Home | Magazine | Rasik | pradeep mhapsekar rasik article

कार्टून लेकाचे!

प्रदीप म्हापसेकर | Update - Mar 17, 2019, 12:08 AM IST

निवडणुका या जितक्या लोकशाहीच्या उत्सव असतात, तितक्याच व्यंगचित्रकारांसाठी पर्वणीसुद्धा. आर. के. लक्ष्मण-शंकर या गतकाळातल

 • pradeep mhapsekar rasik article

  निवडणुका या जितक्या लोकशाहीच्या उत्सव असतात, तितक्याच व्यंगचित्रकारांसाठी पर्वणीसुद्धा. आर. के. लक्ष्मण-शंकर या गतकाळातल्या दिग्गजांपासून केशव-कीर्तिश भट ते अजित नैनन आदी बहाद्दरांनी अगदी कालपरवापर्यंत ही पर्वणी साधली. तसे करताना, प्रस्थापित व्यवस्थेतल्या विसंगतींवर अचूक व्यंगरेषा उमटवली, सामान्यांना जगाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली, भविष्यवेधी विचार रुजवला आणि व्यंगचित्रकला ही कृतीच मुळी प्रस्थापित व्यवस्थेविरोधातलं विधान असतं, हेही शिकवलं. त्या अर्थाने, यंदाची लोकसभा निवडणूकही देशातल्या तमाम व्यंगचित्रकारांसाठी मेजवानी ठरायला हवी. परंतु, हे सर्व व्यंगचित्रकार आजच्या आक्रमक सत्ताधारी आणि विखंडित विरोधी पक्षांकडे कोणत्या नजरेतून पाहताहेत, प्रस्थापितांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यच कोर्टकचेरीत अडकवल्याने अाजच्या व्यंगचित्रकारांपुढची आव्हाने काय आहेत? सोशल मीडियावरच्या ट्रोलधाडीमुळे व्यंगचित्रकारांच्या सर्जनशीलतेवर मर्यादा आल्यात का, या आणि अशा चौकटीबाहेरच्या म्हणूनच फारशा चर्चेला न येणाऱ्या मुद्द्यांचा ज्येष्ठ व्यंगचित्रकार-लेखक प्रदीप म्हापसेकर आणि गजू तायडे यांच्या नजरेतला हा खास वेध...


  लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय. खरं म्हणजे, यंदाची ही निवडणूक आम्हा व्यंगचित्रकारांसाठी प्रचंड मोठा खुराक आहे. तशी प्रत्येक मोठी निवडणूक व्यंगचित्रकारांसाठी आणि खासकरून राजकीय व्यंगचित्रकारांसाठी महत्त्वाची असतेच, परंतु यंदाची जरा "खास'च आहे. जशी दोन वर्षांपूर्वी जगभरातील व्यंगचित्रकारांनी अमेरिकेच्या निवडणुकीत दिवाळी साजरी केली तशी! तेव्हा राजकीय बातम्यांपेक्षा राजकीय व्यंगचित्रांनी अमेरिकेत धुमाकूळ घातला होता आणि व्यंगचित्रकारांच्या अफाट कल्पनाशक्तीला अमेरिकी वाचक-प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आपल्याकडे हे शक्य नाही! सध्याच्या काळात तर बिलकुल नाही.


  मुळात, व्यंगचित्रकार काय असतो...? तो समाजाचा आरसा-बिरसा असतो, हे विधान आता जुनं झालं. व्यंगचित्रकार हा समाजाचा ‘ड्रायव्हर’ अर्थात चालक असतो. समाजाचे विचार समाजालाच वाहायचं काम तो करत असतो. पण अलिकडच्या काळात व्यंगचित्रकार कुठे आहेत? गेल्या काही वर्षांपासून हवी तशी राजकीय व्यंगचित्रं पाहायला मिळत नाहीत. नेमकं कारण काय आहे? खरं तर हा विचार जनसामान्यांनीच करायला हवा. व्यंगचित्रकारांमध्ये इतकी उदासीनता का आली आहे, याचे कारण शोधण्याचा प्रयत्न याच सामान्य जनांनी करायला हवा. खरं तर, भारतीय माणूस हा मला नेहमीच गप्पिष्ट वाटतो. सतत बोलणारा, वाद घालणारा, चर्चा करणारा. ही भारतीय माणसाची ओळख आहे. पण मग व्यंगचित्रांबाबत फारसे आशादायक चित्र का दिसत नाहीये? ठराविक वृत्तपत्रांत ठराविक व्यंगचित्रकारच काम करताना दिसतात. पण नजरेत भरावी, कौतुक करावी अशी चित्रे मात्र फारशी दिसत नाहीत. या निवडणुकीतही हे चित्र किती स्पष्ट असेल, हे सांगता येणार नाही. आपणच आता एकमेकांकडे संशयाने पाहतो आहोत. संघटितपणा आपण गमावतोय बहुधा आणि त्याचाच परिणाम व्यंगचित्रकाराच्या चित्रावर होत असावा.


  व्यंगचित्रकार हा जर समाजाचा ड्रायव्हर असेल, तर असा विचार करणारे व्यंगचित्रकार महाराष्ट्रात आहेत किती? आणि ते समजून घेणारे लोक तरी किती आहेत? माध्यमांची ताकद कमी होत गेली, तसे व्यंगचित्रकारांचे महत्व कमी होत गेले काय? की माध्यमे ही कुणाच्या तरी आहारी गेली, आणि व्यंगचित्राचे स्वरूप बदलले? की त्यामुळेच व्यंगचित्रकाराची भूमिका मवाळ होत गेली का? प्रबळ राजकीय शक्तीचा त्यांच्यावर परिणाम झाला का? "बिटविन द लाइन्स'चा अर्थ सांगणारी व्यंगचित्रकारांची लाइन अस्पष्ट, धूसर का होत गेली.? थोडक्यात काय तर, व्यंगचित्रकार आजच्या व्यवस्थेला घाबरला आहे का?


  १९९४-९५चा काळ असेल. तेव्हा ‘मी फ्री-प्रेस जर्नल’मध्ये काम करत होतो. एका मोठ्या राजकीय पक्षाचा मोर्चा फोर्ट भागात आला होता. ‘फ्री-प्रेस’च्या एका वार्ताहराला त्यात धक्काबुक्की झाली आणि वार्ताहर महाशय रागातच ऑफिसला आले. तेव्हा मोर्चा आटोपताच पक्षाचे आठ-दहा प्रमुख नेते, त्या वार्ताहराची समजूत काढायला ‘फ्री-प्रेस’मध्ये आले होते. संपादकांशी त्यांचं भेटणं, फक्त पाचेक मिनिटाचं होतं. पण त्या वार्ताहराशी ते अर्धा-पाऊणतास बोलले. ही ताकद होती, त्यावेळी मीडियाची. पण आता काय दिसतंय...? सांगायचा मुद्दा हाच आहे, की राजकीय शक्ती अति प्रबळ झाल्याने व्यंगचित्रकार आणि राजकारण यातली दरीसुद्धा वाढत चालली आहे. म्हणून आजचा व्यंगचित्रकार सावधपणे काम करताना दिसतोय.


  दक्षिणेकडे व्यंगचित्रकारांची मोठी परंपरा आहे. केवळ वृत्तपत्रात नाही, तर साप्ताहिके आणि मासिकांमध्येही व्यंगचित्रकांराचा मोठा दबदबा पाहायला मिळतो. पण, इकडे महाराष्ट्रात चित्र वेगळं दिसतंय. व्यंगचित्रकलेच्या बाबतीत खूपच उदासीनता दिसते. व्यंगचित्र म्हणजे हसू आलेच पाहिजे, असा काहीसा गैरसमज आपल्याकडे आहे. व्यंगचित्र तुम्हाला विचार करायला लावतं. ती टीका असते, ते भाष्य असतं , हे अजून लोकांना कळलेलं नाही. ही एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूला चांगलं काम करणारे व्यंगचित्रकारही खूप कमी दिसतात. त्यामुळे राजकारणावर व्यंगचित्रकारांचा जोरदार ठसा दिसत नाही.


  सोशल मीडियामुळे आपल्याकडे नवा गोंधळ निर्माण झालाय. या निवडणुकीत निनावी कार्टूनचा आता खूप सुळसुळाट होईल. निवडणुकीसाठी अशी छुपी व्यंगचित्र तयार केली जातील. हे काम करणारे कुणी व्यंगचित्रकार नसावेत. प्रख्यात अमेरिकन व्यंगचित्रकार बेन गॅरिसन निवडणुका आल्या, की आपल्याकडे हमखास दिसतो. त्याच्याच चित्रात फेरफार करून त्याची चित्रे इथे, लोकांच्या माथी मारली जातात. वर म्हटलं जातं, ते बघा! त्या अमेरिकन व्यंगचित्रकाराला इथलं कळतं, पण आपल्या लोकांना कळत नाही. आणि लोकही अशी कार्टून फॉरवर्ड करत बसतात. कुणालाही बेन गॅरिसन माहीत नसतो. मलाही अशी चित्रं पाठवली जातात. दोन-चार वेळा सांगितलं, ते चित्र बेनचं नाहीय. पण कुणी तुमचं फारसं एेकत नाही. खरं तर लोकांनी फार सावध राहायला हवं अशा वेळी. परवा, कुणी तरी मोदींचं चित्र असंच पाठवलं होतं, पाक हल्ल्याबाबतचं. सोशल मीडियामुळे हे प्रकार वाढू लागले आहेत, आणि निवडणुकीत अशाच चित्रांची चलती आहे. आता हा सगळा गोंधळ कुणी निस्तरायचा? सोशल मीडियावर या अशा व्यंगचित्रकांरांचे युद्ध सुरू होईल. हे निनावी चेहऱ्याचे व्यंगचित्रकार कोण, हे अखेरपर्यंत लोकांना कळणारदेखील नाही. प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पाठीमागे एक बलाढ्य वृत्तपत्र समूह होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे त्यांची तितकीच बलाढ्य संघटना होती.


  पण आताच्या व्यंगचित्रकारांचं तसं नाहीये. म्हणूनच कोर्टकचेऱ्यात त्यांना अडकायचं नाही. काही नेते मंडळी व्यंगचित्रकारांचा उत्तम प्रकारे उपयोगही करून घेतात आणि त्यात यशस्वीही होतात. त्याचे मोठे उदाहरण म्हणजे, अरविंद केजरीवाल. दिल्लीतल्या असीम त्रिवेदीनामक व्यंगचित्रकाराचा केजरीवालांनी निवडणुकीत अत्यंत चाणाक्षपणे उपयोग करून घेतला. पण इथे प्रश्न निर्माण होतो तो हा की, व्यंगचित्रकाराला अशी राजकीय भूमिका असावी का? केजरीवाल मुख्यमंत्री झाले, पण त्या व्यंगचित्रकाराचे काय? पुढे ते कुठेच दिसले नाहीत.


  राज ठाकरे मोठे व्यंगचित्रकार आहेत. पण त्यांच्याही व्यंगचित्रांची नक्कल करून त्यात फेरफार करून सोशल मीडियावर टाकले जातात. हा अलीकडच्या काळातला मोठा धक्कादायक प्रकार आहे. तुमची गोष्ट जर पटली नाही, तर त्याची विल्हेवाट लावून ती परत तुमच्यावर भिरकावली जातेय. हे सगळं समाजाला कुठे घेऊन जाणार आहे? यामुळे समाज अचानक गोंधळून जातो. म्हणूनच लोकांनी चांगलं आणि वाईट यातला फरक समजून घ्यायला हवा. चांगल्या व्यंगचित्राचा आदर करायला हवा. त्या चित्राचे कौतुक करायला हवे. आणि त्या व्यंगचित्रकाराच्या पाठीशी ठामपणे उभं रहायला हवं. म्हणजे मग व्यंगचित्रकलेलाही प्रोत्साहन मिळेल.


  ९ मे १७५४ मध्ये अमेरिकेतल्या पेनसिल्व्हानिया गॅझेटमध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध झालं होतं. जगातलं ते पहिलं व्यंगचित्र मानलं जातं. बेन्जामिन फ्रॅन्कलिन याने रेखाटलेलं, ते इतिहासातलं सर्वात प्रसिद्ध व्यंगचित्र गणलं जातं. Join or Die या शीर्षकाखाली ते चित्र होतं. एका सापाचे पाच-दहा तुकडे झालेले दाखवले होते. त्या प्रत्येक तुकड्यावर त्या वसाहतींचा नंबर होता. व्यंगचित्रकाराला म्हणायचं होते, आपआपसात भांडू नका, एकत्र या. आजही तीच परिस्थिती आहे. लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. तरच व्यंगचित्रकारांना चांगले दिवस येतील. चांगले व्यंगचित्रकार तयार होतील. तरच पुढच्या निवडणुकांमध्ये चांगली व्यंगचित्र पाहायला मिळतील. अलीकडे, बऱ्याच नेत्यांनी ट्रोल करणाऱ्यांना दम दिलाय. व्यंगचित्रकार ट्रोलिंग करत नाहीत. तरी त्याची चित्रं या सगळ्यात भरडली जातील. हा जो सगळा गोंधळ झालाय त्यात मोठी संधी हात जोडून उभी असूनही व्यंगचित्रकार ही निवडणूक कशी रेखाटेल, हे चित्र अजून स्पष्ट दिसत नाहीये. काळाचं हे विधान व्यंगात्मक कमी सर्वव्यापी घुसमट दर्शवणारं अधिक आहे!


  प्रदीप म्हापसेकर
  pmpm007@gmail.com

Trending