आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेच्या तासाला नव्हते त्यांच्यासाठी…

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीप आवटे  

ही धरती म्हणजे आपली आई. आपण तिची लेकरे. कुणी आधी जन्माला येणार, कुणी नंतर. इथले मूळ निवासी कोण, हा देश, ही भूमी कुणाची, अशी भांडणं म्हणजे थोरल्या पोरांनी आई फक्त माझी आहे, तिच्यावर धाकल्या भावंडांचा काहीही अधिकार नाही, असं म्हणण्यासारखं आहे. आईबापांना वृद्धाश्रमामध्ये पाठवायच्या या काळात त्या वसुंधरेची खरीखुरी काळजी कुणालाच नाही. प्रदूषण, क्लायमेट चेंजच्या या काळात खुद्द धरित्रीच तापाने फणफणली आहे, पण आपल्याला काळजी फक्त तिच्या वाटणीची! 
“माणसासारखा आडमुठा प्राणी मी पाहिला नाही, आणि म्हणे आपला मेंदू सर्वात मोठा,” डॉ. अशोक मिश्रांच्या या वाक्यावर काय बोलावं मला बराच काळ सुचलं नाही. दहा-बारा वर्षे झाली असावीत आता या गोष्टीला तेव्हा मी उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमध्ये होतो. फिरोजाबाद म्हणजे सुहाग नगरी, अवघ्या भारतातील बांगडी इथं तयार होते. इथले अडाणी, अल्पशिक्षित हिंदू-मुस्लिम कामगार ही बांगडी तयार करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमात मी काम करत होतो. तेव्हा इकडं मुंबईमध्ये परराज्यातील लोकांविरुद्ध आणि विशेषतः यूपी-बिहारच्या लोकांविरुद्ध जोरदार आंदोलन सुरू होतं. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांना, ते केवळ यूपी आणि बिहारमधील आहेत म्हणून काही वेडे कार्यकर्ते थोबाडीत मारण्याचे महत्कार्य करत होते. टीव्हीवर त्या संदर्भातील बातम्या सुरू असताना मी डॉ. अशोक मिश्रांच्या फिरोजाबाद येथील  बंगल्यावर दलिया खात बसलो होतो. एका यूपीतील भय्याला थोबाडीत मारताना पाहून मिश्रा माझ्याकडे पाहत हसले आणि म्हणाले, “… बोल तेरे साथ क्या सलूक किया जाय.” ते विनोदाने बोलताहेत याची बालंबाल खात्री असतानाही क्षणभर मी घाबरलो आणि मला काय बोलायचे तेच समजेना. 

मग तेच हसत हसत म्हणाले, “ चलो मुंबई चलते हंै प्रदीप और इन पागलों को समझाते है. अरे हमारे सौ भय्या लोग उधर है तो आप का एक प्रदीप भी है ना इधर.” मी गप्पच, काय बोलणार ?

मिश्रा म्हणाले, “ मोठं अवघड होतं चाललंय सारं. अरे मी तर निम्मा मराठीय बाबा, माझी आई धुळ्याची आहे यार. मी कोणत्या बाजूने उभा राहू ? ” 

आपला मेंदू मोठा पण आपला आडमुठेपणाही त्यामुळं मोठा आहे का ?  हे केवळ मुंबईत सुरू आहे किंवा सुरू असतं असं नव्हे, हे जगात सर्वच ठिकाणी या ना त्या रूपात पाहायला मिळतं. मग ते अमेरिका, मेक्सिको असो नाहीतर सिरिया, तुर्कस्तान! म्यानमारमधील रोहिंग्यांचा प्रश्न असेल नाही तर पाकिस्तानातील हिंदूंचा आणि शिया पंथीयांचा प्रश्न असेल. कोणताच धर्म आणि कोणताच देश याला अपवाद नाही.  काही वर्षांपूर्वी बर्लिनची भिंत पडली हाच एक अपवाद. नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण परस्परांमध्ये रोज नवीन भिंती उभारण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहोत. मी इथला मूळचा, हे इतर लोक नंतर आले, ते परके आहेत. ‘आपण’ आणि ‘ते’ अशी विभागणी करण्यात आपण आपले सारे बुद्धिकौशल्य पणाला लावत आहोत. कुणाला मुसलमान परके वाटतात तर कुणाला ब्राम्हण! आपल्याकडेही आर्य बाहेरून आले की ते मूळचे इथलेच यावर वाद सुरू असतात, कुणी स्वतःला ‘जय मूलनिवासी’ असंही म्हणून घेतात. इथं कोण पहिल्यांदा आला आणि कोण नंतर आला, यावरून भांडणं सुरू असतात. कुणी तेराव्या शतकात आलेला असतो तर कुणी आठव्या शतकात तर कुणी त्याहीपूर्वी…! इतिहासातील मढी उकरून एकमेकांची मढी रचायचा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या कमाल बुद्धिमान मेंदूचा कमाल आडमुठेपणा असतो. पण तो कमी वेळा आपल्या लक्षात येतो. मी शाळकरी पोर असताना असले वाद वाचताना मला त्या वयाला साजेशी तुलना मनात यायची. ही धरती म्हणजे आपली आई. आपण तिची लेकरे. कुणी आधी जन्माला येणार, कुणी नंतर. इथले मूळ निवासी कोण, हा देश, ही भूमी कुणाची अशी भांडणं म्हणजे थोरल्या पोरांनी आई फक्त माझी आहे, तिच्यावर धाकल्या भावंडांचा काहीही अधिकार नाही, असं म्हणण्यासारखं आहे. आईबापांना वृद्धाश्रमामध्ये पाठवायच्या या काळात त्या वसुंधरेची खरीखुरी काळजी कुणालाच नाही. प्रदूषण, क्लायमेट चेंजच्या या काळात खुद्द धरित्रीच तापाने फणफणली आहे पण आपल्याला काळजी फक्त तिच्या वाटणीची! 

आपण इतिहास वाचतो, पण आपल्याला सोयीस्कर तेवढाच! तो आपण पूर्ण वाचत नाही आणि वाचला तरी लक्षात घेत नाही. कोण आपले आणि कोण परके, हे ठरवताना आपण कोणत्या सालाचा विचार करतो? मुळात आपण हे लक्षात घेत नाही की, पहिला आधुनिक माणूस ज्याला आपण ‘होमो सेपियन’ म्हणतो तो काही लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत निर्माण झाला आणि तिथून तो जगभर पसरला. म्हणजे माणसाचा इतिहास हा असा स्थलांतराचा आहे. उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांवर भटकंतीचं आयुष्य, मग शेती असं करत माणूस वेगवेगळया भूभागात राहू लागला. जेव्हा मानवी उत्क्रांती आणि इतिहास आपण लक्षात घेतो तेव्हा मग कोण इथंला मूळचा आणि कोण परका या प्रश्नातील फालतूपणा आपल्याला पटत जातो. मागच्या लाखो वर्षांपासून माणूस फिरतो आहे, आज तर ती भटकंती अजून वाढली आहे. पण प्रवाहात वाहत असणाऱ्या दगडावर शेवाळ वाढत नाही, अशी एक इंग्रजी म्हण आहे तसं इतक्या भटकंतीतही आपल्याला गुंजभर शहाणपण काही चिकटायला तयार नाही, भले होमो सेपियन या शब्दाचा अर्थ ‘शहाणा माणूस’ असा होत असला तरी! ‘सब भूमि गोपाल की,’ ‘ हे विश्वचि माझे घर,’ ही वचने तर आपण प्रवचन-कीर्तनांपुरतीच मर्यादित केली आहेत. आपल्या जाणत्या संतांनी दिलेलं हे शहाणपण आपण अंगी बाणवायला तयार नाही आहोत. खराखुरा "होमो सेपियन' आपल्या विधिमंडळांमध्ये आणि संसदेमध्ये तर औषधालाही सापडायला तयार नाही.

‘पोटासाठी दाही दिशा, आम्हां फिरवीशी जगदीशा’ या वचनाप्रमाणे कधी पोटासाठी, कधी व्यापार-उदिमासाठी, कधी जुलमी राजवटीला घाबरून, कधी साहस, कधी औत्सुक्य  यामुळे माणूस जगभर फिरत राहिला आहे. या विलक्षण फिरण्यातूनच तर आजची मानवी संस्कृती उभी राहिली आहे. आपणा सर्वांची जगण्याची रीत, पद्धती, भाषा, चित्रकला, शिल्प, वास्तुकला या साऱ्यांवर किती तरी दूरदूरचे प्रभाव आहेत. आपण सर्वांनी एकमेकांना समृद्ध केलं आहे. ‘मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिशस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी,’ असं म्हणणारा भणंग बॉलिवूडी हिरो आपल्या भटकंतीची हीच रंगीबेरंगी स्टोरी आपल्याला समजेल अशा भाषेत सांगत असतो.  

आठव्या-नवव्या शतकात पर्शियातून पारशी लोक भारतात आले तेव्हाची एक गोष्ट सांगतात. इथं गुजरातच्या किनाऱ्याला लागल्यावर पारशी लोकांच्या म्होरक्याने तेथील राजाकडे त्याच्या प्रदेशात राहण्याची परवानगी मागितली तेव्हा राजाने त्या पारशी म्होरक्याला ग्लासभर दूध देऊ केले, त्या हुशार पारशी माणसाने राजा आपली परीक्षा घेतो आहे, हे बरोबर ओळखले आणि त्या ग्लासभर दुधात चमचाभर साखर मिसळली आणि राजाला दुधाचा ग्लास परत दिला. दुधात साखर मिसळल्याने दूध जसे अधिक मधुर होते तसे आमच्या येथील वास्तव्याने येथील समाजजीवन अधिक मधुर, मैत्रीपूर्ण होऊन जाईल, असा साधा संदेश त्या एका कृतीतून व्यक्त झाला होता. नव्या प्रदेशात येणारी माणसं काही देत असतात, काही वेचत असतात, यातून जगण्याला नवी झळाळी, नवी लकाकी येत असते, हे कधी आपल्या लक्षातच येत नाही की काय? औरंगजेबाचा भाऊ असणाऱ्या दारा शिकोहने उपनिषदांचा पर्शियन भाषेत अनुवाद केला. त्यांनी एकदा म्हटलं होतं, पैगंबर मुसा यांनी सांगितलं होतं की मला कितीही वर्षे चालावं लागलं तरी मी दोन नद्यांच्या संगमापर्यंत पोहोचेपर्यंत थांबणार नाही. पैगंबराचे हे वाक्य उद‌्धृत करून दारा शिकोह पुढं लिहितात,"भारतात या दोन नद्यांचा संगम म्हणजे माझ्यासाठी हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य आहे." कुठली तरी फुटकळ कागदपत्रे पाहत आणि अस्सल माणूसपण नाकारत आपण किती दिवस परस्परांवर ’आपला' आणि 'परका' असे शिक्के मारत राहणार. जीव जाणणे म्हणजेच शिव जाणणे आहे, हा विवेकानंदांनी हाती दिलेला उजेड आपण असाच विझवून टाकणार? 

अरे, अगदी कालपरवा  कोकणातल्या कृष्णाजी केशव दामले नावाच्या एका फाटक्या मास्तरने आपल्याला एक कविता शिकवली होती,

"खादाड असे माझी भूक ,
चतकोरीने मला न सुख,
कूपांतिल मी नच मंडूक,
मळ्यास माझ्या कुंपण पडणे,
अगदी न मला साहे,"

आपण त्या कवितेच्या तासाला गैरहजर होतो की काय? निळं आभाळ कवेत घेणाऱ्या माणसाला आपण डिटेन्शन कॅम्पमध्ये का कोंडू पाहतोय? ही कविता कळणाऱ्याला यत्र तत्र सर्वत्र स्वतःच्या घरच्या खुणा दिसतात. पण तुमचं - माझं काय बिनसलंय? कवितेच्या तासाला नसलेल्या तुमच्या-माझ्यासारख्या लोकांसाठी दामले मास्तरांची ही कविता पुन्हा पुन्हा गावी लागेल. ग्लोबल गावातील नव्या मनूच्या नव्या शिपायाची ही तुतारी आपल्या हातातून निसटता कामा नये, ही तुतारी आपण नव्या जोमाने फुंकली पाहिजे. यही वक्त का तकाजा है दोस्तो. . .!

लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६