आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाचत ना, गगनात नाथा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीप आवटे  

नाचणं-गाणं आपण कायम कमी प्रतीचं, कमअस्सल लेखत आलो. कधी धार्मिक कारणांनी, कधी आणखी कुठल्या कारणांनी आपण नाचण्या-गाण्याला हीन लेखत आलो.  नाचणं आपल्या अवघ्या जगण्यात भरून उरलं आहे, हे आपल्या लक्षातच आलं नाही. प्राणवायू घेऊन येणारा, कर्बवायू घेऊन जाणारा श्वास-उच्छवास, शरीरभर धडकणारे नाडीचे ठोके, एका अमर ठेक्यावर नाचणारे हृदय आपल्याला आपल्यात भरलेल्या लयदार नादमयतेची हरघडी आठवण करून देत असतात.
 
मी शहराच्या एका टोकाला आणि त्याच शहराच्या दुसऱ्या टोकाला नाचणारी, गाणारी तू! ‘घर से निकलना काम पर और काम से लौटकर घर जाना,’ या ओळी पाशने माझ्यासाठीच लिहिल्या असाव्यात असं वाटावं, इतका मी ‘ सर्वे जंतु रूटिनः’ पंथाचा वारकरी. पण तुझा एक मेसेज, ‘ माझ्या कंटेम्पररी डान्स क्लासचा आज कार्यक्रम आहे आणि आय वॉन्ट यू देअर.” 
“ अगं पण…” 
“ मला पण बिन काही माहीत नाही. शार्प साडेपाच !” 

तुझ्या डान्समधील एखाद्या रेखीव गिरकीसारखा तुझा रिप्लाय आणि मी उभ्या गर्दीत स्टॅच्यू! या शहरात किती ट्राफिक, निर्दय सिमेंटच्या जंगलाची दाटीवाटी. मी जीव मुठीत धरून आडवं वाढणारं माझं शरीर सावरत कशीबशी स्पेस शोधतो चालण्यासाठी, तुझ्याकडं येण्यासाठी! किती अवघड सो कॉल्ड समृद्ध अडगळीने भरलेल्या या शहरात स्पेस शोधणं. इथं श्वास घ्यायला जागा नाही आणि तुला नाचायला जागा कुठं मिळते या शहरात? की हे शहर तुला वश झालंय? तुझा पदन्यास पाहून शहर गर्दीतल्या नवख्या माणसासारखं बाजूला होत तुला जागा करून देतं का पिलू? या शहराला वश करण्याचे मंत्र मी तुझ्याकडून उसने घेऊ पाहतो आणि अर्धा तास लवकर ऑफिस गुंडाळून तुझ्याकडं धावत सुटतो. मला दम लागतो, माझी सॅक जड आहे. माझं सारं रूटिन तिच्यात कोंबलंय मी. रोज वाटतं, ती थोडीशी हलकी करावी पण ओझं वाढतच राहतं दिवसागणिक…! माझ्या देहावरला मेद वाढलाय, मी भेलकांडत चालतोय पण चालण्यात ना ग्रेस आहे ना पेस! पण तरीही प्लॅटफॉर्मवर थोड्या उशिरा का असेना पण पोहोचणाऱ्या ट्रेनसारखा मी तुझ्या डान्स स्टेशनला पोहोचतो. तुमच्या हॉलच्या कोपऱ्यात मी माझी सॅक फेकून देतो आणि चेहऱ्यावर साचलेला घाम रुमालाने पुसण्याचा प्रयत्न करतो. आणि मग हल्लक झालेल्या शरीराला मिळेल त्या जागी ठेवतो आणि समोर तू दिसतेस. किती ग्रेसफुली तू संगीताच्या तालावर झुलते आहेस, मिठू! मी माझ्या थकलेल्या डोळ्यांत तुला साठवू पाहतो. आणि मग ती उंच शिडशिडीत सावळी पोर माझ्यासमोरून हॉलच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे वेल्हाळ पाखरानं झेपावत जावं तशी नाचत जाते. दिसायला किती साध्या हालचाली पण वाटतं आता कुठल्याही क्षणी हिचा हात निळ्या आभाळाला टेकेल. मी आतल्या आत नाचू लागतो. वाटतं, हिच्या मागं आपणही असंच उडत निघावं, पायाला माती लावून निळाईचा तुकडा कवळावा. 

मी धावत-पळत आल्यानं मला माझ्या नाडीचे ठोके जाणवताहेत. तू हॉलमध्ये लावलेलं म्युझिक माझ्या नाडीच्या ठोक्यांशी मेळ जमल्यासारखं वाजू लागतं. मला काहीतरी होतंय, मी बाधा झाल्यासारखा तुझ्या प्रत्येक हालचालीकडं निरखून पाहू लागतो. मी बसलोय समोरच्या कट्ट्यावर पण मी बसलेलो नाहीय. मी नाचतोय तुझ्यासोबत… खरंच पोरी, मला खूळ लागल्यासारखं झालंय. कुणीतरी कानात सांगतंय –

You have the fire, You are the heart. 
Now be a believer, Don't get lost in the crowd

आणि समोर तू नाचते आहेस. मला वाटतंय, देहाचा कुंचला करून तू या अवकाशावर तुला हवी ती चित्रं रेखाटते आहेस. पण देह इतका हलका, कुंचल्याइतका, पाखराच्या पिसाइतका हलका होऊ शकतो? माझा विश्वासच बसत नाही माझ्याच डोळ्यांवर! आता तुम्ही सारे शांत बसलाय आणि डान्सबद्दल, या डान्स क्लासबद्दल चर्चा सुरू झालीय. मध्येच एक दुबळा वाटावा असा आवाज माझ्या कानात शिरतो, “ मी एका दुर्धर आजाराची पेशंट आहे. माझे कमरेचे दोन्ही खुबे बदलले आहेत. या आजारात पाठ कडक होते, पाठदुखी तर पाचवीलाच पुजलेली पण मघापासून मी नाचते आहे. ते संगीत मला कुठंतरी आत आत स्पर्श करते आहे आणि मला इतकं हलकं वाटतं आहे, पहिल्यांदाच माझी पाठ मला इतकी रिलॅक्स वाटते आहे,” मी वळून पाह्यलं तर एक कृश तरुणी बोलत होती. इतक्या लहान वयात तिला ऍन्कलायझिंग स्पॉन्डिलायटिससारख्या त्रासदायक आजाराने ग्रासले होते. कमरेच्या सांधे प्रत्यारोपणाच्या दोन दोन शस्त्रक्रिया झालेल्या .. आणि ती पोर नाचत होती. नाचण्याच्या, गाण्याच्या प्रत्येक तुकड्यात तिला एक वेदनाशामक बाम सापडला होता. शहराच्या त्या टोकावरून या टोकाला केवळ डान्ससाठी तू मला का बोलावत होतीस, हे आता मला उमजत होतं.  “ पॉप्स, तूही खरं म्हणजे नाचलं पायजेस.” तू माझी चेष्टा करतेस की काय असं वाटून मी तुझ्याकडे पाहतो. तुझ्या डोळ्यांत कन्व्हिन्सिंग पॉवर आहे. “ अरे खूप अवघडलेपण साचून असतं आपल्या बॉडीमध्ये. डान्स आपल्याला मोकळा करतो, अगदी मोकळं. एक क्षण असा येतो की आपल्याला आपल्या बॉडीचं ओझंच जाणवत नाही.”  तुझं म्हणणं मला थोडं थोडं कळतंय. आपणच आपली बॉडी जणू साखळदंडांनी बांधलेली असते, तिला मोकळं व्हायची संधीच देत नाही आपण. मला एकदम ‘मुगले आझम’ मधल्या अकबराचा डायलॉग आठवतो, “ एक नाचनेवाली हिंदुस्थान की मल्लिका कभी नहीं बन सकती.” नाचणं- गाणं आपण कायम कमी प्रतीचं, कमअस्सल लेखत आलो. कधी धार्मिक कारणांनी, कधी आणखी कुठल्या कारणांनी आपण नाचण्या-गाण्याला हीन लेखत आलो. पण हे नाचणं आपल्या अवघ्या जगण्यात भरून उरलं आहे, हे आपल्या लक्षातच आलं नाही. प्राणवायू घेऊन येणारा, कर्बवायू घेऊन जाणारा श्वास-उच्छवास, शरीरभर धडकणारे नाडीचे ठोके, एका अमर ठेक्यावर नाचणारे हृदय आपल्याला आपल्यात भरलेल्या लयदार नादमयतेची हरघडी आठवण करून देत असतात. आणि तिला भेटताना, द्वैत हरताना देहातून कुठले अनाम सूर नाचत येऊ लागतात, ज्याची गोडी संपता संपत नाही. म्हणून तर त्याच्या ओठांवर बासरी आहे, डोई मोरपीस आहे आणि कधीचा तो यमुनाकाठी पाय तिरका करून नित्यनूतन नृत्यासाठी उभा आहे. ऋषिकेश सांगत होता, “ डान्स शिकवता येत नाही, शिकतो ते टेक्निक पण डान्स आतूनच यावा लागतो, काळ्याभोर ढगांना वारा लागला की पडणाऱ्या पावसासारखा तो बरसावा लागतो.” जन्म, मिलन, विरह, मृत्यू अशा प्रत्येक प्रसंगी नाचणाऱ्या गाणाऱ्या आमच्या आदिवासींनी कोणत्या डान्स क्लासमध्ये जाऊन डान्स शिकला आहे? तो त्यांच्या निसर्गाशी एकरूप झालेल्या जगण्यातून सागवान, पळस आणि मोहासारखा उगवला आहे, फुलला आहे. माझ्यासमोर बुधवार पेठेतून म्हणजे पुण्याच्या रेड लाइट एरियातून आलेली आनंदी बसली आहे. सगळ्या अडीअडचणीवर मात करून ती या डान्स फ्लोअरपर्यंत पोहोचली आहे. जिथं देहच बाजार होऊन जातो त्या जगातून नृत्याच्या नावेने ती देहापल्याडच्या गावी वल्हवत निघाली आहे. 

पिलू, मी तुझा हात हातात घेऊन रस्त्यावर आलोय. मी माझी सॅक तुझ्या डान्स हॉलच्या कोपऱ्यात विसरलोय. माझ्या खांद्यावरलं अवघं ओझं उतरलंय मिठू…! मी स्वतःशीच गातोय –
“ नाचत ना, गगनात, नाथा, तारांची बरसात नाथा,”

ही कसली जादू झालीय, शहराची दोन टोकं जोडली गेलीत आणि माझ्या देहाचा कुंचला झालाय. पोरी, मला तुझ्या डान्स क्लासमध्ये अॅडमिशन हवंय, कायमस्वरूपी, पर्मनंट !!!
 

लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

बातम्या आणखी आहेत...