आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुजाता’ची खीर!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या बिमल रॉय यांच्या ‘सुजाता’ या संवेदनशील चित्रपटाला या वर्षी साठ वर्षे पूर्ण होताहेत. आणि दुसऱ्या बाजूला २०१९ मध्ये, एकविसाव्या शतकाची दोन दशकं सरत असताना, आपल्याच मैत्रिणींनी जातीवरून सतत अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे डॉ. पायल तडवीसारखी होतकरू पोर राज्याच्या राजधानीत एका वैद्यकीय महाविद्यालयात आत्महत्या करते. "सुजाता'सारखे चित्रपट सगळी दारं उघडायची, साऱ्या भिंती कोसळण्याची आणि नवे पूल बांधण्याचीच तमन्ना बाळगून जन्माला आलेले असतात. आज साठ वर्षांनी का असेना, आपल्याला हे उमजावं, इतकंच ! 

 

सुजाताचे बुद्ध जीवनातील स्थान सगळ्यांना माहीत आहे. सुजाताची खीर बोधिवृक्षाखाली ज्ञानसाधनेला बसलेल्या सिद्धार्थाने खाल्ली आणि त्याच दिवशी सिद्धार्थाला बोधी प्राप्त झाली, ज्ञानप्राप्ती झाली, अशी कथा आहे. "सुजाता'च्या रूपाने बिमलदांनी परसलेली ही कलात्म खीर आपल्याला ‘मानवाचे अंती एक गोत्र', हेच ज्ञान उच्चरवाने सांगू पाहते आहे.

 

प्रचंड मोठ्या कातळाला ड्रीलिंग मशीनने फोडण्याचं काम सुरू आहे. युगायुगांच्या घडामोडीतून उभे राहिलेले हे निष्ठूर कातळ ड्रीलिंग मशीन नावाच्या आधुनिक तंत्रज्ञानानं तरी फुटतील का, त्यांना पाझर फुटेल का, असा प्रश्न जणू पहिल्याच फ्रेममध्ये उभा करत हा चित्रपट सुरू होतो. २०१९ मध्ये, एकविसाव्या शतकाची दोन दशकं सरत असताना, आपल्याच मैत्रिणींनी जातीवरून सतत अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे डॉ. पायल तडवीसारखी होतकरू पोर राज्याच्या राजधानीत एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात आत्महत्या करते. आणि मी बरोबर साठ वर्षांपूर्वी म्हणजे १९५९ मध्ये निर्माण झालेली ‘सुजाता’ नावाची फिल्म पाहतो आहे. बिमल रॉय यांच्या या संवेदनशील चित्रपटाला यावर्षी साठ वर्षे पूर्ण होताहेत आणि आज घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणून दलित नवरदेवाच्या घरावर दगडफेक होते आहे. कातळ फुटता फुटत नाही. मी सिनेमा पाहत राहतो. बॅकग्राऊंडला वर्तमानाचे दिवाळखोरी मन कुरतडत राहते.

 
सरकारी  इंजिनिअर असलेल्या  उपेनबाबूच्या रमाचा, त्यांच्या गोड छोकरीचा पहिलावहिला वाढदिवस आहे. उपेनबाबू आणि चारू वाढदिवसाच्या तयारीत गुंग आहेत. पाहुण्यांची ये-जा सुरू झालेली आहे आणि अशात त्यांच्या बंगल्याचे गार्ड एक वर्षभराची पोर हातात घेऊन दीनवाणे उभे आहेत. गावात पटकीची म्हणजे कॉलऱ्याची साथ सुरू आहे. या लहानग्या पोरीचे आई-बाप पटकीच्या साथीत दगावले आहेत. आता या छोट्या जिवाचा सांभाळ कोण करणार, तिचं काय करायचं, असं म्हणत ही गरीब माणसं उपेनबाबूंना ‘या मुलीला आता तुमच्याशिवाय कोण आहे?’ असं म्हणताहेत. ‘मी काय करू हिचं?’ उपेनबाबू भांबावलेत, कारण ही पोरगी अस्पृश्य समाजातील आहे, हलक्या जातीतल्या बुधनची पोर आहे ही. ते तिला सांभाळायला नाहीच म्हणणार, पण तिचं केविलवाणं रडणं परंपरेच्या दुष्ट कातळाला घरं पाडतं, चारूच्या आईपणाला साद देतं आणि ही ‘अछूत’ पोर उपेन चौधरींच्या घरात दाखल होते. तिच्या जातीचं कोणी तरी शोधून ह्या पोरीला त्याच्या ताब्यात देऊ, तोवर घरातील आया सांभाळेल तिला, असा विचार या दोघांनीही केला आहे. चित्रपटभर त्यांच्या पारंपरिक आणि आधुनिक मनाचा संघर्ष आपल्याला दिसत राहतो. महारणीला मोळी उचलायला मदत कर, असं श्यामला सांगणारी, महारणीचा जीव जाणणारी श्यामची आई, त्याला नंतर अंघोळ कर, असं सांगायलाही विसरत नाही. आधुनिक मूल्ये नीट आत्मसात करता येत नाहीत आणि परंपरेचे चिवट धागे इथंतिथं अडकून जगण्याची ओढाताण करत राहतात. 


‘सुजाता’मध्ये हे चित्रपटभर जाणवत राहते. उपेन कधी तरी या अनाथ पोरीला ‘सुजाता’ म्हणून हाक मारतो आणि तेच तिचं नाव पडतं. तिचं जातवास्तव आणि तिच्या नावाचा अर्थ ‘चांगला जन्म लाभलेली’ .. त्यातला अंतर्विरोध बरंच काही सांगून जातो. उपेन आणि चारूला आजूबाजूची माणसं नावं ठेवताहेत, “खुशाल तुम्ही अछूत पोर घरात सांभाळताय, तुम्हाला काही रीतभात आहे की नाही?” म्हणून येणारा- जाणारा परिचित टोमणे मारतोय. मग ती ललिता पवारने रंगवलेली बुआ असो, नाही तर घरात पुराण सांगायला आलेला पंडितजी असो. पं. भवानी शंकर शर्माने सारे धर्मग्रंथ वाचलेत, पण त्यानं कबीर वाचलेला नाही, कबीरानं सांगितलेल्या "ढाई आखर' पासून तो कोसो मैल दूर आहे आणि म्हणून उपेन चौधरीच्या घरात अस्पृश्य पोर आहे, हे पाहून तो ते घर सोडून जातो. पोथी-पुराणात बुडालेली बुआ चुकून उपेनची पोर म्हणून लहानग्या सुजाताला कडेवर घेते, पण ती अछूत आहे, हे समजताच विंचू चावल्यासारखी तिला आयाच्या अंगावर फेकून देते. 


लोकांच्या या प्रतिक्रियांनी उपेन - चारू अजूनच गोंधळतात. काय करावं, हे त्यांना उमजत नाही. सुजातापासून सुटका करून घेण्याचे अनेक प्रयत्न उपेन – चारू करताहेत, पण त्यात त्यांना यश येत नाही. याचं कारण त्यांच्यातलं माणूसपण अजून जिवंत आहे. उपेन केवळ आपली सुटका व्हावी म्हणून मिळणाऱ्या पैशाच्या लोभाने या पोरीला सांभाळतो म्हणणाऱ्या दारूड्या माणसाच्या हवाली सुजाताला करू शकत नाही की ‘अम्मा’ म्हणून बिलगलेल्या सुजाताला चारू सर्व काही ठरूनही अनाथाश्रमात पाठवू शकत नाही. सुजाता उपेन- चारूच्या घरातच रमासोबत लहानाची मोठी होती, रमा कॉलेजात जाऊ लागते. रमा आणि सुजाता अगदी सख्ख्या बहिणीसारख्या लहानाच्या मोठ्या झाल्यात, पण चारू मात्र पूर्णपणे सुजाताला आपली बेटी मानत नाही. तिच्याकरिता ती ‘बेटी जैसी’ आहे, पण बेटी नाही. आल्यागेल्या पाहुण्यांना चारू हे आवर्जून सांगते.


या सगळ्या वातावरणात कथेला एक वेगळीच कलाटणी मिळते. उपेन – चारूच्या मानलेल्या बुआचा नातू अधीर सुजाताच्या प्रेमात पडतो. खरं म्हणजे, अधीरसोबत आपल्या मुलीचं म्हणजे रमाचं लग्न व्हावं, अशी उपेन आणि चारूची इच्छा आहे. पण प्रेम असं नियोजन करून,ठरवून थोडंच करता येतं ? प्यार तो बस्स हो जाता है ! बळजबरीने ना प्रेम करता येते ना भक्ती, पण तरीही आपण कोणी कोणावर प्रेम करावे याचे नियम करत जातो, आम्ही सांगतो म्हणून ‘जय श्रीराम' म्हणा अशी दमदाटी करत राहतो. पण प्रेम आणि भक्तीचा झरा मूळचाच खरा असावा लागतो. म्हणून तर अधीरसारखा उच्चशिक्षित तरुण कोणतंही औपचारिक शिक्षण नसलेल्या, काळ्यासावळ्या सुजाताच्या प्रेमात पडतो. त्याला तिचं जातवास्तव माहीत आहे, पण तो आधुनिक विचारांचा अभ्यासू तरुण आहे. सुजाता अस्पृश्य आहे, हे समजूनही तो आपल्या निर्णयापासून ढळत नाही आणि दोन्ही घरांत वादळ उठते. अधीरची आजी घर सोडून तीर्थाटनाला जाण्याची घोषणा करते. नेमकी त्याच वेळी चारू जिन्यावरून पडते, तिला प्रचंड रक्तस्राव होतो, रक्त देण्याची आवश्यकता भासते. आणि घरातील कुणाचंच रक्त तिच्या रक्तगटाशी जुळत नाही. सुजाता स्वतःहून माझे रक्त जुळते आहे का पाहा, असं म्हणत पुढे येते. सुजाताचे व चारूचे रक्त मॅच होते. सुजाताच्या रक्तदानामुळे चारूचा जीव वाचतो आणि चारूला नवा साक्षात्कार होतो. सुजाताचं अस्पृश्य असणं कधीच पूर्णपणे विसरू न शकलेली चारू सुजाताला ‘तू भी मेरी बेटी है,’ असं म्हणत छातीशी धरते. ‘काली घटा’ दूर होते आणि अधीर – सुजाताच्या लग्नसमारंभातील सनईवादनाने चित्रपटाचा गोड शेवट होतो. 


भारतीय चित्रपटाला नववास्तववादाच्या उंबरठ्यावर उभं करण्यात बिमल रॉय यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. १९४४ मध्ये आलेल्या त्यांच्या ‘उदेर पाथेय’ या चित्रपटाने दिग्दर्शक म्हणून त्यांचे वेगळेपण अधोरेखित केले. शांत स्वभावाच्या, पण सामाजिक प्रश्नांना आपल्या चित्रपटातून निडरपणे भिडणाऱ्या बिमलदांना समीक्षक ‘ सायलेंट थंडर’ म्हणून संबोधू लागले. दो बिघा जमीन, परिणिता, बंदिनी, सुजाता, मधुमती हे बिमलदांचे काही महत्त्वाचे चित्रपट. बिमलदांच्या सिनेमात रोमॅन्टिसिझम आणि वास्तववाद यांचा मनोज्ञ संगम आपल्याला पाह्यला मिळतो किंवा खरं म्हणजे बिमलदांचा नववास्तववाद हा एका मूलतः रोमँटिक माणसाच्या नजरेतून उमटलेला वास्तववाद आहे. त्यांचा १९५९ चा ‘सुजाता’ही याला अपवाद नाही. त्यांचा हा रोमँटिसिझम त्यांच्या पात्रांच्या व्यक्तिचित्रणातून मुख्यत्वे जाणवतो. बिमलदा आपली विरोधी पात्रेदेखील निगेटिव्ह शेडमध्ये न रेखाटता त्यांच्यातील माणूसपण, त्यांच्या वागण्यामागील कारणं दाखवत ती अधिकाधिक सजीव करत जातात. वर्गसंघर्ष, जात संघर्षाला, समाजवास्तवाला आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून तोंड फोडणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत बिमलदांचे स्थान फार वरचे आहे. कॅमेरामन म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या बिमलदांचा लाइट सेन्स उच्च दर्जाचा आहे हे अनेक फ्रेममधून जाणवत राहते. अनेक प्रसंगांत ते घडून गेल्यावर ते छोटीशी स्पेस सायलेंट ठेवून तो प्रसंग अधिक बोलका करतात.  ‘सुजाता' मधील एक प्रसंग खूप हळवा आहे. सुजाताच्या प्रेमात पडलेला अधीर एका प्रसंगात तिच्या खांद्याला स्पर्श करतो. या पहिल्यावहिल्या स्पर्शानं सुजाता अंतर्बाह्य मोहरते. सुजाताच्या दृष्टीने या स्पर्शाचे भावनिक महत्त्व दोन स्तरांवरील आहे. नवथर वयातील तरुणीला प्रियकराने केलेला हा पहिला स्पर्श म्हणून तर तो वेगळा आहेच, पण त्यापेक्षा एक अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत जन्मलेल्या सुजातासाठी हा स्पर्श सामाजिक अंगानेही तिला 


माणूसपण बहाल करणारा आहे. म्हणूनच त्या स्पर्शासरशी ती अत्यानंदाने धावत बाहेर येते आणि  तिच्यातली थरथर तिला झाडांच्या पानाफुलांत प्रतिबिंबित होताना दिसते. हा प्रसंग इतका लाजवाब घेतला आहे की सुजातासोबत आपणही थरथरतो, तो अनोखा स्पर्श अनुभवतो. 


चारूला अपघात होतो आणि सुजाता तिला रक्तदान करून वाचवते, हा प्रसंगही चित्रपटाच्या शेवटाला एका हव्याहव्याशा उंचीवर नेतो. सुजाता आणि चारुच्या ब्लड ट्रान्सफ्युजनचा हा प्रसंग दिग्दर्शकाने मुद्दामच तपशिलात घेतला आहे, हे जाणवते. मुळात हीन लेखल्या जाणाऱ्या जातींच्या कष्टावर, घामावर आणि रक्तावर हा समाज तरला आहे, तरतो आहे, हे सांगणारा हा प्रतीकात्मक प्रसंग आहे. सुजाताचे रक्त चारूच्या शरीरात प्रवेश करते आहे आणि ग्लानीत, बेशुद्धीत असलेली चारू हळूहळू जागी होते आहे, ती डोळे उघडते आहे, नव्या नजरेने जग पाहते आहे. या नव्या नजरेनेच सुजाताकडे पाहते आहे. हा तिच्या साक्षात्काराचा क्षण आहे. ' रक्तारक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंती एक गोत्र',हे तिला जाणवते आहे. मरणाच्या दारातून परतलेली चारू सुजाताला छातीशी धरते, सुजाता ‘अम्मा,' म्हणून हंबरते आणि भरल्या डोळ्यांनी  "सुजाता, तू मेरी बेटी है,' असं चारु म्हणते तेव्हा आपलेही डोळे भरुन येतात. हा प्रसंग कितीही मेलोड्रामाटिक वाटला तरी चारुचं हे वाक्य ऐकण्यासाठी सुजाता इतकेच आपणही तरसलेलो असतो. या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर "सुजाता' मधील कथेला सुरुवात करून देणारे आणि कथेचा क्लायमॅक्स घडवणारे दोन प्रसंग मला स्वतः वैद्यकीय डॉक्टर म्हणून आणि एक सामान्य प्रेक्षक म्हणूनही महत्वाचे वाटतात. कारण हे दोन्ही प्रसंग एका अर्थाने वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहेत. गावात कॉलऱ्याची साथ येते आणि त्यामध्ये तान्ह्या सुजाताचे आईबाप दगावतात म्हणून तो लहानगा अस्पृश्य जीव एका ब्राह्मण कुटुंबाच्या दारात येतो. एका अर्थाने कॉलऱ्याची साथ उपेन आणि चारूसमोर माणुसकीसमोरील प्रश्नचिन्ह बनून उभी राहते. कोणताही आजार हा समतावादी असतो. आजाराला कारणीभूत असणारे जीवजंतू माणसामाणसांमध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांच्याकरता सारी माणसं सारखी, म्हणून तर स्वाइन फ्लू असेल नाही तर डेंग्यू, तो झोपडपट्टीतल्या माणसापासून विद्या बालन ते राष्ट्रपती भवनातील मंडळीपर्यंत कोणालाही होऊ शकतो, पण जे या सूक्ष्मजीवांना उमगते ते भलामोठ्ठा मेंदू घेऊन हिंडणाऱ्या माणसाला शतकोंशतके कळत नाही, हाच याचा अर्थ.  चित्रपटाचा क्लायमॅक्स देखील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे. अस्पृश्य सुजाताचे रक्त सवर्ण चारुच्या रक्ताशी जुळते. रक्तदान शिबीरांचं आयोजन करताना आम्ही एक घोषणा द्यायचो त्याची आठवण झाली, ' म्हाद्याचं रक्त ममद्याला, रक्त लागतं समद्याला.'  माणसाच्या एकतेचे एवढे सारे पुरावे विज्ञान रोज आपल्यासमोर देते आहे पण आपण अजूनही जुन्या पोथ्यापुराणातून बाहेर यायला तयार नाही. आपण पुस्तकं वाचतो पण त्यातला खोलवर अर्थ आपल्या मनात रुजत नाही. तसे होते तर डॉ. पायलच्या मैत्रिणींना तिची जात का आठवली असती ? हा सगळा अंतर्विरोध मोठा जीवघेणा आहे. 


बुधन नावाच्या एका अस्पृश्याची मुलगी.. तिचं नाव सुजाता. हा निव्वळ योगायोग नाही. चित्रपटातील पात्रांची नावं देखील विचारपूर्वक ठेवली असावीत, हे नक्की. सुजाताचे बुद्ध जीवनातील स्थान सगळ्यांना माहीत आहे. सुजाताची खीर बोधिवृक्षाखाली ज्ञानसाधनेला बसलेल्या सिद्धार्थाने खाल्ली आणि त्याच दिवशी सिद्धार्थाला बोधी प्राप्त झाली, ज्ञानप्राप्ती झाली, अशी कथा आहे. "सुजाता'च्या रूपाने बिमलदांनी परसलेली ही कलात्म खीर आपल्याला ‘मानवाचे अंती एक गोत्र', हेच ज्ञान उच्चरवाने सांगू पाहते आहे. ही खीर खाऊन साठ वर्षे झाली तरी आपल्याला ज्ञानप्राप्ती व्हायला तयार नाही, हेच खैरलांजीपासून उनापर्यंत रोज नव्यानं सिद्ध होते आहे. त्या छोट्या सुजाताला ज्या जगाची आस आहे, तिथं आपण कधी पोहोचणार आहोत? तिच्या डोळ्यांत डोकावून तर पाहा, ऐका ती काय म्हणते आहे - 

" अलिबाबाच्या जीवनाचे सोने करणारा
एक जादुई मंत्र
" तिळा तिळा दार उघड !"
आज गवसावा आपणालाही…
त्याच्या एका उच्चारासरशी
अशी व्हावी जादू..
उघडावे दरवाजे एका नव्या जगाचे
निळया नभाच्या छताखाली
आणि हिरव्या धरतीवरती जगणारी
तिथं सारी माणसं असतील..
लहान नाही, मोठा नाही
काळा किंवा गोरा नाही
सारे तिथे समान असतील
माणसाच्या वेशातील
आजची असली जनावरे नसतील..
जागोजाग विखुरलेले
प्रेमाचेच झरे असतील
आभाळात शांतीची
कबुतरे विहरत असतील
अशा नव्या जगासाठी
माझ्या मित्रा, उठ झगड
तिळा तिळा, दार उघड ..! "

 

"सुजाता'सारखे चित्रपट सगळी दारं उघडायची, साऱ्या भिंती कोसळण्याची आणि नवे पूल बांधण्याचीच तमन्ना बाळगून जन्माला आलेले असतात. आज साठ वर्षांनी का असेना, आपल्याला हे उमजावं, इतकंच ! 
 

 

लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६