आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होप, हे सारं तुला कळेल…!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात विशुद्ध पुरुष आणि स्त्री नसतातच. असतात ती त्यांची वेगवेगळ्या परिमाणातील मिश्रणं! प्रत्येक पुरुषात एक बाई असते आणि प्रत्येक बाईमध्ये एक पुरुष! हे बाई-पुरुषाचं प्रत्येकातलं प्रमाणही कमी जास्त असू शकतं. आपण एकमेकांसोबत राहून यातलं आरोग्यदायी प्रमाण गाठू शकतो. व्यवहारी जगात जगताना आपल्यात आवश्यक बदल करू शकतो, पण त्यासाठी आपण दोघांनीही एकमेकांना हात देण्याची, समजावून घेण्याची गरज असते. 

 

केवळ संशयावरून आपल्या पन्नाशी ओलांडलेल्या बायकोचं शिर धडावेगळे करून ते अभिमानाने पोलिस स्टेशनमध्ये घेऊन येणाऱ्या वर्तमानात असं नातं युटोपियन वाटू शकतं, पण जगाच्या नकाशात युटोपिया नावाचा देश नाही म्हणून तो तुझ्या माझ्या घरात सापडणारच नाही असं नाही. होप, हे सारं तुला कळेल …!

 

 

१) तुझ्या वेदनेने भरलेल्या चेहऱ्याकडे बघवत नाही म्हणून मी खिडकीतून बाहेर पाहतो. नुकत्याच झालेल्या पावसानं सारं हिरवंगार झालेले आहे. सलगी करणाऱ्या झाडांच्या फटीमधून मनसोक्त बरसून गेल्यावर निळंशार झालेलं आभाळ दिसतं, आभाळ आणि जमिनीच्या मिलनरेषेवर एखादा पांढुरका ढग, चवऱ्या ढाळत असल्यासारखा गोजिरा, माझं मन वेधून घेतो. वाटतं, मोबाइलचा कॅमेरा काढावा आणि हे चित्र कैद करावं इवल्याशा स्क्रीनमध्ये!  मोबाइलकडे जाणारा हात मी मोठ्या कष्टाने आवरतो. कॅमेऱ्यातत कैद केली म्हणून अशी सगळीच मनोहारी चित्रं कायमस्वरुपी आपली होत नसतात. ज्या क्षणी असं काही भेटतं, दिसतं ते डोळेभरुन पाहून घ्यावं, डोळ्यांत, मनात साठवून घ्यावं. त्या क्षणी ती फुललेली झाडं, ते निळंशार आभाळ, तो गोजिरा पांढुरका ढग सारं काही आपलं असतं. त्या क्षणाचं सुख लुटावं, तो क्षण अत्तर थेंबासारखा कुपीत जपून ठेवावा. पण आपण कॅमेरा काढतो आणि तो क्षण कायमचा आपल्या मालकीचा बनवू पाहतो. आपल्या गॅलरीत तो क्षण जमा होतो पण त्याचा फोटो झालेला असतो, त्यातला जिवंतपणा संपलेला असतो. 


मी पुन्हा तुझ्याकडे पाहतो. तुझ्या चेहऱ्यावरल्या आठ्यांमध्ये प्रत्येक फांदीला अडकलेल्या वेदना दिसतात मला. मी माझ्याही नकळत तुझ्या कपाळावर हात ठेवतो. हाताला चटका बसतो. इन्फेक्शन .. जखमा अशा चिघळतात. वाटतं, सारा वेदनेचा सागरच पिता यावा, अशी अगस्तीसारखी तहान का लागत नाही आपल्याला? तू तशीच पडलेली. तुझ्या मनात काय सुरू असेल कोण जाणे? त्याला संशय आला तुझा, म्हणून त्यानं तुझ्या अवघड जागेवर लाथ घातली. आणि चक्क बेलनं आत….. मला कल्पनाही करवत नाही, मला उच्चारताही येत नाही सारं. तुझ्या अवघड जागेवर अवघं रक्त साकळलेलं. डॉक्टरांनी ऑपरेशन करुन ड्रेन केलंय सकाळीच! 
आपलं सारं जगणंच अवघड जागेचं दुखणं झालंय गं ! मी त्याला कितीदा सांगितलं, असं नसतं रे मित्रा! बाई म्हणजे आपल्या मालकीचा गुंठाभर जमिनीचा तुकडा नसतो की टोपल्यातली कोरभर भाकर नसते केवळ आपलीच मालकी असलेली. आपण प्रेम करत नाही, सतत मालकी दाखवत राहतो. आपल्या प्रेमाच्या माणसाला आपण जखमी कसं करु शकतो? शरीरानं आणि मनानेही? तू कुठं जातेस, तू कुणाशी बोलतेस? सतत पहारा!  मी बोललो होतो त्याला, ‘ अशी पिंजऱ्यात कोंडून पाखरं आपली होत नसतात.’ खरं प्रेम प्रत्येक पाखराला त्याच्या पंखांच्या अपरंपार बळाची ओळख करुन देतं, ते त्याला कोंडून ठेवत नाही. ‘भिरभिरणाऱ्या फुलपाखरा नसे नकाशा, विसावले जर ओंजळीचे फूल करावे,’ पण आपल्याला असं ओंजळीचं फूल करता येत नाही, आपण तुरुंग उभे करतो आणि भाषा प्रेमाची करतो. आपण उडणाऱ्या फुलपाखराच्या पायांना दोरे बांधू पाहतो आणि नाटक प्रेमाचं करतो.  उद्या परवा तुला डिस्चार्ज मिळेल. कुठं जाशील तू, मी विचार करतो. पुन्हा त्या तुरुंगात की पंख पसरुन आभाळ आजमावशील तू नव्या उमेदीनं?  की तू शिकवशील कला त्याला, ओंजळीचं फूल करण्याची?  मी पुन्हा खिडकीबाहेर पाहतो. 


२)  “ याची औकात ती काय?,” तू प्रचंड संतापाने बोलत होतीस. तुझी कोमेजलेली सारी स्वप्नं तुझ्या डोळ्यांतून सांडत होती. “ या माणसानं काय दिलंय मला? याची कमाई किती? साधं दुखलं खुपलं तर दवाखान्यात न्यायची ऐपत नाही याची. सरकारी दवाखान्यात जा म्हणतो हा.”


कुणीतरी थोबाडीत मारावी तसं मी ऐकत राहतो. विचार करत राहतो,  अगं, तू एवढी शिकलेली. पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे ! एवढ्या शिक्षणात ‘ औषध न लगे मजला,” ही ओळ तुला कुठं भेटलीच नाही का गं? तो श्लेष कळला नाही की दमयंती समजली नाही? आपलं व्याकरणही कच्चं आणि कविता समजण्याचं अंग तर शेपूट गळावं तसं गळून पडलंय आपलं! आपलं नेमकं होतंय काय? आणि तिला काही दुखलं खुपलं म्हणून कितीही मोठ्या दवाखान्यात नेलं तरी ती बरी होते ती तुझ्या मायेच्या स्पर्शानं. तू डोकं चेपताना केलेला हळवा स्पर्श तिला बरं करतो रे. आणि रात्री-अपरात्री उठून तू करुन दिलेल्या चहाइतकं रामबाण औषध कोणत्याच दवाखान्यात मिळत नाही, खरंच, ना सरकारी ना खाजगी! आपल्याला आपला आजारही कळत नाही आणि त्यावरलं औषधही उमजत नाही.  
तुला हे कसं सांगावं, याचा मी विचार करत राहतो. 


“आता आहे मला ब्यूटीपार्लरची सवय! नीटनेटकं रहावं असं वाटतं माणसाला पण त्याच्यासाठी तरी याच्याकडे पैसे कुठंयत? ,” तू पुन्हा उन्मळून पडतेस. तुमच्या दोघात पडलेली दरी बुजवू पाहणारा मी हतबल ऐकत राहतो. छानछोकीत रहावं, असं प्रत्येकाला वाटतं ग पोरी. त्यात काहीच पाप नाही. पण प्रत्येक वेळी ते शक्य होतंच असं नाही. त्यानं गालावर ओठ टेकवल्यावर तुझा चेहरा कसा फुलून येत असेल, त्या पुढं कुठलंही फौंडेशन काय करणार कपाळ? त्याच्या ओठांच्या स्पर्शाइतकं हळवं लिपस्टिक तुला आलम दुनियेत कुठं भेटेल? असं म्हटल्यावर तू रडता रडताही लाजून हसतेस! हे इतकं गोड हासू कोणत्या ब्यूटीपार्लरमध्ये मिळेल, मला प्रश्न पडतो. 
तुम्ही चुकतायं की मीच आऊटडेटेड झालोय, मी विचार करू लागतो. आम्ही चालायला सुरुवात केली तेव्हाची गोष्ट, काहीच नव्हतं ग, तेव्हासुद्धा फक्त हातामध्ये हात होते, घट्ट! आणि बघ आज इतके मैल चालून आलो. 
‘वाटेवरती गुलाब फ़ुलले, सुगंधित काटे घेऊन / पाऊस सारे नाकारुन, उन्हात तुझ्या भिजलो होतो ’
असलं काही तरी कळणारं, न कळणारं गात गात चालता येतं, काट्यांनाही सुगंध येतो आणि उन्हातही भिजता येतं. होप, तुला कळेल, त्याला कळेल!  मी बोलत राहतो.

 

३) “ ती म्हणते, तू बायकी आहेस. तू रडतोस, जरा काही झालं की माझं चुकलं म्हणतोस, हे मला नाही आवडत,” तो फोनवर मला सांगत होता. त्याला मी काय फार दिवसांपासून ओळखत नव्हतो पण साधाभोळा पोरगा. सारे चांगले विचार प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा. हळवा.. संवेदनशील. काही झालं तर डोळ्यात टचकन पाणी येणारा, आपलं चुकलं तर पटदिशी कबूल करणारा. पण तिला हे सारं नको होतं. तिच्या मनात एका डॅशिंग हीरोची कल्पना होती. आजच्या अर्बन भाषेत अल्फा मेल..!  हा तिच्या स्वप्नातल्या पुरुषाशी कुठेच मेळ खात नव्हता. 


खरं म्हणजे, जगात विशुद्ध पुरुष आणि स्त्री नसतातच. असतात ती त्यांची वेगवेगळ्या परिमाणातील मिश्रणं! प्रत्येक पुरुषात एक बाई असते आणि प्रत्येक बाईमध्ये एक पुरुष! हे बाई-पुरुषाचं प्रत्येकातलं प्रमाणही कमी जास्त असू शकतं. आपण एकमेकांसोबत राहून यातलं आरोग्यदायी प्रमाण गाठू शकतो. व्यवहारी जगात जगताना आपल्यात आवश्यक बदल करु शकतो, पण त्यासाठी आपण दोघांनीही एकमेकांना हात देण्याची, समजावून घेण्याची गरज असते. आपलं निव्वळ पारंपरिक पुरुषत्व वेळोवेळी दाखवत बाईचा जराही न विचार करणाऱ्या  पुरुषापेक्षा तिचा विचार करणारा, तिच्या कष्टाची जाणीव ठेवून तिला मदत करणारा पार्टनर कुणाला का आवडू नये? पण पारंपरिक पुरुषासारखेच पारंपरिक स्त्रीत्व नावाची पण एक गोष्ट असते. आपल्या बाबतीत पझेसिव्ह असणारा, आपली मालकी वेळीअवेळी व्यक्त करणारा पुरुष अशा स्त्रीला हवाहवासा वाटतो. स्त्री-पुरुषांच्या या आदिम झटापटीत आपण आपलं मूलभूत माणूसपण विसरुन कसं चालेल? भाजीत मीठ कमी पडलं म्हणून भाजीची वाटी भिरकावून देणाऱ्या नवऱ्यापेक्षा ‘ आज तुला खूप काम पडलं ग,’ असं म्हणत ती अळणी भाजीसुद्धा आवडीनं खाणारा, मनापासून घरकाम करणारा नवरा असेल तर अळणी जगणं देखील रुचकर होऊन जातं. 

 

४) "आमच्या ऑफिसात नव्याने बदलून आलेल्या एकाची वेगळीच कहाणी आहे अरे ," ती सांगत होती,"दहा बारा वर्षाचं पोर मागे ठेवून बायको गेली त्याची अपघातात, पोराचं सारं करुन येतो हा ऑफिसात. आणि तरीही इतक्या उत्साहात असतो की बस्स आपल्यालाच अपराध्यासारखं वाटतं ", त्याने नुसताच हुंकार भरला. "तुला खरं सांगू, खूप बरं वाटतं त्याला भेटलं की! ,तो ऑफिसात नाही आला की काळजी वाटू लागते. कधी कधी ही ओढ का वाटते आहे, हेच कळत नाही," ती म्हणाली आणि त्याने एकदम चमकून पाह्यलं. 


" तुला वाईट वाटलं का,"तिनं एकदम काळजीनं विचारलं. 
" नाही ग, थोडं कसं तरी वाटलं इतकंच!", आणि मग तोच समजुतीच्या सूरात म्हणाला, " आपल्या दोघांना परस्परांशिवाय कुणी आवडूच नये असं नाही ग! आणि असं शक्य तरी आहे का? फक्त ते आवडणं छानशा मैत्रीत कन्व्हर्ट करण्याची कला आपल्याला जमली पाहिजे, हे महत्वाचं!"


ती त्याला घट्ट बिलगली," किती वेडू आहेस तू!" तिचे डोळे बोलत होते.
नात्यात अशी चुकण्याची, समजून घेण्याची, सावरण्याची स्पेस असायला हवी म्हणजे मग ते नातं इतकं नितळ, इतकं पारदर्शक होऊ शकतं. 


केवळ संशयावरून आपल्या पन्नाशी ओलांडलेल्या बायकोचं शिर धडावेगळे करून ते अभिमानाने पोलिस स्टेशनमध्ये घेऊन येणाऱ्या वर्तमानात असं नातं युटोपियन वाटू शकतं, पण जगाच्या नकाशात युटोपिया नावाचा देश नाही म्हणून तो तुझ्या माझ्या घरात सापडणारच नाही असं नाही. होप, हे सारं तुला कळेल …!


लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

बातम्या आणखी आहेत...