Magazine / सुकुमार भूमीचा पासपोर्ट

शहरातल्या प्रत्येक माणसाच्या मनात एक गाव दडलंय

प्रदीप आवटे

Jul 14,2019 12:12:00 AM IST

खरं म्हणजे अप्पाच्या वयाची माणसं खेड्यात वाढलेली, त्यांचा शहरात जीव रमत नाही. सगळा भवतालच वेगळा, पण अप्पांना शहराचं गुपित कळलंय. त्यांना पुरतं कळून चुकलंय की, शहरातल्या प्रत्येक माणसाच्या मनात एक गाव दडलंय. तंबाखू मळत मळत मोकळ्याढाकळ्या गप्पा मारत मारत शहराच्या खोल आत असलेल्या त्या गावालाच अप्पा जणू साद घालतात. पोट भरायला इथं आलेला प्रत्येक माणूस आपल्यासोबत एक गाव घेऊन आलाय. अप्पांशी बोलताना बोलणाऱ्याला ते गाव भेटत जातं की काय कोण जाणे !

"हॅ लो,’ अप्पांनी नेहमीप्रमाणे अगदी इमर्जन्सी असावी तसा मोबाइल कानाला लावला. खरं म्हणजे जेवणाची तयारी चालली होती. सगळे ताटावर खोळंबले होते.
"नाही नाही. आता काय रिटायर्ड लाइफ. त्यामुळं काही गरज नाही,’ मधूनच अप्पांचे फोनवरील बोलणे कानावर पडत होते. "थोरले डॉक्टर, धाकटे पत्रकार... एक मुलगी ती ही चांगल्या पदावर… त्यामुळं आता काय वानप्रस्थाश्रम .. हा हा हा .. नो इन्व्हेस्टमेंटस.. नथिंग !’
अप्पा कुणाशी बोलत होते काही कळायला मार्ग नव्हता.
"तुमच गाव कोणतं ?’ पुन्हा पॉज… "अरे फिर शादीबिदी हुयी की नहीं?”
“ बच्चे कंपनीच्या शाळेचं काय ?”
“ आणि गृहमंत्री कुठले आहेत?”
पलीकडला माणूसही गप्पिष्ट असावा , हे मधल्या पॉजेसवरून लक्षात येत होतं.
" कोणतं वाठार जवळचं ? तिथला तो रामभाऊ … तो हो तो सरपंच होता तो, तो आपला विद्यार्थी, जुन्या अकरावीचा !," आम्ही सगळे एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होतो. अप्पा कुणाशी बोलत असावेत याचा अदमास घेत होतो. पण काही करता काही आयडिया येईना.
अखेरीस सातेक मिनिटांनी अप्पांनी फोन ठेवला आणि म्हणाले, "कुठल्या तरी कंपनीचा फोन होता, मला इन्व्हेस्टमेंट प्लॅन समजावून सांगत होता, मी म्हटलं बाबा, आता मी काय करू इन्व्हेस्ट करून?’
आम्ही सगळे आश्चर्याने बेशुद्ध पडायचे काय ते उरलो होतो. कंपनीच्या फोन कॉलवर अप्पा पाच - सात मिनिटं बोलत होते, ते ही त्याची बायकापोरे,ख्यालीखुशाली अशा शिळोप्याच्या गप्पा मारत..! आम्ही सगळे किती तरी वेळ खो खो हसत होतो. अप्पांच्या बोलण्याची नक्कल करत होतो.


कंपनीचा फोन म्हणजे कपाळावर सतराशे आठ्या पाडत आपण कट करतो. कितीदा तर , "आता मी कामात आहे," असं म्हणायचं सौजन्यही आपण दाखवत नाही. आपलं असं असताना अप्पा सारखा माणूस कंपनीवाल्याशी इतक्या घरगुती गप्पा कसा काय मारु शकतो ? मी विचार करत होतो. आणि खरं म्हणजे, तो पलिकडला माणूस.. इतरवेळी विनोदी वाटावं अशा औपचारिक मराठीत बोलणारा कंपनीवाला देखील इतका कसा काय बोलू शकतो की दिवसभर इतकं फॉर्मल बोलून त्यालाही मनमोकळ्या गप्पांची तहान लागलेली असते? दिवसभर कशाकशाचं मार्केटिंग करणाऱ्या कार्पोरेट कंपनीवाल्यालाही अखेर माणसाची कंपनी हवी असते. खरं म्हणजे त्या कंपनीवाल्यानं रीतसर कामासाठी फोन केला होता. त्याच्या फोनमध्ये हेतू होता. त्याला आणखी एक ग्राहक पटवायचा होता. तो त्याचा रोजचा व्यवसाय होता. पण अप्पांनी आपल्या गप्पांनी त्या सहेतूक संवादातील हेतूच विरघळवून टाकला आणि अवघं बोलणं निर्हेतूकतेच्या वावरात नेऊन सोडलं. अप्पा स्वतःच्या जगण्यातील समाधान, सारं काही मिळलं, मिळवल्याची भावना त्याच्यापर्यंत पोहचवत होते आणि अगदी सहज त्याची विचारपुस्त करत होते. असं हेतूशून्य बोलणं, बोलण्यातील ओलावा वाढवतं. सेन्सेक्सच्या चढउतारात त्याची मोजदाद करता येत नाही. आणि म्हणून कदाचित निखळ मार्केटमध्ये उभा असलेला तो तरुण अप्पांशी मस्त गप्पा मारत होता.


अप्पा म्हणजे माझे वडील, अत्यंत बोलके. आणि बोलण्यासाठी त्यांना कुणाची ओळखपाळख लागत नाही की माणसाची सामाजिक राजकीय पत बोलण्याच्या आड येत नाही. अप्पा दगडालासुद्धा बोलतं करतील, असं आम्ही गमतीनं म्हणत असतो. काहीवेळा त्यातून गमतीशीर प्रसंगही घडतात. एकदा रेल्वेप्रवासात समोरच्या पॅन्टशर्टातल्या अनोळखी प्रवाशाला अप्पा म्हणाले, "मग महाराज, काढा तंबाखू !"


त्यावर तंबाखू तर राहिली बाजूला तो गृहस्थ ओरडला, "महाराज काय महाराज? मी तुम्हाला महाराजासारखा दिसतो काय? "म्हणजे तंबाखू मागण्याला त्याची काय हरकत नव्हती, त्याची हरकत होती 'महाराज' म्हणण्याला. " मी काय महाराजासारखे कपडे घातलेत काय? ",असा त्याचा रास्त सवाल होता. अप्पांनीही त्याची समजूत काढली, "अहो इंग्रजीत आपण "सर' म्हणतो, पण सरचा अर्थही महाशय किंवा महाराज असाच होतो," असं आपलं विलक्षण शिक्षकी कौशल्य वापरत अप्पांनी त्या "महाराजां'ना कोणताही अंगारा न देता शांत केलं आणि नंतर संपूर्ण प्रवासभर दोघेही जुन्यापुरान्या दोस्तांसारखे तंबाखूचे बार भरत राहिले. अप्पांचं काम हे असं..! परवा पेपर विकत घ्यायचा म्हणून घराबाहेर पडले आणि जोराचा पाऊस आला. म्हटलं आता हे भिजणार, पुन्हा अस्थमाचा त्रास उफाळणार म्हणून आम्ही काळजी करत असताना हे एकदम एका जणाच्या गाडीवर घरी परतले. म्हणाले, “ अरे हा भिडू आपल्या गोयेगावचा निघाला.”


घरातून बाहेर पडून अवघी दहाएक मिनिटं झाली होती, त्यात पाऊस सुरु झालेला पण तेवढ्या वेळातही अप्पांना गाववाला भेटला होता. माणसाची ओळख अप्पा प्रकाशाच्या वेगानं करतात. आपलं वेगळंय, आपण महाप्रचंड वेगानं अंतराळात जाऊ पण माणसाकडं जायचं म्हटलं की, आपल्या गाडयांची क्लच प्लेट तुटते. आपल्या गाडया जागेवरच घुर्र्र्र्र्र्र घुर्रर्र करत राहतात... पण पुढं सरकत नाहीत.


आम्ही आपले अप्पांवर वैतागत असतो, अप्पा कोणत्या कामाच्या वेळी कोणत्या माणसाला घेऊन घरात येतील, आपला महत्वाचा वेळ खातील आणि वर त्याच्यासाठी हळूच ‘ कप ऑफ टी’ ठेवायला सांगतील, याचा काय नेम नाही. खरं म्हणजे अप्पाच्या वयाची माणसं खेडयात वाढलेली, त्यांचा शहरात जीव रमत नाही. सगळा भवतालच वेगळा पण अप्पांना शहराचं गुपित कळलंय. त्यांना पुरतं कळून चुकलंय की, शहरातल्या प्रत्येक माणसाच्या मनात एक गाव दडलंय. तंबाखू मळत मळत मोकळ्याढाकळ्या गप्पा मारत मारत शहराच्या खोल आत असलेल्या त्या गावालाच अप्पा जणू साद घालतात. पोट भरायला इथं आलेला प्रत्येक माणूस आपल्यासोबत एक गाव घेऊन आलाय. अप्पांशी बोलताना बोलणाऱ्याला ते गाव भेटत जातं की काय कोण जाणे ! पण सगळ्या स्तरातील माणसं अप्पांची होऊन जातात. फेसबुकवर माझे एवढे फ्रेंड आहेत, इतके जण मला फॉलो करतात म्हणून ऐट दाखवणाऱ्यांना निव्वळ फ्रेंडशिप बॅन्ड बांधून हे समजणार नाही, हे अगदी खरं !
ओम इमोजी देवा । माझ्या सुखदुःखावरी॥
लाईकची मोहर । उठवा गा ॥
म्हणणाऱ्यांना हे खरंखुरं लाइव्ह समजणार नाही, त्यांनी आपलं फेसबुक लाइव्ह करत राहावं, बघत राहावं !
अंतर्विरोध हे जागतिकीकरणानंतरच्या जगाचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. म्हणजे बघा एकीकडे दळणवळणाच्या अत्याधुनिक साधनांमुळे जग भौगोलिकदृष्ट्या जवळ आलं पण प्रत्यक्षात माणूस एकमेकापासून दूर गेला. संवाद क्षेत्रातील तंत्रज्ञानक्रांतीने संवादासाठी नवनवे प्लॅटफॉर्म तयार केले पण खराखुरा संवादच हरवला. सोशल मिडियाच्या काठीने वल्हवत वल्हवत प्रत्येकजण आपापल्या बेटावर जाऊन पोहचला आणि ‘स्क्रीन इज वर्ल्ड’ ही टॅगलाईन असलेल्या या जगात या हृदयीचे त्या हृदयी घालणाऱ्या संवादाचाच दुष्काळ पडला. अशा जगात अप्पासारखी


माणसं वेगळी वाटतात, काही वेळा वेडीदेखील ठरतात. पण या मार्केट इकॉनॉमीमध्ये मार्केटच सारं काही ठरवत असताना मला नेहमी वाटून जातं , खरं मार्केट अप्पासारख्या वेड्यांना कळलंय. अखेर बाजार आहेच, व्यापारही आहे. पण विकायचंय काय आणि विकत घ्यायचंय काय? ‘ बाई मी विकत घेतला शाम,’ ही काय ओळ आहे. पोटाची खळगी तर प्रत्येकाला भरायची आहेच पण हे सारं अटळपणे जगताना विकत द्यायचाय तो आनंद आणि विकत घ्यायचाय तो ही आनंद.. निखळ.. निर्मळ आनंद! आपण बाजारात उभे तर आहोत, आपल्या गळ्यात भल्याथोरल्या विद्यापीठाची एम बी एची डिग्रीपण आहे. मार्केटिंग कसं करायचं हे कुणी आपल्याकडून शिकावं, इतके माहीर आहोत आपण! आपली गोची फक्त एवढीच आहे की, आपल्याला काय विकायचं तेच माहित नाही. अपना बेसिक में राडा है भिडू !


परवा पोस्टाने माझा पासपोर्ट घरी आला पण मी घरी नसल्याने पोस्टमनने तो दिला नाही. पासपोर्ट घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी मला पोस्टात जावे लागले. पोस्टमनला भेटलो तर म्हणाला, “ आवटे ना, सोबा विहार.” आणि तो गोड ओळखीचं हसला. मला कळेचना... माझी सही घेता घेता तो म्हणाला, “ काल तुमच्या घरी आलो होतो. तुमचे वडील भेटले, काय राव लै भारी मानूस. आमच्या खामगावची त्यांना लई माहिती .” मी हसलो. “ अहो, माझ्या जिगरी दोस्ताचीच वळख सांगितली राव अप्पांनी !”, माझ्या हातात पासपोर्ट देताना त्यानं हळहळ व्यक्त केली, “ खरं म्हंजी अप्पांची एवढी वळख निघाली होती की कालच तुमचा पासपोर्ट त्यांच्याजवळच देनार होतो. पन म्हटलं नियम नकू मोडायला.”


मी पासपोर्ट हातात घेऊन बाहेर पडलो. नव्या परक्या भूमीत जाताना आपण पासपोर्ट काढतो, व्हिसा घेतो. वाटलं , प्रत्येक माणसाच्या मनात अशीच एक सुकुमार भूमी आपली वाट पाहत असते. तिथं जाण्याचा पासपोर्ट हवा असेल तर निर्हेतूक संवादाची कला अशी आतून उमलायला हवी. पार्किंगमधून गाडी काढता काढता रस्त्यावर उभा असलेल्या एकाला म्हणलं, “ काय महाराज, पाऊस येईल असं वाटतंय.”
“ सर्वेशाम झालंय…भाऊ ! जोरात सडाका येनार बघा,” असं म्हणत तो ओळखीचं हसला.


लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

X
COMMENT