आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्दा है पर्दा…

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीप आवटे  

खरं म्हणजे हे नियम केवळ आयफोनसाठी नाही तर आपल्या जगण्याचेच नियम आहेत हे. या सतत बदलणाऱ्या जगात तू लहानाचा मोठा होतो आहेस. तुझं सामर्थ्यशाली मन आणि विशाल हृदय हे कोणत्याही मशीनपेक्षा श्रेष्ठ आहे, हे विसरू नकोस. ज्या पडद्याने आपले अवघे जगणे व्यापून टाकले आहे त्यापल्याडचे खरेखुरे जग आपल्याला खुणावते आहे. 
 


“हॅलो ऽ हॅलो ऽ, काय म्हणालात कोण बोलतंय? कमाल आहे तुमचीपण, ओळखलं नाही मला? अरे मी इतक्या जवळचा तुमच्या! तुम्ही जेवत असा की बाथ घेत असा,टॉयलेटमध्ये असा की लोळत असा, गाडी चालवत असा की मीटिंगमध्ये असा, मी तुमच्यासोबत असतो आणि तुम्ही मलाच विचारताय कोण बोलतोय म्हणून! अहो अगदी त्या वेळीसुद्धा मी तुमच्याजवळ असतो, अगदी त्या वेळी!” 

 
पलीकडून मोठ्याने हसण्याचा आवाज आला. 


“अरे मैं आप का मोबाइल बोल रहा हूं” 


“हे रात्रीची उतरली नाही की असं होतं, मोबाइल कुठं बोलतो का?’ मी स्वतःशीच पुटपुटलो तसं माझ्या मनातील भाव वाचल्यागत तो म्हणाला, “मला माहीत आहे, रात्री किती प्यायलास तू ते और आप के साथ कौन था, उस वक्त भी मैं आप के साथ था. तुझा सारा डेटा माझ्या जवळ आहे.मोबाइल ही जानता है मालिक का सच्चा और पूरा चरित्र!’ 


आणि मी एकदम सावध झालो. आता तो एकदम एकेरीवर आला होता.

“दिवसातून शंभर वेळा तरी तू माझ्यात डोकावत असतोस, इतका वेळा तर तू तुझ्या बायकोकडेदेखील पाहत नाहीस ना पोराबाळांकडे! आईबाची तर गोष्टच सोडून दे! मेरा छोटासा पर्दा ही अब तुम्हारी पुरी दुनिया है भिडू .. पर्दा है पर्दा , और पर्दे के पीछे कोण कोण लपलंय, तुम्हे क्या पता? तुम्हारे लिए स्क्रीन इज वर्ल्ड ऽ बस्स!’

माझ्यासमोर आजचं भलंथोरलं वर्तमानपत्र पसरलंय. नवऱ्याचा मोबाइल बायकोने घेतला, पाह्यला म्हणून दोघांची तुंबळ मारामारी - दोघे एकमेकांना चावलेत चक्क! सेल्फी घेताना कुणी तरी कड्यावरून कोसळलाय, बस स्टॉपवर बसची वाट पाहत गेम खेळत बसलेल्या आईचं अडीच-तीन वर्षांचं लेकरू गाडीखाली आलंय…! मला पेपर वाचवत नाही म्हणून मी पेपर फेकून देतो तर शेजारी पाच-सहा वर्षांचं पोर आईचा मोबाइल घेऊन कसले कसले गेम्स खेळतंय. गेममधल्या बंदुकीने माणसं, पाखरं दणादण उडवतंय. मी घाबरून त्याच्या हातातील व्हर्च्युअल गन कधीही खरी होईल म्हणून तिथून उठतो आणि टीव्ही सुरू करतो… आणखी एक पडदा.! 

मग मला चिनूच्या शाळेतील परवाची पालक सभा आठवते. मोबाइलमध्ये पाहत चिनूच्या मॅडमनी त्यांना व्हाॅट्सअॅपवर आलेला लेख वाचून दाखवला होता, “मोबाइलच्या अतिरेकी वापराचा परिणाम मुलांच्या मेंदूवर होतो. मेंदूचे आकारमान कमी होते, मुख्य परिणाम मेंदूच्या पुढील भागावर म्हणजे फ्रंटल लोबवर होतो. फ्रंटल लोब हा मेंदूचा प्रोसेसर आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टी इथं होत असतात. त्यामुळं सर्वांगीण, सखोल विचार करण्याची प्रक्रियाच खुंटते. अटेन्शन स्पॅन म्हणजे एकाग्रता कमी होते. इन्सुला हा जो मेंदूचा भाग आहे तो सहवेदना, करुणा निर्मितीसाठी कारणीभूत आहे. या भागावर परिणाम झाल्याने मुले भावनिकदृष्ट्या कोरडी होण्याचा धोका संभवतो. भावनेच्या भरात वागणे, इम्पल्सिव्ह वागणे, हाही मोबाइल व्यसनाचा एक परिणाम आहे. दिवसा कल्पना पाहत राहणे, डे ड्रीमिंग ही सवय मोबाइलच्या अतिवापरामुळे संपुष्टात येते. डे ड्रीमिंग हे आपल्या सृजनशीलतेसाठी अत्यावश्यक बाब आहे. मोबाइल आणि गेम्सच्या अतिवापराचा परिणाम आपल्या स्मरणशक्तीवरही होतो, आपली स्मरणशक्ती अल्पजीवी होऊ लागते, इत्यादी इत्यादी.’ गावाकडल्या कोरड्या विहिरी आणि डोळ्यांत पाण्याचा लवलेश नाही, उथळ विचारांचा खळखळाट अशी कोरडी माणसं .. ! अशा भीषण दुष्काळाची मी कल्पनाही करू शकत नाही.
 
मग एक पालक म्हणाले, “अहो, मोबाइलचे व्यसन हे दारूपेक्षा भयंकर आहे. दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे होणाऱ्या अपघातापेक्षा गाडी चालवताना मोबाइल चॅटिंग केल्यामुळे होणारे अपघात किती तरी अधिक आहेत.’ मग त्यांनी गाडी चालवताना मोबाइल वापरला म्हणून त्यांना ट्राफिक पोलिसांनी-आज सकाळीच केलेल्या दंडाची पावती दाखवली, म्हणाले, “सरकार करतंय ते योग्यच आहे हो, आपण काळजी घेतली पाहिजे.’

मग स्वप्नाच्या आईसाहेब उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “आपल्या संस्कृतीत उपवासाची संकल्पना आहे. पूर्वी आपण एखाद्या दिवशी मौनदेखील ठेवायचो, तसंच आपण मोबाइल उपवास करायला काय हरकताये? “ 

“माझा भाचा आहे इस्रायलमध्ये तो सांगत होता.. तिकडे म्हणे वर्षातून एक दिवस नो मोबाइल डे पाळतात. अगदी कॅफे, थिएटरमध्येही तुम्हाला मोबाइल घेऊन प्रवेश मिळत नाही त्या दिवशी,’ कुणीतरी म्हणालं. बाहेर पडताना शाळेच्या पॅसेजमध्ये लिहलेला आइन्स्टाइनचा कोट मला दिसला, ““ I fear the day the technology will surpass our human interaction, the world will have a generation of idiots.”

मग मला ग्रेगरीची आई आठवली. जॅनेल हॉफमन तिचं नाव. या प्रेमळ आणि शिस्तप्रिय आईला तंत्रज्ञानाचे हे अवखळ वारू कसे आवरायचे हे नेमकेपणाने उमजले आहे. सहा-सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जॅनेलने आपल्या १३ वर्षांच्या ग्रेगरीला ख्रिसमसची भेट म्हणून आयफोन भेट दिला, पण आयफोनच्या डोक्यावर एक स्टार होता आणि लिहिलं होतं – कंडिशन्स अप्लाय म्हणजे अटी लागू ..तिनं हा आयफोन कसा वापरावा, याबद्दल एक अठराकलमी करार तयार केला होता आणि तो मान्य असेल तरच ग्रेगरीला हा फोन वापरायला मिळणार होता. छोट्या ग्रेगरीला मॉमचा थोडासा रागच आला होता. त्याच्या मित्रमैत्रिणींच्या मॉम्स किंवा पॉप्स पण आपल्या मुलामुलींना मोबाइल घेऊन देत होतेच की पण ते काही असल्या अटी घालत नव्हते. पण माझी मॉम म्हणजे मॉम आहे. जॅनेलचा हा करारनामा केवळ आपल्या मुलांसाठीच नव्हे तर तो  पालकांसाठीही महत्त्वाचा आहे. मुलांसोबत तो पालकांनीही पाळायला हवा. या अनोख्या मायलेकरांच्या अठराकलमी करारातील ही काही नंबरी कलमे -
 
हा फोन आईबाबांनी घेऊन दिलेला असल्याने त्याचा पासवर्ड त्या दोघांनाही माहीत असणं आवश्यक आहे.
रोज रात्री ७.३० वाजता हा फोन आईबाबांच्या ताब्यात असेल आणि रात्रभर बंद राहील. तो रोज सकाळी ७.३० ला  पुन्हा मिळेल.

मोबाइल शाळेत जाणार नाही. शाळेत मित्र-मैत्रिणींशी प्रत्यक्ष बोला, खेळा. तिथं मोबाइलचं काय काम? 
हा फोन हरवला, फुटला, खराब झाला तर त्याचा खर्च तुला करावा लागेल. त्यासाठी पार्ट टाइम काम करून पैसे कमव, खाऊचे पैसे, बर्थ डेचे पैसे वाचव पण ही जबाबदारी तुझीच असेल. 
फोनचा वापर खोटं बोलणं, फसवणं किंवा कुणाला तरी दुखावणं यासाठी केला जाऊ नये. 
जे तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष बोलू शकत नाही किंवा आपल्या आईबाबांसमोर मोठ्यानं बोलू शकत नाही, ते टेक्स्ट किंवा ई-मेल करू नका. 
नो पोर्न. तुला काहीही शंका असेल तर आईबाबांना विचार. जी साइट तू मॉमसमोर पाहू शकणार नाहीस, ती एकटा असतानाही पाहू नकोस. 
उगीच उठता बसता फोटो, व्हिडिओ काढत बसू नकोस. प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट करून ठेवायची गरज नाही. ही सारी चित्रे तुझ्या स्मरणात साठवली जातील, कित्येक वर्षे ! 
या फोनमुळे तुला म्युझिकचा खजिनाच मिळाला आहे. इतर लाखो जे ऐकताहेत त्यापेक्षा वेगळं आणि क्लासिक म्युझिक आवर्जून ऐक.

गेम्स खेळ पण शब्दांशी निगडित गेम्स, मेंदूला गुदगुल्या करतील असे ब्रेन टीझर्स गेम्स खेळत जा.
आणि एखादा वेळी फोन घरी ठेवून बाहेर पडत जा. प्रत्येकवेळी फोन सोबत असण्याची गरज नाही. हा मोबाइल म्हणजे काही तुझ्या शरीराचे एक्स्टेन्शन नाही, भिडू ! 

मुख्य म्हणजे डोळे उघडे ठेव, खिडकीतून बाहेर हा, पक्ष्यांचे संगीत ऐक, मस्त फिरायला जा. अनोळखी लोकांशी बोल. प्रत्येक गोष्ट गुगल करू नकोस, स्वतः शोधण्याचा प्रयत्न कर. 

हे सारं लिहून ही मॉम लिहिते – बेटा, खरं म्हणजे हे नियम केवळ आयफोनसाठी नाही तर आपल्या जगण्याचेच नियम आहेत हे. या सतत बदलणाऱ्या जगात तू लहानाचा मोठा होतो आहेस. तुझं सामर्थ्यशाली मन आणि विशाल हृदय हे कोणत्याही मशीनपेक्षा श्रेष्ठ आहे, हे विसरू नकोस. ज्या पडद्याने आपले अवघे जगणे व्यापून टाकले आहे त्यापल्याडचे खरेखुरे जग आपल्याला खुणावते आहे, आपल्या माना वर उचलून आपल्याला या खऱ्याखुऱ्या जगण्याला भिडायचे असेल तर जॅनेलच्या या करारावर आपल्यालाही मनापासून सही करावी लागेल. 

लेखकाचा संपर्क - ७५८८१६५२२१

बातम्या आणखी आहेत...