विंडोसीट / आजीबाईचा बटवा

प्रासंगिक छायाचित्र प्रासंगिक छायाचित्र

नीतिनियम, परंपरा सारे काही मानवी जगणे अधिक सुखावह व्हावे, अधिकात अधिक लोकांचे भले व्हावे, यासाठी असतात

दिव्य मराठी

Dec 01,2019 12:14:00 AM IST

प्रदीप आवटे

नीतिनियम, परंपरा सारे काही मानवी जगणे अधिक सुखावह व्हावे, अधिकात अधिक लोकांचे भले व्हावे, यासाठी असतात. नीतिनियम आणि परंपरा मनुष्यमात्राला त्रास, वेदना आणि दुःख देण्यासाठी जन्माला आलेल्या नसतात. काही वेळा त्या मानवी हिताला आडव्या येऊ लागल्या तर त्यात आवश्यक ते बदल करण्याचा शहाणपणा दाखवता यायला हवा, ही लवचिकता नसेल तर उगीच दाखवलेल्या ताठरतेमुळे आपण आपले जीवन दुःखात ढकलतो, इतरांचे आयुष्य गुंतागुंतीचे करून टाकतो.

‘अडीच अक्षरांची गोष्ट’ बद्दल कॉलेज तरुणांशी बोलून आणि ‘प्रेमाची वारी’ चं अभिवाचन करून सावंतवाडीहून परतत होतो तेव्हाची गोष्ट. परतीच्या प्रवासात आमच्या हलक्याफुलक्या गप्पा सुरू होत्या. प्रमोद आणि निशा त्यांच्या लग्नाच्या वेळी घडलेल्या गमतीजमती सांगत होते. प्रमोद खरं म्हणजे त्याच्या आजीबद्दल बोलत होता. तो म्हणाला, “ मी आणि निशानं लग्न करायचं ठरवलं तेव्हा मी सगळ्यांसोबत ते माझ्या आजीलाही सांगितलं.” तो आजीला म्हणाला, “ आजी, आम्ही रजिस्टर मॅरेज करायचं ठरवलंय.” जवळपास चार दशकांपूर्वीचा काळ. आजी फक्त एवढंच म्हणाली, “ रजिस्टर मॅरेज म्हणजे काय असतं?” मग प्रमोदने तिला रजिस्टर मॅरेज म्हणजे काय हे समजावून सांगितले. त्यावर तिनं आणखी एक प्रश्न केला, “ आपल्याकडं या पद्धतीने कुणी लग्न केल्याचं आठवत नाही, नाही का रे ?” अर्थात त्यांच्या जवळपासच्या नातेवाइकांमध्ये कुणीच तोवर रजिस्टर पद्धतीने लग्न केलेलं नव्हतं. देवाब्राह्मणांसमोर हात हातात घेणं याला एक सामाजिक धार्मिक प्रतिष्ठा तर आहेच ना. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजीनं विचारलं, “तुम्हां दोघांनाही लग्नाची ही नवी पद्धत आवडली आहे का?”, यावर प्रमोदने होकारार्थी मान हलवल्यावर सत्तरी ओलांडलेली ती बाई अगदी सहजपणे म्हणाली, “ अरे मग काय, करून टाक तुला हव्या त्या पद्धतीने लग्न..”


पुण्यापर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारत राहिलो, पण प्रमोद मुजुमदारची ही अफलातून आजी माझ्या मनात रुंजी घालत राहिली. एका पूर्णतः नव्या गोष्टीला ही म्हातारी बाई किती सहजतेने सामोरी गेली होती. बदल, परिवर्तन हीच मानवी आयुष्यातील एक निश्चित अशी गोष्ट आहे, पण नव्याने येणारे बदल स्वीकारताना, ते आत्मसात करताना आपल्यापैकी अनेकांना खूप त्रास होतो. बाईने कोणते कपडे घालावे, एका खांद्यावरू पदर घ्यावा की दोन खांद्यांवरून, आधुनिक पोशाख घालावेत की घालू नयेत, पुरुषाने घरकामात बाईला मदत करावी की नाही, वंशाला दिवाच हवा, मुलगी का नको या आणि अशा छोट्या छोट्या वाटणाऱ्या बाबीतही आपण वाद घालून रक्त आटवत असतो. आपली जगण्याची खूप मोठी ऊर्जा आपण या बदलांना विरोध करण्यात, कधी कधी त्यामुळे एकमेकांच्या आयुष्यात नाहक गुंतागुंती निर्माण करण्यात खर्च होते. जगण्यातील परिवर्तनाला स्वीकारण्याची ही लवचिकता माणसाचं आयुष्य सहजसुंदर करते, ही लवचिकता जगण्याचे नव्या काळाशी सुसंगत असे रस्ते प्रशस्त करण्यास साह्यभूत ठरते. खरं म्हणजे नीती, परंपरा, संस्कृती या साऱ्यांबद्दल एक सामान्य माणूस म्हणून आपण फारच अडाणी असतो. या साऱ्या संकल्पनांचा आत्मा, गाभा अनेकदा आपल्याला कळत नाही आणि आपण त्या गाभ्याभोवतीच्या फोलपटालाच कवटाळून बसतो. बदलत्या काळानुसार जगण्याच्या अनेक गोष्टींकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलत असतो. त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक असते. हे म्हणजे उन्हात चालताना हाती घेतलेल्या छत्रीसारखं आहे अगदी. ऐन दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असताना आपण छत्री अगदी डोक्यावर धरू, पण दुपारी तीन – चारच्या आसपास सूर्य कलल्यावरही आपण छत्री तशीच ठेवली तर लोक त्याला वेड्यात काढतील. काळानुसार अनेक गोष्टी बदलत असतात, याचं भान ठेवणं आवश्यक आहे. प्रमोदच्या या आजीला मी यासाठी मानलं की बदल स्वीकारण्याची तिची पद्धत मला अगदी शास्त्रशद्ध वाटली. आपण अनेक नव्या गोष्टींना समजावून न घेताच ते केवळ ती नवी आहे, ती जुन्या पद्धती मोडीत काढते आहे म्हणून विरोध करतो. इथं मात्र ही म्हातारी पहिल्यांदा नातवाकडून ही नवी पद्धत नेमकी काय आहे, हे समजावून घेते. ते समजल्यावर तिला स्वतःला त्यात फार काही आक्षेपार्ह वाटत नाही, पण आपल्या जवळच्या सोयीरसंबंधात कुणी या पद्धतीने लग्न केल्याचे दिसत नाही, त्यामुळं या गणगोताला काय वाटेल, याचा किंचित विचार तिच्या मनात तरळून गेल्याचे आपल्याला दिसते. पण मग ती त्या सूक्ष्म भीतीवर क्षणार्धात मात करुन मुळात आता ज्यांना लग्न करायचे आहे त्या जोडप्याला ही पद्धत आवडते आहे की नाही, हे महत्त्वाचं या विचारापर्यंत येते आणि त्या दोघांना ही नवी पद्धत मान्य असेल तर इतर कशाचा विचार करण्याची गरज नाही, इथवर येऊन पोहचते. घटनेतील व्यक्तिस्वातंत्र्य आणि प्रत्येकाचे मूलभूत अधिकार याची आठवण व्हावी, इतकी या आजीची विचार करण्याची पद्धत लोकशाहीवादी आहे.


या आजीइतके लोकशाहीवादी आपण झालो तर प्रत्येक नवा बदल घासूनपुसून स्वीकारताना आपल्याला फारसा त्रास होणार नाही. मुळात आपल्याला इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला फार आवडतं की काय, कोण जाणे? अगदी आपली पोटची पोरं असली तरी त्यांना त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे,हे आपण अनेकदा समजून घ्यायला अपुरे पडतो. आणि नाही त्या गोष्टी मात्र आपण विनाकारण स्वीकारत जातो. आपल्या सार्वजनिक गणपती उत्सवाचं उदाहरण घ्या. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध आपलं संघटन अधिक मजबूत व्हावं या उद्देशानं हा उत्सव सुरू झाला. पण आता गणेशमूर्तींची संख्या इतकी वाढली की जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश विसर्जन हौदात करावे, असा पर्याय पुढं आला तर अनेकांचा अजूनही त्याला विरोध आहे. धार्मिक संकेतानुसार विसर्जन हे वाहत्या पाण्यातच करायला हवे, असा त्यांचा आग्रह. पण तेच विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर नको म्हटलं तर अनेकांनी त्याला तीव्र विरोध केला. कोणत्या ग्रंथात डीजेचा उल्लेख आहे ? एकूण काय नव्या काळाची आव्हाने लक्षात घेऊन आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात काही आवश्यक बदलांना आपलेसे करणे आवश्यक असते. मला महात्मा फुले आठवतात. त्यांच्या काळात बालविधवांचा प्रश्न मोठा होता. लहान वयात प्रौढ माणसाशी लग्न झाल्याने या मुलींमध्ये विधवा होण्याचे प्रमाण मोठे होते. पंधराव्या- सोळाव्या वर्षी किंवा त्याहूनही लहान वयात विधवा झालेल्या या मुलींना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता.त्यांचं केशवपन केलं जाई. स्वाभाविकपणे या विधवा मुलींचे कुठेतरी छुपे संबंध आले आणि त्यातून त्या गरोदर राहिल्या की अब्रूच्या भीतीने या पोरी आत्महत्या करत. फुल्यांनी त्या काळी अशा संबंधातून गरोदर राहिलेल्या बायकांना निर्भयपणे आपल्या बाळाला जन्म देता यावा, म्हणून स्वतःच्या घरी सूतिकागृह सुरू केले. तसा चक्क बोर्ड लावला. हे किती तरी मोठे धाडस होते. अनेकांना ते अनैतिक वाटले. पण आपल्या नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना अनेकदा तुटलेल्या पतंगासारख्या नको तिथे गोते खात असतात. नीती म्हणजे शहाणपणाने जगण्याचा मार्ग, एवढीच खरं म्हणजे नीतीची व्याख्या असते. आणि शहाणपणाने जगणे म्हणजे काय आपल्या सुखामुळे इतर कुणाच्या जीवनात व्यत्यय येऊ नये, इतर कुणाला त्रास होऊ नये एवढंच! कोणताही धर्म कुणाच्या जीवनात जाणीवपूर्वक दुःख निर्माण करा, असे सांगत नाही. उलटपक्षी दुःख निर्माण झाले तर त्यातून सुखाचा मार्ग कसा शोधता येईल, हे पाह्यला हवे. विधवांना विवाहाची परवानगी नाकारताना त्या वेळचा समाज त्यांचा सुखावरील नैसर्गिक हक्कच नाकारत होता. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागरांपासून आपल्याकडे फुले, आगरकर, कर्वेंपर्यंतची मंडळी यासाठीच तर झगडत होती. फुल्यांनी तर एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन एका खऱ्याखुऱ्या नैतिकतेचा पाठच आपल्यासमोर घालून दिला आहे.


गोष्ट अगदी साधीसुधी आहे. नीतिनियम, परंपरा सारे काही मानवी जगणे अधिक सुखावह व्हावे, अधिकात अधिक लोकांचे भले व्हावे, यासाठी असतात. नीतिनियम आणि परंपरा मनुष्यमात्राला त्रास, वेदना आणि दुःख देण्यासाठी जन्माला आलेल्या नसतात. काही वेळा त्या मानवी हिताला आडव्या येऊ लागल्या तर त्यात आवश्यक ते बदल करण्याचा शहाणपणा दाखवता यायला हवा, ही लवचिकता नसेल तर उगीच दाखवलेल्या ताठरतेमुळे आपण आपले जीवन दुःखात ढकलतो, इतरांचे आयुष्य गुंतागुंतीचे करून टाकतो. प्रमोदच्या आजीमुळं हे सारं आठवलं. इंग्रजी औषधांनाही दाद न देणाऱ्या भल्याभल्या दुखण्यांना उतार पडणारी काही औषधे आजीबाईच्या बटव्यात असतात, हे अनुभवाने आपल्याला ठाऊक आहे, पण तुमचं माझं जगणं अधिक सुखकर, हितकर करणारं असं काही शहाणपणही अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या तिच्या चंदेरी केसातून आणि सुरकतलेल्या चेहऱ्यावरुन ओघळत असते. आपल्याला ते टिपता यायला हवे. आपलं निखळ माणूस असणं हीच हे शहाणपण मिळवण्याची एकमेव अट आहे.


लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

X
प्रासंगिक छायाचित्रप्रासंगिक छायाचित्र