, गजानन राजुळवाड, जुबेर देसाई, रविराज कुरणे, राजू मिरिल्यासारख्या प्रतिभावंत खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी संतोष ट्रॉफी गाजवली. आता राहुलची नजर या कामगिरीवर आहे. 

 

हलाखीच्या परिस्थितीत गुणवंत 
राहुलला हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत होता. मात्र, आई-वडिलांनी त्याला पुणे येथे मामाकडे ठेवले. यामुळे तो मामाकडे शिक्षण घेऊ लागला. यातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची प्रबोधिनीत निवड झाली. येथे प्रशिक्षण घेऊन त्याने ही मोठी संधी मिळवली. 

 

प्रचंड प्रतिभावान खेळाडू; मेहनतीचे फळ त्याला मिळाले : जयदीप 
राहुल कडलग हा प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याच्याच शैलीदार खेळी करण्याची दैवी देण आहे. त्यामुळेच त्याला प्रतिभेला चालना देता आली. त्याला आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावता आला. त्याच्यात उल्लेखनीय कामगिरी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याने आयएसएल व आय लीगच्या माध्यमातून हे वेळोवेळी सिद्ध केले,असे कोच जयदीप म्हणाले. 

 

प्रबोधिनीमध्ये गुणवंत खेळाडू 
पुणे येथील शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये फुटबॉलचेही प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी मिळणाऱ्या प्रशिक्षणातून आजच्या घडीला अनेक गुणवंत फुटबॉलपटू तयार झाले आहेत. माजी प्रशिक्षक जयदीप यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे येथील खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचावला. 

 

बातम्या आणखी आहेत...