आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याला वर्तमानपत्र वाचता येतं का?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोबेल विजेती ओल्गा तुकार्चुक - Divya Marathi
नोबेल विजेती ओल्गा तुकार्चुक

प्रदीप आवटे  

ओल्गा तुकार्चुक पोलंडच्या इतिहासातील काळ्या गोष्टींना धैर्याने पाहू शकते, त्या घडल्याच नाहीत असा खोटारडेपणा तिला खपत नाही. देशातील अल्पसंख्याक, लैंगिक कल वेगळे असणारे लोक यांच्या बाजूने उभे राहताना ती डगमगत नाही आणि म्हणूनच आज नोबेल जिंकूनही तिच्या देशाच्या सरकारला ती आपली वाटत नाही. ती देशद्रोही वाटते.
 
डोक्यावर वाढलेलं केसांचं टारलं, महिनोन‌्महिने तेल, कंगवा यांचा संबंध न आल्याने पिंजारलेले केस, अंगावर फाटके पाण्याला तहानलेले कळकट कपडे, तेलकट दाढी वाढलेला निर्विकार चेहरा. फुटपाथवर उकिडवे बसलेल्या त्याने एकदम ब्रेक लावल्यासारखं माझं वेगाने चालणं थांबवलं. मी क्षणभर त्याच्याकडं निरखून पाहत उभा राहिलो. खरं म्हणजे मला गडबड होती, त्याच्याकडं पाहत थांबायला मला वेळ नव्हता आणि आपल्यापैकी कुणालाच असा वेळ नसतो थांबायला कुठंही, निरर्थक! आपण सगळे किती कामात असतो म्हणून तर आपण प्रचंड धावत असतो, स्पीडची मर्यादा तोडत, रस्त्यातील सिग्नलला कोलत अगदीच ट्राफिक  पोलिस आडवा आला तर लाचार हसत त्याच्या हातावर आपली अवघी नीतिमत्ता टेकवत, याला त्याला कट मारत आपण धावत असतो. मी ही असाच धावत होतो पण या वेड्या दिसणाऱ्या ध्यानाने माझा धावण्याचा मोसम एकदम कट केला आणि मी चक्क थांबलो 

मी त्याच्याकडं पाह्यलं, त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, तो उन्हाला उकिडवा बसून चक्क वर्तमानपत्र वाचत होता. त्याची नजर स्थिर होती. तो खाली बघून शांतपणे वाचत होता. माझ्याकडे पाहायला त्याला फुरसतदेखील नव्हती. मी स्वतः शीच हसलो. "हा वेडा जीव काय वाचत असेल?' मला प्रश्न पडला आणि दुसऱ्याच क्षणी मी एकदम विचारात पडलो. मला वाटलं, हे दृश्य आजच्या काळाचं मेटाफर आहे. मला एकदम त्याच्या जागी मी दिसू लागलो. मीही असाच रोज वाचतो वर्तमानपत्र, पण कुठं समजतो वर्तमान? कुठं कवेत येतं हे जग, तरीही रोज सकाळी वर्तमानपत्र वाचण्याची असोशी संपत नाही. एखाद्या व्यसनी माणसासारखे आपण रोज नव्या वर्तमानपत्राची वाट पाहत राहतो, कालचे वर्तमान रद्दी होऊन धूळ खात राहते,आज पचत नाही तरी आपण रवंथ करत राहतो, एक ते सोळा प्रत्येक पानाची! मी क्षणभर सैरभैर झालो, इकडं-तिकडं पाह्यलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन महापुरुषांचे पुतळे होते. जे झेपत नाही, पेलवत नाही, रक्तात विरघळून चालता येत नाही, ते दगडी पुतळ्यात बंद करून ठेवायची कला आपण चांगलीच विकसित केली आहे. आणि त्याचं एकदम माझ्याकडे लक्ष गेलं, आपले पिवळे दात विचकीत तो माझ्याकडे पाहत हसला आणि आरशात पाहताना दचकावं तसं दचकून मी माझा रस्ता धरला. मागे वळून पाह्यलं तर तो पुन्हा वर्तमानपत्र वाचण्यात रमून गेला होता.आपल्याला खरंच वर्तमानपत्र वाचता येतं का? मी स्वतःलाच प्रश्न विचारला आणि विचारात पडलो. त्या फुटपाथवरील हमशकलमुळे माझी गाडी रुळावरून घसरली होती.

“ मला ती गोष्ट  आवडते, महत्त्वाची वाटते, जी लोकांना जोडते, एकत्र आणते.  अशी गोष्ट जी सतत आपल्याला आठवण करून देते की आपण किती एकसारखे आहोत. भले आपली नावं, भाषा, देश, धर्म वेगवेगळं असेल, पण आपणां सर्वांना जोडणारे किती अदृश्य धागे आहेत. खरं साहित्य या  धाग्यांचं दर्शन आपल्याला सतत घडवत राहतं. खराखुरा लेखक आपण सगळे एक असल्याची, आपणा सर्वांची सतत पुढं पुढं जाणारी, आपल्या डोळ्यांसमोर घडत असलेली गोष्ट सांगत असतो. आणि आपण सगळे जण या गोष्टीचा छोटासा पण ताकदवान भाग असतो,” 

आजच्या वर्तमानपत्रात वाचलेला एक तुकडा मनात अजून रेंगाळत होता. त्या तुकड्याशेजारी एका गोऱ्यापान, हसऱ्या बाईचा फोटो छापला होता. ओल्गा तुकार्चुक तिचं नाव. तिला नुकताच नोबेल पुरस्कार जाहीर झाला म्हणून तिची छोटीशी मुलाखत आजच्या वर्तमानपत्रात आली होती. नोबेल पुरस्कार म्हणजे जगातला सर्वात मोठा पुरस्कार. इतकं साधंसुधं बोलणाऱ्या या बयेला कसा मिळाला असेल हा पुरस्कार? आणि जिथं तिची मुलाखत छापलीय त्याच पेपरमध्ये काश्मीरची बातमी आहे, आसामची बातमी आहे, सिरियावर तुर्कस्तानने केलेल्या हल्ल्याची बातमी आहे. मला भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वाहत येऊन निष्प्राण पालथा पडलेला इवलासा जीव अलान कुर्दी आठवतो, यादवी युद्धात त्याचं सिरिया जळत होतं, आणि जगातला कोणताही देश त्याला आणि त्याच्या कुटुंबाला दार उघडायला तयार नव्हता म्हणून अखेर भूमध्य सागराने त्याला पोटाशी धरलं, या बातम्या वाचल्याच होत्या की आपण, पण कळल्या कुठं कुणाला? मला परवा इस्तंबूलला भेटलेली ट्राममध्ये भीक मागत फिरणारी अलान कुर्दीचे देशबांधव मुलं आठवली. ब्राझीलमधल्या अमेझॉन जंगलाचा धूर तुमच्या-माझ्या घरापर्यंत येऊन आपला श्वास कोंडला तरी पुन्हा आरेमध्ये झाडं कापली गेली. आपण आपल्याच अंत्यसंस्काराची तयारी करतोय का? उघड्यावर शौचाला बसले म्हणून दोन लहानग्या जीवांना जिवे मारल्याची बातमी थोडी जुनी झाली , वर्तमानपत्र रद्दीत गेलं तरी बातमी मेंदूत रुतून बसलीय ती निघता निघत नाही. कुणीतरी सांगतो, पश्चिमेकडील मानवाधिकार आणि पूर्वेकडील मानवाधिकार यात फरक आहे. “ अरे आई कुठलीही असो, सिरियातील नाही तर आसाममधली, लेकरु जन्मलं की तिला पान्हा फुटतो आणि लेकरू दिसेनासं झालं की हंबरडा,” मी झोपेत किंचाळावं तसं किंचाळतो. मग उगीच डोके खाजवत राहतो, वाटतं, ही ओल्गा कोणत्या गोष्टीबद्दल बोलते आहे? माणसांना जोडणारी गोष्ट तिला भेटते तरी कुठे? मला वर्तमानपत्र वाचता येत नाही की हिला ते वाचता येत नाही. आणि जीभ हा शरीरातील सर्वात बलवान स्नायू आहे, हे कुणालाच कसे जाणवत नाही, कोणाच्याच बलवान जिभेला सत्य कसे पेलवत नाही ? 

ओल्गाला पाचही खंडांतील माणसाला जोडणारे अदृश्य धागे जाणवताहेत, दिसताहेत. ती गोष्टी सांगतेय आपल्याला.. अशा गोष्टी ज्या आपलेल्या गाढ झोपेतून खडबडून जाग्या करतील, जे आपल्याला सहजी दिसत नाही, त्या आपल्या डोळ्यांना दिसतील. आपल्या वेगळया रंगरूप, भाषा, लिंग, धर्म यापलीकडे आपण सारे एक आहोत, हे आपल्याला कळेल. प्रत्येक देशाच्या इतिहासात काही अभिमान वाटावा अशा गोष्टी असतात तशाच काही लाज वाटाव्या अशाही गोष्टी असतात. ओल्गा  पोलंडच्या इतिहासातील काळ्या गोष्टींना धैर्याने पाहू शकते, त्या घडल्याच नाहीत असा खोटारडेपणा तिला खपत नाही. देशातील अल्पसंख्याक, लैंगिक कल वेगळे असणारे लोक यांच्या बाजूने उभे राहताना ती डगमगत नाही आणि म्हणूनच आज नोबेल जिंकूनही तिच्या देशाच्या सरकारला ती आपली वाटत नाही. ती देशद्रोही वाटते. “ हो, माहिताये तुम्ही लई भारी आहात, स्वीकारा नोबेल-बिबेल, पण ते पोलंडवर थुंकू नका,” अशा भाषेत तिथला एक पत्रकार लिहितो. हे असं का होत असावं? जी माणसं आपल्याला आपला वर्तमान उमजून घेऊन भविष्याचा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा रस्ता दाखवत असतात ती आपल्याला नकोशी, देशद्रोही का वाटतात? आज आपल्याच देशात ओल्गा बॉडीगार्डशिवाय फिरू शकत नाही. जगातल्या सर्व माणसांसाठी गाणं गाणारी एक साधीसुधी बाई आपल्याला इतकी धोकादायक का वाटते ? आपल्या गोष्टी वाचणाऱ्या प्रत्येकाचं मन अधिक विशाल व्हावं, त्याचे सारे दरवाजे उघडावेत, आपल्या अवतीभवतीच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे त्याला नव्या नजरेने पाहता यावं, म्हणून लिहिणाऱ्या ओल्गाची खरं म्हणजे भीती का वाटावी? आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या माणसाची एवढी नफरत कशासाठी? सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, या धर्ममान्य सत्याला गॅलिलिओ- कोपर्निकसनी प्रश्न विचारला नसता तर आज आपण चांद्रयान पाठविण्याचे धाडस दाखवू शकलो असतो का?  एकसारखं विचार करायला, एकसारखं वागायला माणसं म्हणजे प्रोगॅम केलेली मशीन्स नाहीत, हे आपल्याला कळत कसं नाही? आपलं वेगळेपण, आपल्यातलं वैविध्य हेच तर आपल्या जगण्यातलं सौंदर्य आहे, हेही आपल्याला उमजू नये? आणि समजावून देऊ पाहणाऱ्या लेखक, पत्रकार, कलावंतांना आपण ट्रोल करत राहावं, हे पोलंडपासून आपल्यापर्यंत सर्वत्र का घडते आहे, कोण जाणे! नेपथ्य आणि नावं बदलून तेच नाटक इथून तिथून सर्वत्र सुरू राहतं. आपण फक्त या नाटकाच्या प्रयोगाच्या बातम्या वर्तमानपत्रात पुन्हा पुन्हा वेड्यासारख्या वाचत राहतो.  

मग वाटतं, आपण बहुतेक पुरस्कार देण्यासाठी काही माणसं वेगळी काढून बाजूला ठेवलीत. आपला आंबेवाला किंवा सफरचंदवाला जसं दाखवायचा नमुना म्हणून काही फळं बाजूला काढून ठेवून गिऱ्हाईकाला छोटीशी फोड खाऊ घालतो तसं या ओल्गासारख्या माणसांचं असावं. ही फक्त दाखवायाला ठेवलेली असावीत. त्यांना पुरस्कार द्यावेत, त्यांची भाषणं ऐकावीत, भव्य मुलाखती घ्याव्यात, पण त्यातील एकही शब्द आतपर्यंत झिरपत जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. मग ओल्गाचेच शब्द आठवतात, “ प्रत्येक रात्र जगाला त्याचं ओरिजिनल रूप परत देत असते - गोठलेलं, कुठलीही हालचाल नसलेलं, थंड! प्रत्येक दिवस म्हणजे कल्पनेचे वेडी झेप असते, पण  हे जग मुळात गर्द काळं आहे.” अशा या गर्द काळ्या जगाला उजेड प्यालेल्या दिवसाचं स्वप्न दाखवणाऱ्या प्रत्येक ओल्गाचं थडगं आपण पुरस्कारांनी बांधत असतो की काय?  मी पुन्हा वळून पाह्यलं, तो अजूनही वर्तमानपत्र वाचतच होता. 

लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

बातम्या आणखी आहेत...