आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाव करील ते…!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


व्यक्तिपूजा हा भारतीय मनाचा स्थायीभाव! त्यातही ही व्यक्तीपूजा जेव्हा चित्रपट, क्रिकेट अशा कला-क्रीडा क्षेत्राशी निगडीत असते, तेव्हा ती किमानपक्षी काहीशी सुसह्य तरी असते, पण जेव्हा ही व्यक्तिपूजा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश करते, तेव्हा तिचे परिणाम दीर्घकालीन आणि विघातक असू शकतात...


१९३७ मध्ये कलकत्याच्या ‘मॉडर्न रिव्ह्यू' या नियतकालिकात ‘चाणक्य’ नावाने, एक लेख प्रकाशित झाला होता. ‘सध्या भारतीय लोक जवाहरलाल नेहरु या माणसाच्या प्रेमात आहेत पण जवाहरलाल मधील दोषांकडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा उद्या जवाहरलाल भारताचा ‘ज्युलियस सीझर’ होऊ शकतो,' असा सर्वसाधारणपणे या लेखाचा आशय होता. नंतर कळाले की, हा लेख दस्तुरखुद्द नेहरुंनीच लिहिला होता... ]

 

"तुला आबिताभ आवडतू का धरमेंदर?’, रामहरीभाऊच्या शेजारी राहणाऱ्या रावसाहेबने मला विचारले. तो १९८५च्या आसपासचा काळ असावा. अमिताभ त्यावेळी बॉलिवूडचा सुपरस्टार होता. पण ज्या सोलापूर नावाच्या गिरणगावात मी शिकत होतो, तिथं व्यवस्थित दोन गट होते. एक गट अमिताभला मानणारा तर दुसरा धर्मेंद्रला मानणारा. हे गट एवढे कट्टर होते की थिएटरबाहेर तिकिटाच्या रांगेत अमिताभ आणि धर्मेंद्रच्या चाहत्यांची छोट्या मोठ्या कारणांवरुन मारामारी व्हायची. आजच्या भाषेत राडा व्हायचा. ‘कभी कभी'सारखा रोमॅण्टिक सिनेमा पाहताना पडद्यावर राखी दिसली की ‘अबे धर्मेंद्र की मां' अशा कॉमेंट थिएटरमधून ऐकू यायच्या आणि मग दोन गटांची किरकोळ दण्णादण्णी व्हायची. हे बहुधा आजच्या ट्रोलिंगचे आद्यरुप असावे. त्यामुळं ‘जाम मिल’मध्ये कामगार असणाऱ्या रावसाहेबने जेव्हा मला अमिताभ आणि धर्मेंद्रमधलं कोण आवडतं, असं विचारलं, तेव्हा मला ज्याम भीती वाटली. पण मी घाबरत घाबरत खरं ते सांगितलं, "मला अमिताभ आवडतो.’
त्यावर तो कुऱ्यात म्हणाला, "मला म्हनशील तर, धरमेंदर आवडतू.’
मी म्हटलं, "ठिकाय... ज्याची त्याची आवड!’
"नाय नाय, ठिकाय काय? त्या अबिताभमधी काय दमंय? धरमेंदर कसा हीम्यान हाय.’
"असू द्या ना, आपली आवड वेगवेगळी असू शकते ना, त्यात काय एवढं?’ 
यावर रावसाहेबनं जो तोडगा काढला, तो एक नंबरी होता. तो म्हणाला, "चल आपुन कुस्ती खेळू!’
आता ही कुस्ती कुठं आली मधूनच, मी बावचाळलो. कशाकरता कुस्ती खेळायची तेच मला कळेना.
"कुस्ती मी जितलो त धरमेंदर मोठा, आन तू जितला त आबिताभ मोठा!’
मी क्षणभर कष्टानं कमावलेल्या त्याच्या पीळदार शरीराकडं पाह्यलं आणि म्हणलं, "नाय नाय, कुस्ती खेळायची काय गरजय? धर्मेंदर कधी बी मोठाच हाय. अमिताभची आन त्याची काय बरोबरी!’
"आंग अस्सं,’ असं म्हणत रावसाहेब विजयी हसला.
‘हिरो वार्शिप’ अर्थात व्यक्तिपूजा हे आपल्या सगळ्यांचेच व्यवच्छेदक लक्षण. धर्मेंद्रचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी माझ्यासोबत कुस्ती खेळ म्हणणारा रावसाहेब, एकटाच वेडा नव्हता. मीही तितकाच वेडा होतो आणि आहे! मी अमिताभच्या पूर्णपणे प्रेमात होतो. त्याच्या अनेक सिनेमांनी त्याची एक ‘लार्जर दॅन लाइफ’ इमेज माझ्या टीनेज वयात तयार केली होती. त्याच्यातला ‘ॲन्ग्री यंग मॅन' इथल्या अन्यायी, विषमतेवर उभ्या असलेल्या व्यवस्थेला जमीनदोस्त करेल, अशी  खात्री मला मनोमन वाटायची. पडदा आणि वास्तव यातील फरक मला कळत नव्हता. पण मोठा होत गेलो, तसं वास्तव कळत गेलं. हा ‘मिस्टर नटवरलाल’ कोणत्याच राजकीय-सामाजिक प्रश्नावर भूमिका घेत नाही. मूग गिळून गप्प असतो. स्वार्थासाठी प्रस्थापितांपैकी कोणाशीही तो मैत्री करु शकतो, हे कळत गेलं, आणि त्याच्याभोवतीचं खोटं वलय विरत गेलं. एक चांगला अभिनेता तर तो आहेच पण, तेवढंच, पडद्यापुरतं... त्याच्या पलिकडे काही नाही. आजही अमिताभ माझा आवडता अभिनेता आहेच, पण त्याच्या व्यक्ती म्हणून मर्यादा मला उमजल्या आहेत.

 

जी गोष्ट अमिताभची, तीच आपल्या क्रिकेटवीरांची! शाळकरी वयात सुनील गावसकर इतका आवडायचा, की तो आऊट झाला की क्रिकेट कॉमेंट्री ऐकायचं बंद करायचो, मी! तो निवृत्त झाला आणि क्रिकेटमधला माझा अवघा इंटरेस्टच संपला, की काय असं वाटत असताना त्याची जागा सचिन तेंडुलकरने घेतली.  टीम अकरा जणांची असते, पण जणू हा एकच खेळाडू प्रत्येक सामना, प्रत्येक मॅच आपल्याला जिंकून देणार आहे, अशा भक्तिभावाने मी तेंडुलकरची प्रत्येक इनिंग पाहिली, कधी रस्त्यावर उभा राहून, कधी टीव्ही शोरुममध्ये, कधी रेल्वेस्टेशनवर! अगदी तासाभरानं पेपर असतानाही मॅच पाहण्याचा मोह मला टाळता आलेला नाही.कौतुक एवढं की सचिन बारावीला अर्थशास्त्रात नापास झाला, हे सांगतानाही भारी वाटायचं. ज्या व्यक्तीच्या आपण तुडुंब प्रेमात आहोत, त्याच्यातलं वैगुण्य, चुकादेखील आपण कशा गोड मानून घेतो, याचं हे उदाहरण! सचिननं फेरारी गाडीवरील टॅक्स चुकवल्याची बातमी त्यावेळी गाजली होती. खरं खोटं कोणाला माहीत, पण आम्ही त्या बातमीकडे दुर्लक्ष केलं, जणू ती आम्ही वाचलीच नव्हती.

 

एकूण काय, व्यक्तिपूजा हा भारतीय मनाचा स्थायीभाव ! याचं कारण कदाचित आपल्या सांस्कृतिक परिवेशात दडलेले असावे. हिंदू धर्मात अवतारांचे महत्व मोठे आहे. कुणीतरी अवतरेल आणि तो आपले दुःख, दारिद्र्य, दैन्य, अज्ञान दूर करेल, ही पूर्वापार श्रद्धा आहे. ‘यदा यदाही धर्मस्य…’, ही आपली जगण्यातील खूप मोठी आशा आहे. इतर धर्मातही प्रेषितासारख्या कल्पना आहेतच. त्यातही ही व्यक्तीपूजा जेव्हा चित्रपट, क्रिकेट अशा कला-क्रीडा क्षेत्राशी निगडीत असते, तेव्हा ती किमानपक्षी काहीशी सुसह्य तरी असते, पण जेव्हा ही व्यक्तिपूजा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश करते, तेव्हा तिचे परिणाम दीर्घकालीन आणि विघातक असू शकतात. आपली पूर्वीची सरंजामशाही व्यवस्थाही आपल्या रक्तात मुरली आहे. युरोपीय देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने म्हणजे आपल्यासारखे बसने किंवा लोकलने प्रवास करणारा राजकीय नेता ही बिलकुल अपूर्वाई नसते, ना त्याची बातमी होते. आपल्याकडे मात्र 'महापौरांनी केला सीटी बसने प्रवास, जाणून घेतले सर्वसामान्यांचे प्रश्न' ही ब्रेकिंग न्यूज होते आणि तिच्यासोबत बसने प्रवास करत प्रवाशांसोबत बोलणाऱ्या महापौरांची छबी झळकत असते.

 

फार जुनी गोष्ट नाही, दोन तीन दशकांपूर्वी आपल्याकडे एसटीमध्ये पुढील दोन सीट लोकप्रतिनिधींसाठी, अगदी आमदारांसाठी राखीव ठेवलेले असत. आता कोणता आमदार एसटीने प्रवास करतो? कोणता खासदार सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येतो? कुणा नामदाराची मुलं सरकारी शाळेत शिकतात? आणि आपल्याला कुणालाच याचं काही वाटत नाही. ‘ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल...’ या न्यायाने आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांभोवती आरती ओवाळत राहतो. एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असणे याचा अर्थ, त्या व्यक्तीमध्ये कोणतेही दोष नाहीत, असा नसतो. खरं म्हणजे, ज्या व्यक्तीबद्दल आपले काही वैचारिक मतभेद असतात किंवा तिच्या काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत तिच्याबद्दलही आपल्याला आदर असू शकतो. पण आपण हे लक्षातच घेत नाही. आपण ज्याची व्यक्तिपूजा करतो, त्याचे पाय जणू जमिनीला टेकतच नाहीत, असे आपल्याला वाटत असते. आंधळ्या भक्तीने कुणाही राजकीय व्यक्तीची पूजा केल्याने, ती व्यक्ती स्वतःला सर्वशक्तीमान समजत जाते, कुणी केलेली विधायक टीकाही ती सहन करु शकत नाही, आपली कायदेशीर जबाबदारी आणि सार्वजनिक जीवनातील पारदर्शकता, या बाबी हरवून जातात. १९३७मध्ये कलकत्याच्या ‘मॉडर्न रिव्ह्यू' या नियतकालिकात ‘चाणक्य’ नावाने, एक लेख प्रकाशित झाला होता. ‘सध्या भारतीय लोक जवाहरलाल नेहरु या माणसाच्या प्रेमात आहेत पण जवाहरलाल मधील दोषांकडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा उद्या जवाहरलाल भारताचा ‘ज्युलियस सीझर’ होऊ शकतो,' असा सर्वसाधारणपणे या लेखाचा आशय होता. नंतर कळाले की हा लेख दस्तुरखुद्द नेहरुंनीच लिहिला होता. खुशामत करणारी माध्यमे, आंधळे भक्त आपल्या नेत्याला हुकुमशहा बनविण्याची भीती असते, हे नेहरुंनी ओळखले होते. आपल्या दोषांवर पांघरुण घालून आपला फुकाचा जयघोष करु नका, असे टोपणनाव घेऊन सांगणारा नेता, ही राजकीय दंतकथा वाटावी, अशी आजची परिस्थिती आहे. एखाद्या नेत्याच्या सेवाकार्याबद्दल आपण कृतज्ञ असायला हवे, पण कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे आपले स्वातंत्र्य गहाण टाकणे, नव्हे.
 
 
 व्यक्तिपूजेच्या बाबतीत असाच इशारा बाबासाहेबांनी दिला होता, "भक्ती ही धार्मिक क्षेत्रात आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असेल, पण राजकीय आणि सामजिक क्षेत्रात जर भक्ती आली, तर ती आपल्याला विनाशाकडे आणि निरंकुश हुकुमशाहीकडे नेल्याशिवाय राहणार नाही.’
पण आपण सामान्य माणसं …आपण नेहमीच एका अवताराची वाट पाहत असतो. कुणीतरी येईल आणि जादूची कांडी फिरवावी तसे आपले सारे प्रश्न, साऱ्या समस्या चुटकीसरशी सुटतील, अशी रोमॅन्टिक कल्पना आपण बाळगून असतो. एकटा गावसकर, एकटा तेंडुलकर मॅच जिंकू शकत नसतो. पडद्यावरील  नुसत्या अभिनयाने अन्याय नाहीसा होत नसतो. त्यासाठी आवश्यक असते सामूहिक कर्तृत्व! जे योग्य आहे त्याच्या बाजूने उभे राहण्याचे धैर्य आणि जे चुकते आहे त्याला चूक म्हणण्याचे धाडस! आपल्यापैकी प्रत्येकाला ते दाखवावे लागते, तरच नवी सकाळ होऊ शकते सारी मदार ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा असलेल्या कोण्या एका नेत्यावर टाकून नवे काही घडत नसते. आपला विश्वास असावा लागतो, स्वतःवर, इथल्या छोट्यामोठ्या माणसांवर! हे रस्ते करणारे हात, हे धरण बांधणारे, रिक्षा ओढणारे, नांगरट करणारे हात, तापल्या तव्यावर चटका सोसत उन उन भाकर टोपल्यात  टाकणारे हात, शेतातल्या काळ्या भुईत हिरवी अक्षरं गिरवणारे हात! तुमच्या माझ्या हातात नवं निर्माण करण्याची ताकद आहे, खडकावर हिरवळ फुलविण्याची ताकद आहे. 
 कुणा एकाच्या तथाकथित करिश्म्यापेक्षा आपली सामूहिक ताकद ओळखणे, हीच आजची गरज आहे. ‘नया दौर’मधला दिलीपकुमार आठवतो ना -
‘ साथी हाथ बढाना, साथी हाथ बढाना
एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना
साथी हाथ बढाना’ 
तेव्हा आपलं शहाणपण कुणा एकाच्या पायाशी गहाण ठेवून मूर्खांच्या फौजात सहभागी होण्यापेक्षा आपल्या सामुहिक विवेकाचे होकायंत्र शाबूत ठेवून, आपल्या सामुहिक कर्तृत्वावरला भरोसा ठसठशीत करत वाटचाल करणं,आपल्या आणि समाजाच्याही हिताचं असतं. म्हटलंच आहे ना, ‘गाव करील, ते राव काय करील?’

 

प्रदीप आवटे

dr.pradip.awate@gmail.com

संपर्क : ९४२३३३७५५६

 

बातम्या आणखी आहेत...