आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला अश्वत्थाम्याची आठवण का येतेय?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

" लिओ तुला माहीत आहे, माझ्याकडे एक सिक्रेट आहे. असं सिक्रेट ज्याच्यामुळे सगळी माणसं सुखी समाधानी होतील. कोणी कुणाशी भांडणार नाही, कुणी कुणाचा द्वेष करणार नाही, या जगात ना युद्ध असेल ना लढाई ! ते सिक्रेट जर तुला कळालं तर हे जग किती सुंदर होईल लिओ! तुला माहितेय, ते सिक्रेट मी एका हिरव्या ओल्या फांदीवर लिहून ती हिरव्यागर्द दरीत रोवलीय.’ आणि तेव्हापासून आजवर मी त्या हिरव्या ओल्या फांदीचा शोध घेतोय, ती मला गवसली की जग किती सुखी होऊन जाईल. 
 
सिग्नलवरुन वळतानाच ९४ नंबर बस मागून येताना दिसली आणि मी पळतच बसस्टॉप गाठला, धपापत्या छातीने बसमध्ये चढलो. नेहमीची खिडकीजवळची जागा गेली होती. माझ्या नेहमीच्या जागेवर एक म्हातारा बसला होता. तो खिडकीतून बाहेर पाहत होता. मी त्याच्या शेजारी बसताच त्यानं चमकून माझ्याकडं पाह्यलं. मला दोन मिनिटं काही कळेचना. हा म्हातारा इथला वाटत नव्हता. अंगावर काळा झग्यासारखा सदरा, छातीवर रुळणारी टागोर स्टाईल पांढरीशुभ्र दाढी आणि टकलामुळे मूळचे विशाल कपाळ आणखीनच विशाल भासत होते. म्हातारा माझ्याकडं पाहत हसला आणि ओठातल्या ओठात पुटपुटल्यासारखं "हॅलो' म्हणाला. 
आणि माझी खात्रीच झाली. लिओ निकोलाविच टॉलस्टॉय. येस्स! लिओ टॉलस्टॉयच होते ते..! मला आश्चर्यानं भोवळ येते की काय असं वाटत होतं. 
"तुम्ही आणि इथं?,"मी आश्चर्याने विचारले तर तो दाढीतल्या दाढीत हसत म्हणाला, "अरे, अजून विसरला नाहीस मला तू? गुड!'
"अहो तुम्हाला विसरायचा प्रश्नच येत नाही. अगदी काल परवा तुमच्या "वॉर आणि पीस' या कादंबरीवरुन आमच्याकडे गोंधळ सुरु होता.' 
त्यानं हलकेच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "जाऊ दे रे, "वॉर आणि पीस' ला तर मी कादंबरीच मानत नाही.'
"काही तरीच काय ? मग तुम्ही ती काय म्हणून लिहली ?'
"मी स्वतः युध्दात भाग घेतला होता. युध्द, लढाया का होतात, मला खूप उत्सुकता होती, हे जाणण्याची!  माणसं का भांडतात? कुणी एखादा नेपोलियन, एखादा झार पूर्ण देशाचे भवितव्य ठरवू शकतो का? अशी एक दोन माणसं एका मोठ्या समूहाला वेगळं वळण लावू शकतात, की त्या त्या देशाची संस्कृती, कला, समाजजीवन हे सगळं मिळून हे सारं ठरत असतं? मला खरं म्हणजे इतिहासाला समोर उभा करुन काही करडे सवाल करायचे होते.' 
" तिकिट, तिकीट," मध्येच कंडक्टरनं विचारलं तसं टॉलस्टॉय भांबावले.
" कुठं उतरु रे ?'
" कुठं जायचंय तुम्हांला ?'
" अरे, गांधींना भेटायचंय.. कुणीतरी म्हणालं, एम. जी. रोडला जा म्हणून.'
"महात्मा गांधी रोड तर आमच्याकडं प्रत्येक गावात असतात हो, पण म्हणून तिथं गांधी नसतात.'
त्या रशियन सरदाराने माझ्याकडे भांबावून पाह्यलं. "चल जाऊ दे, तू जिथं जाणार आहेस, तिथलंच तिकिट घेतो, नाही तरी माझा स्टॉप कोणताही असला तरी तुम्हां सगळ्यांच्या स्टॉपच्या पलिकडे तुम्ही मला थोडंच जाऊ देणार?," असं म्हणत टॉलस्टॉय विषण्ण हसले. आणि स्वतःशीच बोलावं तसं म्हणाले, “ आणि तसंही मी आयुष्यभर स्वतःचा स्टॉप शोधतो आहे, कुठं पोहचायचंय मला, कशासाठी, याचाच तर शोध घेतोय.” मला त्यांच्या थकलेल्या डोळ्यांत पाणी चमकल्याचा भास झाला. रस्त्यावर जागोजागी उभा केलेल्या गणपती मंडळांच्या मंडपांमुळे ट्राफिक अगदी ज्याम झाले होते. बस एकाच जागी बराच वेळ खोळंबली होती. 
“ बस पुढं का जात नाहीय्ये,” त्यांनी विचारलं.
“ सध्या आमच्याकडचा एक धार्मिक उत्सव सुरु आहे. यु नो एलेफंट गॉड ?”
“ऑर्गनायझड रिलिजन ..!,” असं म्हणत त्यांनी एक दीर्घ उसासा सोडला, “ माझं ‘ कन्फेशन’ वाचलंय ना तू?”
टॉलस्टॉयना काय म्हणायचं होतं ते माझ्या लक्षात आलं. त्यांना त्यांच्या शालेय मित्राची आठवण झाली होती. एका रविवारी ११ वर्षांच्या त्यांच्या मित्राने एखादा नवीन शोध सांगावं तसं त्यांना सांगितलं होतं, “ यु नो लिओ, देअर इज नो गॉड. दे आर जस्ट टेलिंग अस फेअरी टेल्स.” 
“ नाही पण देवधर्माचं तुम्हांला एवढं वावडं का , मला कळत नाही,” मी जरा रागानंच बोललो. त्यावर ते एकदम गहिवरले. म्हणाले, “ नाही रे, देवाशी माझे काही वाकडे नाही. माझ्या अतिप्रचंड वाचनाने, अभ्यासाने जे मला दिले नाही ते मला अनेकदा श्रध्देने गवसले. आयुष्यातील काही काळ मी नियमितपणे चर्चला जाणारा, तिथली सारी कर्मकांडे मला पटत नसूनही पार पाडणारा होतो. पण खरा देव आपल्याला कळला नाही. धर्माचा बाजार मांडणाऱ्यांनी खऱ्याखुऱ्या देवाचं अपहरण केलं. प्रत्येक रविवारी मी चर्चमध्ये प्राथनेला उभा राह्यलो की, “ लेटस् लव्ह वन अनादर इन युनिटी.” हे मला समजायचं, हृदयाला भिडायचं पण मग त्यानंतरचं ते सारं, ‘वी बिलिव्ह इन दि फादर, दि सन ऍन्ड दि होली घोस्ट,’ वगैरे मला कळायचंच नाही. गांधींना लिहलेल्या पत्रातही मी असंच काही लिहलं होतं, खोट्या धर्मानं आणि खोट्या विज्ञानानं आपल्याला प्रेमाच्या वैश्विक नियमाला पारखं केलं. निखळ श्रध्देने मला जगण्याचा मतितार्थ सांगितला असता ना तर मी तर्कनिष्ठताही सोडायला तयार होतो. पण असं झालं नाही.” 
“ हम्म.. मला आठवतं, तुमच्या ‘रिसरेक्शन’ कादंबरीची सारी मिळकत तुम्ही डौकहोबर पंथातील लोकांसाठी खर्च केली होती.” 
“ आता ती मंडळीच बघ ना, खऱ्याखुऱ्या देवाला आपलंसं करणारी. गोड गाणी, भजनं यात रमणारी, व्यक्तिगत संपत्तीमध्ये त्यांना रस नाही, त्यांना चर्च, देवाची प्रतिकं यात रस नाही. देव आत्मसात करण्यात त्यांना रस. प्रत्येक माणूस म्हणजे देवाचं मंदिर... म्हणून लढाईत भाग घेऊन कुणाची हत्या करणं हे त्यांच्यादृष्टीने मोठं पाप म्हणून युध्दाला विरोध करणारी... तर सरकारने त्यांच्यावर कारवाई सुरु केली. अनेकांना कॅनडामध्ये पळून जावं लागलं. त्यांना मदत करण्यासाठी लिहलेल्या ‘ रिसरेक्शन’ वरुनही वाद झाला. माझ्या कोणत्या लिखाणावरुन वाद झाला नाही सांग ना, निखळ सत्य कुणालाच आवडत नाही. खऱ्याखोट्याचं बेमालूम मिश्रण सगळ्यांना आवडतं," टॉलस्टॉय हळवे झाले होते. 
तेवढयात एक सोनेरी केसांची, गोड दिसणारी बाई बसमध्ये शिरली. टॉलस्टॉयने एकदम चमकून पाह्यलं, आणि बोलले, “ सोफिया ऽ ,” मी ही वळून त्या बाईंकडे पाहिले. टॉलस्टॉय स्वतःतच हरवले होते. त्यांचं स्वगत सुरु होतं, “ भास झाला मला. माझ्याकडून खूप अन्याय झाला रे तिच्यावर.” मला त्या दोघांची सारीच दुर्दैवी कहाणी माहित होती. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर बायकोचा मेसेज आला . तिचा फोटो पाहत ते खट्याळपणे म्हणाले, “ अरे वा, गोड पोरगी पटकावलीस की..! मजेत रहा रे..! ‘वॉर अँड पीस’मधला पिअरे काय म्हणाला आठवतं ना, "ज्याला सुखी समाधानी व्हायचं आहे त्यानं सुखाच्या शक्यतेवर विश्वास ठेवला पाहिजे. मेलेल्यांना करु दे मढ्यांची  उठाठेव पण जगणाऱ्याने भरभरून जगलं पाहिजे, आनंदी जगलं पाहिजे." 
“ मला तुमची पण कमाल वाटते, तुम्ही स्वतःकडे किती निर्दयपणे पाहू शकता. स्वतःच्या मोठ्यातल्या मोठ्या चुका सुध्दा सहजपणे सांगू शकता. मला आठवतं, लग्नानंतर सोफियाला तुम्ही तुमची डायरी वाचायला दिली होती. त्यात काय नव्हतं, दारुच्या पार्ट्या, मारामाऱ्या, सेक्स या सगळयाची जंत्री होती ती. असं स्वतःला सोलायला कसं जमायचं तुम्हांला? ,” माझे प्रश्न संपत नव्हते. 
“असं स्वतःला सोलल्याशिवाय डागाळलेल्या कातडीपासून सुटका कशी होणार?”, मग खिडकीतून बाहेर पाहत ते कुठंतरी हरवून गेले. “ कधीपासून फिरतोय असा, कुठे कुठे भटकतोय, कशासाठी ,कोण जाणे !” आणि मग एकदम माझ्याकडे वळत माझा हात हातात घेत मला म्हणाले, 
“ लहानपणी माझा भाऊ मला म्हणाला होता, " लिओ तुला माहीत आहे, माझ्याकडे एक सिक्रेट आहे. असं सिक्रेट ज्याच्यामुळे सगळी माणसं सुखी समाधानी होतील. कोणी कुणाशी भांडणार नाही, कुणी कुणाचा द्वेष करणार नाही, या जगात ना युद्ध असेल ना लढाई ,! ते सिक्रेट जर तुला कळालं तर हे जग किती सुंदर होईल लिओ! तुला माहितेय, ते सिक्रेट मी एका हिरव्या ओल्या फांदीवर लिहून ती हिरव्यागर्द दरीत रोवलीय." आणि तेव्हापासून आजवर मी त्या हिरव्या ओल्या फांदीचा शोध घेतोय, ती मला गवसली की जग किती सुखी होऊन जाईल. म्हणून तर आयुष्य संपल्यावर मी नाकारलं माझ्या कुटुंबासाठी खास राखीव असलेलं शाही स्मशान आणि मला दरीच्या त्या हिरवळीत पुरायला सांगितलं. त्या हिरव्या फांदीचा माझा शोध अजून संपलेला नाही.” एक वेगळीच चमक टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्या डोळ्यांत मला दिसत होती. मला अश्वत्थाम्याची आठवण का येतेय टॉलस्टॉय ! तू आधुनिक काळातला अश्वत्थामा आहेस , वेगळ्या अर्थाने, वेगळ्या मातीतला! " अये मालक उठा आता, झोपला की काय सकाळच्या पारात !" मी डोळे चोळत इकडं तिकडं बघितलं,
" लास्ट स्टॉपय भाऊ," कंडक्टर हसत सांगत होता.

लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६
 

बातम्या आणखी आहेत...