आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोईचा पदर आला खांद्यावरी…

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीप आवटे  

बाई म्हणजे पाळीव प्राण्यासारखी आज्ञाधारक, गरीब, स्वतःची बुद्धी नसणारी आणि असली तरी न चालवणारी, सर्व बाबतीत पुरुषांवर अवलंबून असणारी असे चित्र पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये रंगवलेले असते. त्यामुळं जॉली जोसेफसारखी घटना घडली की पुरुषसत्ताक व्यवस्था खडबडून जागी होते आणि बाईभोवतीचे साखळदंड अजून करकचून बांधायची तयारी करू लागते.
 
एका मल्याळम नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेलं एक व्यंगचित्र. नवरा-बायको डायनिंग टेबलवर जेवायला बसलेत. नवरा बायकोला घास भरवतोय आणि नवरा म्हणतोय," माझं तुझ्यावर प्रेम नाही, असं समजू नकोस. आजपासून जेवणातला पहिला घास तुला भरवल्याशिवाय मी जेवणारच नाही." 

आणि या कार्टूनवर मल्याळम मंडळी डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसतात. आता या कार्टूनमध्ये हसण्यासारखे काय आहे, असा विचार आपण करत राहतो तोवर वॉट्सअपवर केरळी मित्राने पाठविलेले एक व्हिडिओ येऊन धडकतो. घरी दोन-तीन पाहुणे आलेत. एक तरुण मुलगी त्यांना पाणी देतेय. पाहुण्यातील एकजण तिला "तुझं नाव काय?' असं विचारतो आणि "जॉली' असे उत्तर येते आणि सगळे पाहुणे दिसेल ती चप्पल घालत धूम्म पळत सुटतात.

आपण पुन्हा कोड्यात! झालंय तरी काय? अशा स्वरूपाच्या मेसेजचा सध्या केरळमध्ये सोशल मीडियावर सुळसुळाट झालाय. आणि याला कारण आहे कोझिकोडे जिल्ह्यात झालेले जॉली जोसेफ प्रकरण. जॉली ही मध्यमवयीन गृहिणी सीरियल किलर म्हणून पकडली गेलीय. या बाईने आपल्याला नवऱ्याची संपत्ती मिळावी आणि आपल्याला हव्या त्या पुरुषाशी लग्न करता यावे म्हणून मागच्या दहा-बारा वर्षात सासू, नवरा, प्रियकराची बायको, मुलगी अशा जवळपास सहा लोकांचा जीव घेतला. मटण सूप किंवा अन्य खाद्य पदार्थामध्ये विष मिसळून तिनं हे काम बिनबोभाट पार पाडले. कुणालाच तिचा संशय आला नाही पण अखेरीस सासऱ्याच्या बनावट मृत्युपत्रावरून ती पकडली गेली आणि सारंच भांडं फुटलं. तिनं आपला गुन्हा मान्य देखील केलाय. 

पण या घटनेवरून केरळमधील पुरुषसत्ताक मनोवृत्तीला स्त्रीद्वेषाचे अजून एक कारण सापडले आहे. एका जॉली नावाच्या बाईने असले घाणेरडे काम केले म्हणून संपूर्ण स्त्री वर्गालाच बदनाम करण्याची मोहीम सोशल मीडियावर जणू सुरू झाली आहे. आणि हे केवळ सोशल मीडियावरच नाही तर घरीदारी, रस्त्यावर, बाजारात लोक बायकांना घालूनपाडून बोलत आहेत. बसमध्ये पुरुष मंडळी जाणीवपूर्वक बायकांच्या रांगेकडे पाहत, त्यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात, "बाबाहो जपून बरं, या बायका कधी तुमच्या मटण सुपात सायनाइड मिसळून तुमचा जीव घेतील याचा नेम नाही,' असे डायलॉग हसत हसत मारताहेत. एका बाईच्या गुन्ह्यासाठी संपूर्ण स्त्री वर्गालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे, कितपत योग्य आहे? आश्चर्य म्हणजे हे त्या केरळमध्ये घडतंय जिथं महिला साक्षरतेचे प्रमाण नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पण जिथं समाज पुरुषसत्ताक आहे तिथं सर्वत्रच हे घडताना दिसते. मग ते केरळ असो की महाराष्ट्र. 

बाई म्हणजे पाळीव प्राण्यासारखी आज्ञाधारक, गरीब, स्वतःची बुद्धी नसणारी आणि असली तरी न चालवणारी, सर्व बाबतीत पुरुषांवर अवलंबून असणारी असे चित्र पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये रंगवलेले असते त्यामुळं जॉली जोसेफसारखी घटना घडली की पुरुषसत्ताक व्यवस्था खडबडून जागी होते आणि बाईभोवतीचे साखळदंड अजून करकचून बांधायची तयारी करू लागते. वरवर दिसणाऱ्या विनोदी कार्टूनमध्ये किंवा मीम्समागे ही पुरुषी मनोवृत्ती ठळकपणे उभी असते, अनेकदा ती आपल्याला जाणवत नाही एवढेच! मल्याळम चित्रपटातही स्त्रीची टवाळी उडवणाऱ्या संवादाची भरमार असते आणि लोक ते एन्जॉय करतात. एक जॉली सीरियल किलर म्हणून पुढं आली तर सर्व स्त्री जातीला आरोपी करणारे आपण जेव्हा पुरुष असेच गुन्हे करताना सापडतात तेव्हा काय करतो? याच केरळमध्ये दिलीप नावाच्या तिथल्या सुप्रसिद्ध हीरोवर एका अभिनेत्रीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप झाला तेव्हा सर्व पुरुषांना आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभे केले कुणी! चांगले वाईट गुण स्त्री - पुरुष दोघांमध्येही असतात तरीही समाजातील बलशाली गटाने दुय्यम गटाच्या दुर्गुणांचे असे सर्वसामान्यीकरण करुन एक स्टिरिओटाईप उभा करण्याचे उद्योग कायमच सुरु असतात. आपण तर्कशुध्द विचार करायचे नाकारले तर आपण देखील त्याचे बळी ठरु शकतो.  प्रत्येक मुसलमान व्यक्तीकडे संशयाने पाहणे, मुसलमान व्यक्तीला सहजी घर भाड्याने न मिळणे, याची कारणे देखील थोड्याफार फरकाने अशाच प्रकारच्या मनोवृत्तीत दडलेली असतात. हेच युरोपात काळ्यांबद्दल होत असते.

आपल्याकडे स्त्रीद्वेष्टा विचार मांडणाऱ्या व्यक्तींना मोठी सामाजिक मान्यता मिळताना आपण पाहतो. म्हणजे स्त्री पुरुष समता हा विचार जरी आधुनिक विचार म्हणून आपण मान्य केला तरी समाजातील फार मोठा वर्ग हा स्त्रीला दुय्यम स्थान देताना दिसतो. महाराष्ट्रात इंदुरीकर महाराज कीर्तनकार म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांची विनोदी शैली, गावाकडील भाषा आणि वक्तृत्वातील सहजता लोकांना आकर्षित करते. पुढील दोन वर्षाच्या त्यांच्या कीर्तनाच्या तारखा बुक आहेत, इतकी त्यांना लोकांची मागणी आहे. इंदुरीकरांच्या शैलीला शंभरपैकी शंभर मार्क द्यायलाच हवेत, पण त्यांच्या कीर्तनात स्त्रीच्या अनुषंगाने जे विचार व्यक्त होतात, त्याबद्दल मात्र आपण सर्वांनी विचार करायला हवा. इंदूरीकर महाराज प्रेमविवाहाला विरोध करताना प्रेमविवाह केलेली स्त्री नवऱ्याला एकेरी हाक मारते म्हणून टीका करतात. महाराजांच्याच भाषेत सांगायचे तर, ""लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे? चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं." हे विधान स्त्रीला हीन लेखणारे तर आहेच, पण त्याचवेळी हे विधान घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याचा भंग करणारे आहे. कारण बायकोने एकेरी हाक मारली म्हणून इंदुरीकर महाराज चक्क बायकोचा दात पाडायची भाषा बोलतात. त्यांच्या कळत नकळत या विधानातून घरगुती हिंसाचाराला प्रोत्साहन मिळत तर नाही ना, याचा विचार व्हायला हवा. एका कीर्तनात ते महिलांना "जनावर' म्हणून संबोधतात, "आपली पोरगी घरातून बाहेर पडताना कसे कपडे घालून बाहेर पडते, हे तिच्या आईला माहिती नाही का? का पारायणाला बसली तिची आई? आपलं जनावर पाहतंय कुणीकडं, चालतंय कुणीकडं, थोबाड कुणीकडं वाशीतंय? आपलं जनावर कसं राहतंय, हे तिच्या आईला कळत नाही का? लोकांनी सांभाळायच्या का तुमच्या पोरी? पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी फटकावली पाहिजे."बायकांनी जीन्स पॅन्ट घालण्यावर, गाऊन घालण्यावर त्यांना आक्षेप आहेत. मुलींनी प्रेमात पडण्यावर त्यांची हरकत आहे. बायकांनी हातात बांगड्या घातल्या नाहीत तर धर्म बुडेल अशी भीती त्यांच्या प्रतिपादनातून काही वेळा व्यक्त होते. स्त्री-पुरुषांनी सद्वर्तनी असले पाहिजे, स्त्री - पुरुषांनी नवरा बायकोच्या नात्यापलीकडे आई - बाप, सासू सासरे आणि इतर नातेसंबंध जपले पाहिजेत, याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. घराचे घरपण जपण्यासाठी दोघांनीही वेळप्रसंगी तडजोडही केली पाहिजे, यातही काही शंका नाही.  पण म्हणून तुम्ही बाईचे माणूस असणेच नाकारणार आहात का? तिला चप्पल, जनावर लेखून तिचा पदोपदी अवमान करणार आहात का? तिला मारहाण करण्याचा अधिकार पुरुषाला  बहाल करणार आहात का, असे अनेक प्रश्न आहेत. कुटुंबसंस्था टिकवण्याची जबाबदारी केवळ स्त्रीची नाही, ती स्त्री -पुरुष दोघांचीही आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय याचे उत्तर "केवळ लोकांना आवडते' म्हणून एखादी गोष्ट योग्य ठरत नाही. समाजप्रबोधन करणाऱ्यांनी प्रसंगी लोकांचा रोष पत्करुन योग्य ती गोष्ट मांडली पाहिजे. सत्यनारायणाला, जत्रा - यात्रा, कर्मकांडाला विरोध करणारे गाडगेबाबा कुठे लोकांना आवडणारी गोष्ट सांगत होते ? 

महात्मा फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे, डॉ. आंबेडकर, आगरकरांसारख्या सुधारकांनी ही मराठमोळी भूमी नांगरुन त्यात समतेची पेरणी केली आहे, याचे भान आपण ठेवायला हवे. आपल्याला मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न करा, असा प्रस्ताव समोर आला असता तो नाकारुन मग, "सावित्रीनेही दुसरं लग्न करायला हवं, कोणी सांगावं दोष माझ्यातही असू शकतो,' असं म्हणणारे जोतिबा फुले आपण विसरुन तर नाही ना चाललो. आज महाराष्ट्रासह देशभरात स्त्री भ्रूण हत्या होताहेत. त्याबद्दल आपण काहीच का बोलत नाही. कोंबडीच्या गर्भाची हत्या नको म्हणून अंडंही न खाणारे आपण मुलगी आहे म्हणून गर्भपात करुन, मानवी गर्भाची हत्या कशी काय करु शकतो, याचाही विचार आपण करायला हवा. ' डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी,' असं म्हणत रुढी परंपरा बंडखोरपणे तोडत, स्त्रीजन्म म्हणून उदास होण्याचं कारण नाही, असं सांगत जगलेली संत जनाबाई आपल्याला जवळची का वाटत नाही, हा खरा प्रश्न आहे. 

लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

बातम्या आणखी आहेत...