आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिया खलिफाच्या निमित्ताने...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉर्नहबवर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मिया खलिफाने पॉर्न इंड्रस्ट्री सोडली. ही इंड्रस्ट्री सोडल्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदल घडले याविषयी तिने बीबीसीला दिलेली मुलाखत सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. वैयक्तिक आयुष्य आणि दुसरा उदरनिर्वाहाचा मार्ग व्यवस्थित चालू आहे. पण त्यामुळे पॉर्नस्टार म्हणून झालेली आपली आयडेंटिटी आता कधीच बदलू शकणार नाही, अशी खंत तिने या मुलाखतीत बोलून दाखवली. या मुलाखतीने पॉर्न इंडस्ट्री, तिथलं वास्तव आणि मिथकं इत्यादी चावून चोथा झालेल्या विषयांसोबतच आधुनिक लैंगिकतेचा पाया म्हणवल्या जाणाऱ्या कन्सेंटबद्दलही नव्याने विचार करायला भाग पाडलं आहे.
 
लैंगिक संबंध या विषयाची पब्लिक डिस्कोर्समध्ये चर्चा करताना कन्सेन्टला जेवढं महत्त्व गेल्या काही महिन्यांत दिलं जात आहे, तेवढं याआधी कधीही देण्यात आलेलं नसेल. याचं एक कारण गेल्या काही दिवसांपासून जगभरात पसरलेली "मी टू' चळवळही आहे. "मी टू'मुळे आणि इतरही समांतर घडणाऱ्या गोष्टींमुळे लैंगिक संबंधांमध्ये कन्सेंट(समोरच्या व्यक्तीची मान्यता) ही गोष्ट कधी नव्हे तेवढी केंद्रस्थानी आली. ती एवढी की, समोरच्या व्यक्तीची कन्सेंट असेल तर आपण त्या/तिच्याशी कधीही आणि कसेही लैंगिक संबंध प्रस्थापित करू शकतो, ही अगदी तार्किक आणि न्याय्य गोष्ट ठरते. किंबहुना आधुनिक जीवनशैलीतील लैंगिक दमनाचा पाया हा कन्सेटवरच उभारलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बीबीसीच्या स्टीफन सकर यांनी आपल्या "हार्डटॉक' या कार्यक्रमात मिया खलिफाची घेतलेली मुलाखात इंटरनेटवर गाजत आहे. या मुलाखतीनं पॉर्न इंडस्ट्री, तिथलं वास्तवं आणि मिथकं इत्यादी चावून चोथा झालेल्या विषयांसोबतच आधुनिक लैंगिकतेचा पाया म्हणवल्या जाणाऱ्या  कन्सेंटबद्दलही नव्याने विचार करायला भाग पाडलं आहे.

इथल्या ऐतदेशीय वाचकांची लैंगिक वैफल्यग्रस्तता आणि नैतिकतेचं जोखड पाहता मिया खलिफाचा परिचय इथे करून देण्याची काही गरज नाही. २०१४-१५ साली जेमतेम तीन महिने आणि एकूण १२ पॉर्न व्हिडिओमध्ये मिया खलिफाने काम केलं होतं. इंटरनेटच्या प्रसवत राहण्याच्या प्रवृत्तीमुळे मिया खलिफा अजूनही पॉर्नस्टारच आहे, असा काही लोकांचा समज असल्यास तो अगदीच गैरलागू ठरत नाही. तिचे ते १२ व्हिडिओ लाखो लोकांनी पुन्हा पुन्हा करोडो वेळेस पाहिलेले आहेत. पॉर्न इंडस्ट्री सोडून पाच वर्षे झालेली असतानादेखील याच १२ व्हिडिओंच्या जोरावर ती आजही पॉर्नहबच्या टॉप सर्च मध्ये आहे. त्यामुळे once a pornstar always a pornstar याचा प्रत्यय तिला आलेला आहे. बीबीसीला तिने दिलेली अर्ध्या तासाची ही मुलाखत आवर्जून बघण्यासारखी आहे. त्यात ती म्हणते की, पाच वर्षांपूर्वी मी २१ वर्षांची असताना दिलेला कन्सेंट आता मी मागे घेते. वैयक्तिक आयुष्यात पॉर्नपासून ती बरेच लांब गेलेली आहे. तिचं वैयक्तिक आयुष्य आणि दुसरा उदरनिर्वाहाचा मार्ग व्यवस्थित चालू आहे. पण त्यामुळे पॉर्नस्टार म्हणून झालेली आपली ओळख आता कधीच बदलू शकणार नाही, अशी खंत तिने या मुलाखतीत बोलून दाखवली. यातून कन्सेंट या आपल्या आवडत्या संकल्पनेभोवती काही मूलभूत प्रश्न उभे राहतात. जसं की एखाद्यासोबत लैंगिक कृत्य करताना त्या/तिचा कन्सेंट घेतला आणि त्या समागमानंतर संबंधित व्यक्तीने कन्सेंट मागे घेतला तर तिच्या त्या जुन्या कन्सेंटला काही अर्थ राहतो का? जर राहत असेल तर मग त्या व्यक्तीने आत्ता या कन्सेंट मधून घेतलेल्या माघारीला काही अर्थ राहतो का? यांसारखे अनेक प्रश्न आहेत ज्याचं मूळ या प्रश्नाकडे जातं की, लैंगिक कृत्य करण्यासाठी ज्या कन्सेंट या संकल्पनेचा एकमेव आधार घेतला जातो ही संकल्पना पुरेशी आहे काय? आणि नसली तर त्याहून अधिक काय करता येईल म्हणजे ते कृत्य नैतिक ठरेल?

यासाठी मुळात कन्सेंट तयार होण्याच्या विचारप्रक्रियेचा विचार करावा लागेल. जी विचार प्रक्रिया त्या त्या वेळच्या राजकीय,सामाजिक संदर्भातून आकार घेत तयार झालेली असते. त्यामुळे लैंगिक संबंधांमध्ये कन्सेंट ही गोष्ट संबंधित व्यक्तीने पूर्णपणे घेतलेला वैयक्तिक निर्णय म्हणून बघितली जाऊ शकत नाही. उदाहरणादाखल मिया म्हणते की, त्या वेळेचा पॉर्न करण्यासाठीचा होकार हा माझ्या इंटिमिडेशन मधून आला होता. कन्सेंटचा हा झांगडगुत्ता फक्त पॉर्न पुरता मर्यादित नसून आपल्या रोजच्या जीवनातील विरुद्धलिंगी सहवासाचं राजकारण या कन्सेंटभोवतीच आखलेलं आहे. कन्सेंट ही जेवढी सहजभावनेनं घडणारी प्रक्रिया असायला पाहिजे तेवढीच ती क्लिष्ट आणि अंतर्गत विरोधाभासांनी भरलेली आहे. याचं मूळ कारण आहे सेक्स (संभोग) आणि ह्या संभोगाचं माणसाला असलेलं कौतुक. माणूस हा एकमेव असा सामाजिक प्राणी आहे की, तो सेक्स फक्त करत नाही तर सेक्सबद्दल लिहितो, त्याच्याभोवती बोलतो, सेक्सचे कायदे आणि नियम बनवतो, सेक्सभोवती मिथकं आखतो, तो त्यावर कविताही करतो एवढंच काय स्वतः सहभागी नसलेल्या दुसऱ्यांच्या संभोगात इंटरेस्ट घेऊन तो आवडीने पाहतो. प्रसिद्ध इतिहासकार आणि फिलोसोफर मिशेल फुको म्हणतो की," everything is sex except sex because sex is power". फुकोने हिस्टरी ऑफ सेक्शुअलिटी ची तीन खंड लिहिलेली आहेत. साधारणत: त्याची ही सगळी मांडणी पॉवर रिलेशन्सवरती आधारित आहे. पण मिया खलिफा प्रकरणाच्या अनुषंगानं आपण त्याला थोडक्यात असं मांडू शकतो की, सध्याच्या हायपर सेक्शुअलाईझ्ड जगात आपण सगळेच लैंगिक उपयुक्ततावादाने वेढले गेलेले आहोत. आणि याच उपयुक्ततावादातून लैंगिक कृत्यासाठीची आपली कन्सेंट आकार घेत जाते. याची शास्त्रीय मांडणी करण्याएवढं तार्किक अधिष्ठान मिया खलिफाजवळ नसलं तरी या मुलखातीत ती हेच म्हणण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत मी अगदीच अनाकर्षक होते. अनाकर्षक याचा अर्थ म्हणजे पुरुषांच्या नजरेत (मेल गेझ) मला काडीचंही स्थान नव्हतं. पुरुषी संभोगाच्या या उपयुक्तततावादात आपल्याला कुठेच स्थान नसल्याकारणानं माझा आत्मसन्मान (सेल्फ इस्टीम) वरचेवर कमी होत गेला. यातूनच माझा कन्सेंट तयार होत गेला की मी पॉर्न मध्ये काम करू शकते त्यातून आपल्याला या पॉवर रिलेशन्समधलं समाधान (ग्रॅटिफिकेशन) मिळेल. अर्थात तिला अपेक्षित असलेलं समाधान तिला मिळालंच. बँग ब्रॉस आणि पॉर्नहब या कंपन्यांनी तिच्या जोरावर लाखो रुपये कमावले. कदाचित आयसिसकडून तिला धमकी मिळाली नसती किंवा तिच्या आईवडिलांनी तिला वाळीत टाकलं असतं तर मिया खलिफा ही इतर पॉर्नस्टार प्रमाणेच आनंदानं तिथं काम करत राहिली असती. 

पॉर्नच्या एवढ्या गर्दीमध्ये अवघे तीन महिने काम करून मिया खलिफा एवढी प्रसिद्धी कशी मिळवू शकली, हाही मोठा रंजक विषय आहे. मिया खलिफाचं मूळचं अरबी असणं आणि त्यात तिने अमेरिकेत जाऊन हिजाब घालून पॉर्नमध्ये ॲक्ट करणे या गोष्टीला अनेक राजकीय, सामाजिक आणि आर्थिक तेवढेच इंटरेस्टिंग पदर आहेत. मिया खलिफा मुळे भांडवलाला दोन गोष्टी साध्य करता आल्या. एक म्हणजे इस्लामचं आयतंच होणारं डिग्रेडेशन आणि दुसरं म्हणजे अरब मुलगी अमेरिकेत येऊन स्वतःहून असं कृत्य करते, असं प्रोजेक्ट करून अमेरिकन समाज हा मुक्ततेचं आणि स्वातंत्र्याचं प्रतिक आहे, हे बिंबवणे‌. 

मिया खलिफाचं आयुष्य ती पॉर्नमध्ये काम करण्याआधी आणि पॉर्नमध्ये काम केल्यानंतर अशा दोन भागात विभागलं जातं, यातच आपल्या समाजाची मेख दडलेली आहे. पॉर्न हे आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेला असला तरी प्रत्यक्षात पॉर्न इंडस्ट्रीत काम करणारी माणसं ही आपल्यापेक्षा वेगळी नैतिकता आणि मूल्यव्यवस्था असलेल्या जगात वावरत असतात, असं म्हणायला वाव आहे. फक्त तीन महिने पॉर्न इंडस्ट्रीत काम केलेल्या मिया खलिफाला पॉर्नोटोपियातून बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या आपल्या या जगात वावरणं एवढं अवघड वाटत असेल तर वर्षानुवर्ष पॉर्नमध्ये काम करत असलेल्या दुसऱ्या पॉर्नस्टार्सना तिथून बाहेर पडण्याची कल्पनाही करवत असेल की नाही, हे सांगता येणार नाही. याचाच परिपाक म्हणून पॉर्नमध्ये काम करणारी लोकं ही एका वेळेनंतर त्याच जगात राहायला प्राधान्य देतात. आपल्याला, आपल्या नैतिक मूल्यांना, आपल्या संवेदनशीलतेला बाहेरच्या जगातलं कोणी समजून घेऊ शकत नाही, हे कळून चुकल्यानं त्यांचे जवळचे मित्र किंबहुना पार्टनरही बहुतांशी पॉर्नमध्ये सक्रिय असणारीच व्यक्ती असते. त्यामुळे आपला पार्टनर आपल्यासमोर कोण्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर संभोग करतोय आणि ते आपण चित्रित करतोय हे अतिरंजित वास्तव त्यांनी खऱ्या आयुष्यात सत्य म्हणून स्वीकारलेलं असतं. त्यामुळे आपण आता इथून बाहेर पडल्यानंतर आपली नैतिकता आणि बाहेरच्या जगाची नैतिकता मेळ खाऊ शकणार नाही, हे उमजून ती लोकं बहुतांशी त्यांच्याच समूहात राहण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला इथून चक्रम वाटणाऱ्या गोष्टी तिथे घडत असतात. उदाहरणादाखल ब्राझर्स या नामांकित पॉर्न प्रोडक्शन कंपनीनं त्यांचा स्टार परफॉर्मर असलेल्या केरण ली या पुरुषाच्या लिंगाचा इन्शुरन्स काढलेला आहे! तोही तब्बल १ मिलियन डॉलर्सचा. आपल्यातल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोसारखाच ब्राझर्स हाऊस नावाचा एक रिअॅलिटी शो असतो. 
 
आपल्याला चक्रम आणि लैंगिकतेनं उन्मादी वाटतील अशा गोष्टी या रिअॅलिटी शोमध्ये आपल्यासारखीच माणसं करत आहेत हे बघणंसुद्धा कन्सेंट आणि पावर रिलेशन्शमध्ये अडकलेल्या आपल्यासारख्या माणसांसाठी विचित्र अनुभव असतो. त्यामुळे एका अर्थाने पॉर्नधल्या कलाकारांनी अशा अतिरंजित गोष्टी करणं ही आपल्यासारख्या आधुनिक मूल्यांनी घेरलेल्या माणसांची उडवलेली खिल्ली असते. चार लोकांमध्ये अशा गोष्टींची चर्चा करायलाही आपण टाळत असलो तरी अशा चक्रम व्हिडिओजला मिळणारे लाखो-करोडो व्हयूज हे याच माणसांकडून येतायेत, हे त्यांना चांगलंच माहित आहे. 

सध्याच्या पॉप फेमिनिझमचा मुख्य आधार असलेली कन्सेंट ही संकल्पना मुळातच किती तकलादू आणि अंतर्गत विरोधभासांनी भरलेली आहे, हे सिद्ध करण्यासाठी मिया खलीफा किंवा पॉर्नचंच उदाहरण प्रातिनिधिक ठरेल असं काही नाही. सध्याच्या हायपर सेक्शुअलाईझ्ड भांडवली जगात मेनस्ट्रीम म्हणवल्या जाणाऱ्या माध्यमातही शोषणाचं टूल म्हणून याच कन्सेंटचा बिनदिक्कत वापर केला जातो. त्यासाठी आपल्याला अमेरिकेकडे जायची गरज नाही तर भारतीय संदर्भात याचं एक उदाहरण समजावून घेऊ. उदाहरणादाखल कटरीना कैफ ही आपल्याकडची एक आघाडीची अभिनेत्री आहे. अर्थात पडद्यावर तिच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या जात आहेत त्या सगळ्यात तिच्या कन्सेंटनच होतायेत, हे सगळ्यांनाच मान्य आहे. पण प्रश्न हा आहे की ती देत असलेली कन्सेंट तिची स्वतःची आहे का? कटरीना कैफने जर महिनाभर स्वतःच्या मर्जीनुसार जेवण केलं तर तिचं शरीर हे मेल गेझसाठी उपयुक्त असलेला ऑब्जेक्ट राहणार नाही. पर्यायाने तिची अभिनेत्री म्हणून असलेली ओळख आणि उपयुक्ततावाद संपुष्टात येईल. अर्थात या तिच्या ऑब्जेक्टिफीकेशनला तिची मान्यता आहेच. पण मग मान्यता देण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध आहे काय? रविना टंडन या अभिनेत्रीचं अक्षय कुमार सोबत ‘टिपटिप बरसा पानी’ हे गाणं प्रसिद्ध आहे. आता ते गाणं मेल गेझच्या उपयुक्ततावादासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. अर्थात स्वत:च्या त्या आॅब्जेटिफिकेशन आणि सेक्शुअलाझेशनला रविना टंडनचा कन्सेंट होता हे मान्यच आहे. आता भांडवलाच्या उपयुक्ततावादामुळे या गाण्याचा रिमेक बनत आहे ज्यात रविना टंडन ऐवजी कटरीना कैफ असणार आहे आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्यासोबत अक्षय कुमारच अभिनेता म्हणून असणार आहेत. पुन्हा काही वर्षांनी उपयुक्ततावाद कायम राहिल्याकारणाने याच गाण्याचा अजून एक रिमेक बनला आणि त्यात त्या वेळी कटरीना कैफ ऐवजी मेल गेझच्या कामी येणारी नवीन अभिनेत्री घेततेली असेल, तर त्यात कन्सेंटचा प्रश्न उद्भवतो कुठे? अर्थात त्याही गाण्यात पुन्हा अक्षय कुमारच अभिनेता असेल आणि त्याला आपण नैतिक कलाकृती म्हणून आपलंसं करू ही भांडवलाची कमाल आहे! भांडवली उपयुक्ततावाद आणि मेल गेझची परिणामकारकता ही एवढी आहे की स्त्रियांनी विकसित केलेली स्वतःच्या सौंदर्याची व्याख्या ही प्रत्यक्षात याच उपयुक्तततावादावर आधारलेली आहे. मिया खलिफाचा सेल्फ इस्टीम कमी होणं हे याच सौंदर्याच्या अट्टाहासापायी मिळालेलं नैराश्य आहे. 
तार्किक अर्थानं रविना टंडन ही जर अभिनेत्री असेल तर तिला अभिनय अजूनही करता येतोच किंबहुना एवढ्या वर्षांच्या अनुभवामुळे तो अजून चांगला करता येत असेल. पण भांडवली आणि मेल गेझच्या उपयुक्ततावादानुसार आता तिचं ऑब्जेक्टिफिकेशन पहिल्यासारखं करताच येत नसल्याकारणानं तुझी कन्सेंट आहे की नाही हे विचारायलाच रविना टंडनला कोणी जाणार नाही. त्यामुळे कन्सेंट ही काही अशी आभाळातून पडलेली वैयक्तिक गोष्ट नसून पॉवर रिलेशन्समधलं शोषणाचं एक टूल आहे. त्यात कन्सेंट देणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक मर्जी चालते असं समजणं हा आपला गोड भ्रम आहे. 

आपल्या हातात नसलेल्या हितसंबंधातून आपणच आपल्या कल्चरचं पॉर्निफिकेशन करत आलेलो आहोत. ज्याला आपण आजचं पॉर्न समजतो तेच फक्त पॉर्न नसून व्यवस्थेतील प्रत्येक गोष्ट ही जवळपास पोर्निफाईड झालेली आहे. त्या अर्थानं मिया खलिफाचं हे प्रकरण म्हणजे हिमनगाचं वरचं टोक म्हणता येईल. पॉर्नबाबत सुरुवातीला अभ्यासकांमध्ये दोन मतप्रवाह होते. त्यातल्या प्रतिगाम्यांचं म्हणणं होतं की पॉर्नमुळे लैंगिक अनागोंदी माजेल. बलात्कार, स्त्रियांवरचे अत्याचार यांसारख्या घटनांमध्ये वाढ होईल. दुसऱ्या बाजूला उदारमतवाद्यांचं असं म्हणणं होतं की पॉर्नमुळे एवढी वर्ष दबलेल्या स्त्रियांच्या लैंगिकतेला मुक्त वाव मिळेल. काळाच्या ओघात हे दोन्ही अंदाज चुकत गेले. सुरुवातीच्या काळात पॉर्नचं समर्थन करणाऱ्या स्त्रीवाद्यांनी स्त्रियांचं होणार बिभत्सीकरण आणि अतिरंजकतेला घाबरून नंतर पॉर्नला विरोध केला. पण तोपर्यंत पॉर्नवर भांडवलानं पुरेशी पकड जमवलेली होती. आता याला नैतिक आणि मूल्यात्मक अधिष्ठान देण्यासाठी भांडवलशाहीनं समांतरपणे फेमिनिस्ट पॉर्नोग्राफी नावाचा अजून एक बाजार उभा केला. यातलं अंतर्विरोध प्रथमदर्शनी आपल्याला प्रचंड विनोदी वाटत असला तरी भांडवलाच्या प्रभावामुळे ही वरकरणी हास्यास्पद वाटणारी गोष्ट आपण प्रेक्षक म्हणून सहज पचवलेली आहे. 
याचे उदाहरण म्हणून आपण पुन्हा पॉप कल्चर कडे येऊयात. स्त्रीमुक्तीचं गाणं गाणारी पॉप सिंगर ही तिच्या व्हिडिओ अल्बम मध्ये पुन्हा स्वतःच्या ऑब्जेक्टिवफिकेशनला कन्सेंट देत भांडवलाला हवा असलेल्याच शरीराला आकर्षक म्हणून मान्यता देते. उद्या तिचं शरीर या मेल गेजसाठी उपयुक्त राहिलं नाही तर हाच स्त्रीमुक्तीचा संदेश देणाऱ्या पुढच्या व्हिडिओ अल्बम मध्ये तिला जागा नसेल. एका चॅनलवर “तू चीज बडी है मस्त मस्त’ असे बोल असलेल्या गाण्यावर नृत्य करणारी रविना टंडन चॅनल बदलल्यावर “स्त्रियांचं ऑब्जेक्टिफिशेन टाळा’ असं कॅम्पेन करताना दिसते. या दोन्ही गोष्टींमध्ये तिच्या कन्सेंटचा काहीएक संबंध नसून ही निव्वळ भांडवलाची कमाल आहे. या सगळ्याचा अन्वयार्थ स्त्रिया या शोषित तर पुरूष हे शोषक असा अगदीच निघत नाही. समस्या आणि त्यावरचं उत्तर अशा भांडवली हस्तक्षेपाच्या प्रभावाखाली केलेल्या सुलभीकरणामुळेच काही लोक मी टू सारख्या चळवळींना स्त्रीवादी चळवळ समजण्याची गल्लत करतात. शोषण होते हे अधोरेखित करण्यासाठी अगोदर सातत्यानं जन्माला येणारी शोषणाची नवी-नवी प्रारूपं अधोरेखित करणं आधी गरजेचं असतं. कोणत्याही स्त्रीवादी चळवळीचा मुख्य उद्देश हा जेंडर डिवाइड कमी करत स्त्री-पुरुष अशी बायनरी हळूहळू मोडीत काढणं हेच असतं. किमान हेच अभिप्रेत तरी आहे. मी टू सारख्या भांडवली हस्तक्षेपानं बळकटी दिलेल्या चळवळी याच्या नेमकं उलट साध्य करत वाढत्या सेक्शुअलायझेशन आणि पॉर्नफिकेशनला अजून बळ देत जातात. पॉप फेमिनिझमच्या नावानं कन्सेंट सारख्या भ्रामक समजुतीचा आधार घेत उभा राहिलेल्या या डमी फेमिनिस्ट मूव्हमेंट प्रत्यक्षात पुरूषसत्ताक पॉवर रिलेशन्शच्या वाहक आहेत, हे जरी आपल्याला मिया खलिफा प्रकरणाच्या निमित्ताने लक्षात आलं तरी सध्यासाठी पुरेसं आहे.
 

भूतकाळ पाठ सोडत नाही...
> लोकांना वाटतं मी पॉर्न इंडस्ट्रीत कोट्यवधी रुपये कमावते. मात्र, या कामातून मी केवळ आठ लाख रुपये मिळवले आहेत. त्यानंतर मी या कामातून फुटकी कवडी कमावलेली नाही. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर मला सामान्य नोकरी शोधण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. पॉर्न माझ्यासाठी खूप भयंकर होतं.”
 
> लहानसहान धमक्यांची आता मला भीती वाटत नाही. लोकांच्या बोलण्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटत नाही. पण मला सतत आयसिसची भीती वाटते. कुणीही संशयास्पद दिसलं तर मला वाटतं हे लोक आयसिसचे तर नाहीत ना? हे मला ठार तर करणार नाही ना? असा विचार डोकावतो.”
 
> आज पॉर्न इंडस्ट्री सोडून काही वर्षे झाली आहेत. मात्र आजही सार्वजनिक ठिकाणी जाते तेव्हा लोकांच्या नजरेचा मला प्रचंड त्रास होतो. मला माझी  लाज वाटायला लागते. माझ्या खासगी आयुष्याचे पुरते नुकसान झाले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...