आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बोलूया तर खरं...!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

समजा आपली पोर उद्या म्हणालीच, ‘अमका अमका पोरगा मला आवडतो?’ तर काय असते आपली रिअॅक्शन? ‘कोणंय तो मुलगा? काय करतो?’ असं सहजपणे आपल्यापैकी किती जण विचारू शकतात? आणि किती जण प्रामाणिकपणे समजून घेऊ इच्छितात, ‘का आवडला तो तुला?’

 

किशोरवयीन प्रेम दाखवणाऱ्या चित्रपटांना विरोध करताना आपल्या अवतीभवतीचे वास्तव काय आहे, हे आपण लक्षात घेणार की नाही? 


‘लक्ष्याला कसला बदडला होता ना सरांनी,’ राजा जुनी गोष्ट खुलवून खुलवून सांगत होता. बऱ्याच वर्षांनी आम्ही स्कूलमेट भेटलो होतो आणि शाळेतल्या गमतीजमतींना ऊत आला होता. 


गोष्ट होती ती एवढीच आमच्या आठवी 'ब'च्या वर्गातल्या लक्ष्यानं सातवी 'क' मधल्या कविताला चिठ्ठी दिली होती आणि ती चिठ्ठी नेमकी कविताच्या मामाच्या हातात पडली होती. त्यानं ती आमच्या हेडमास्तरांना आणून दिली. हेडमास्तरांनी लक्ष्याला असा कुत्र्यासारखा धुतला होता की त्याचं नाव ते!  पण हे तेवढ्यावरच थांबलं नाय, लक्ष्याच्या चुलत्याची आणि कविताच्या मामाची जोरदार भांडणं झाली, पार हाफ मर्डरपर्यंत गेली केस! दोन्ही कुटुंबातील अनेकजण आत जाऊन आले. लक्ष्या आता इंजिनिअर झालाय. निम्मं जग फिरुन आलाय. पण कविताचं नाव निघालं की तो हळवा झाला.

 

‘साला, आजही गिल्ट वाटतं रे त्या चिठ्ठीबद्दल! भेंडी आपलं एजच काय असतं रे! आवडली कवि म्हणून लिहली चिठ्ठी पण त्यामुळं तिची शाळा सुटली! हुशार पोर पण शिकता आलं नाही. माझं तर सगळं ठीक झालं रे पण तिची जिंदगी बरबाद झाली. वाटतं, आपणच जबाबदार आहोत,’ त्याच्या डोळयांत पाणी तरळलं. आणि मग तो एकदम म्हणाला, ‘आपण तर पोरंठोरं असतो रे पण साला आपल्या आईबापांना आन नातेवाईकांना पण काय समजत नाय ना! एकदम जगबुडी झाल्यासारखं करतात.’ क्षणभर कुणीच काही बोललं नाही. पण आतून काही तरी तुटल्यासारखं झालं सगळ्यांनाच!

 

हे सगळं आठवायचं कारण येत्या २९ एप्रिलला ‘सैराट’ रिलिज झाला त्याला तीन वर्षे पूर्ण होतील. खरं तर ‘सैराट’ देखील एक निमित्त. आपण एकूणच प्रेम या गोष्टीकडे कसे पाहतो, हे सांगणारा हा प्रसंग. खरं तर मी जो प्रसंग सांगितला तो तर १९८१ च्या आसपासचा आहे. तेव्हा ना ‘सैराट’ आला होता, ना ‘टाईमपास’, ना घरोघरी टीव्ही रतीब घालत होता. तरीही कोणी लक्ष्या कोण्या कविताला टीनएजीय आकर्षणाने चिठ्ठी लिहितच होता. मला आठवतं, सैराटच्या रिलिजच्या वेळी कुणीतरी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती, ‘सैराट’ का पाहू नये, हे सांगणारी ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. अल्पवयीन मुला-मुलींच्या प्रेम प्रकरणावरील ‘सैराट’, ‘फॅन्ड्री’ सारखे चित्रपट आपल्या मुला-मुलींवर काय संस्कार करणार? या मुळे आपली मुलं ही सैराट होतील, अल्पवयीन मुलींमधील प्रेग्नसीचं प्रमाण वाढेल, शालेय मुलांमधील आंबटशौकीनता वाढेल, अशी त्या पोस्टकर्त्याची भिती होती आणि ही भिती पोस्ट शेअर करणाऱ्या अनेकांनी मल्टीप्लाय केली होती. या पोस्टमागे किशोरवयीन मुलांची प्रामाणिक काळजी आहे, असे गृहित धरुन मी विचार करतो आहे. आणि मग मला काही प्रश्न पडतात.आपण सारेच आरश्यासमोर उभे राहू आणि या प्रश्नांना सरळ सरळ सामोरे जाऊ.


काही चित्रपटांच्या निमित्ताने आज आपल्याला शाळकरी मुलांच्या प्रेम प्रकरणांची काळजी वाटते आहे पण याच समाजात अगदी काल परवा पर्यंत बालविवाह सर्रासपणे सुरु होते, आजही काही प्रमाणात ते सुरु आहेत. योनीशुचिता या एकाच कल्पनेभोवती नीतीमत्तेचा इमला या समाजाने रचल्यामुळे मुलगी निर्धोकपणे उजवणे, यातच आईबापांची इतिकर्तव्यता मानणारे समाजमानस आजही अस्तित्वात आहे. शाळकरी मुलांनी केवळ शिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित करावे, असे म्हणणाऱ्यांना संमतीवयासंदर्भात झालेले वाद आठवण्याचे कारण नाही. ऑगस्ट १८९० मध्ये बंगाल प्रांतात झालेल्या फुलमणीच्या प्रकरणाने, संमतीवयाच्या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले. हरीमोहन नावाच्या पतीने आपल्या दहा वर्षांच्या फुलमणी नामक पत्नीवर ती मोठमोठयाने ओरडत असतानाही बलात्कार केला व त्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे संमतिवय वाढवावे, या मागणीने जोर धरला. जानेवारी १८९१ मध्ये संमतीवयाचे बिल ब्रिटीश सरकारने चर्चेसाठी आणले होते. आईवडिलांनी लहान मुलामुलींना विवाहाची बळजबरी करू नये आणि त्यांची समज व शरीराची योग्य वाढ झाल्यावरच त्यांच्या संमतीने विवाह व्हावा अशी मुख्यत: त्या बिलाची धारणा होती. सनातनी लोकांचा त्याला विरोध होता आणि लोकमान्यांसारखे धुरीण तेव्हा या सनातन्यांचे नेतृत्व करत होते. आगरकरांसारख्या सुधारकांचा बिलाला पाठिंबा होता आणि सनातनी लोक तेव्हा जिवंतपणी आगरकरांची अंत्ययात्रा काढत होते. संमतीवय दहा वर्षांपासून सोळा वर्षांपर्यंत नेण्याकरिता आपल्या समाजाला एक शतक लागले. 


किशोरवयीन प्रेम दाखविणाऱ्या चित्रपटांना विरोध करताना आपल्या अवती भवतीचे वास्तव काय आहे, हे आपण लक्षात घेणार की नाही? आज आठवी नववीच्या पोरा पोरींना मित्र नव्हे तर बी एफ आणि जी एफ आहेत. सहा सहा महिन्यात त्यांचे ब्रेक अप्स होताहेत. जिला बॉय फ्रेण्ड ( बी एफ ) नाही तिला पिअर ग्रुप मध्ये कमी लेखलं जातंय. या बॅक ग्राऊंडवर आपण निव्वळ शालेय मुलांच्या प्रेम प्रकरणांवर येणाऱ्या चित्रपटांना विरोध करणे म्हणजे,

 

उम्र भर हम यूंही गलती करते रहे गालीब,
धूल चेहरे पर थी और हम आयना साफ करते रहे


असे वागण्यासारखे आहे. ‘शाळा’ या मिलिंद बोकीलांच्या कादंबरीवर मध्यंतरी त्याच नावाचा चित्रपट आला होता. या कादंबरीत या टीन एजर्सच्या प्रेमाच्या पार्श्वभूमीवर १९७५ची राजकीय आणीबाणी होती.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आणि स्त्री पुरुष संबंधाबद्दलचे सामाजिक मौन,प्रेमाबद्दलची आपली अळीमिळी गुपचिळी हे आपल्या समाजातील समांतर वाहणारे प्रवाह आहेत, समाजशास्त्रज्ञ असणारे मिलिंद बोकिल हेच ‘शाळा’तून मांडू पाहत होते. आजही प्रश्न आहे तो हाच, आपल्याला आपल्या वयात येणाऱ्या मुलांशी बोलता येतं का? प्रेमात पडलेल्या आपल्या पोरापोरींशी आपल्याला संवाद करता येतो का? आणि महत्वाचं म्हणजे, असं काही आपल्या आयुष्यात घडत असताना आपल्या पोरा पोरींना ते आईबाप म्हणून, काका काकी म्हणून आपल्याशी शेअर करावेसे वाटते का? आपल्याला त्यांचे मित्र होता येते का ? दुर्देवाने या सगळया प्रश्नांची उत्तरे आपल्या पैकी बहुतेकांच्या बाबतीत ‘नाही’ अशी आहेत. मग ऑनर किलिंग घडतात, कुणी बाप आपल्या इच्छेप्रमाणं लग्न करुन घरी आलेल्या गर्भवती पोरीवर कुऱ्हाडीचे घाव घालतो तर कुणी शिक्षक असलेला बाप त्याच्या इच्छेविरुद्ध लग्न केलेल्या पोरीचा जाहीर दहावा-तेरावा घालतो आणि दुसऱ्या दिवशी शाळेत शाहू-फुले-आंबेडकर शिकवत राहतो. पोरं प्रत्येकवेळी बरोबरच असतात अशातला भाग नाही. पण आयुष्य त्यांचं आहे, स्वयंनिर्णयात चुकण्याचा अधिकारही असतो बरं! 

 

मला आठवते, त्या पोस्टकर्त्याने विचारले होते, असे तुमच्या घरात घडले तर तुम्ही काय कराल? खरेच मोठा अवघड प्रश्न, काय करु आपण? काय करतो आपण? प्रेमात पडलेल्या पोरापोरींशी बोलता येते आपल्याला? या पोरांच्या मनात तुडुंब भरलेले असते नवथर प्रेम.या प्रेमाने भरलेल्या मनात आपल्याला डोकावताच येत नाही किंवा आपल्याला प्रचंड भिंती वाटत असते आपली खरेखुरे प्रतिबिंब त्यात दिसण्याची म्हणून आपण टाळतो आपल्याच पोरांच्या मनात डोकावणं.


समजा आपली पोर उद्या म्हणालीच, ‘अमका अमका पोरगा मला आवडतो?’ तर काय असते आपली रिऍक्शन? ‘कोणंय तो मुलगा? काय करतो?’, असं सहजपणे आपल्यापैकी किती जण विचारु शकतात? आणि किती जण प्रामाणिकपणे समजून घेऊ इच्छितात, ‘का आवडला तो तुला?’ आपण आपल्या पोरांशी इतकं मनापासून बोललो आणि सांगितलं त्यांना, ‘पोरांनो, नो इश्यू , अरे हे वयच आहे प्रेमात पडायचं पण लक्षात घ्या, लगन से पढो पहले, कुछ बनो... जे वाटतं ते हासिल करा, मिळवा. जिवलग मित्र असा एकमेकांचे, ध्यास घ्या मिळून काही भव्य दिव्य करण्याचा आणि आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा राहिल्यावरही जर तुम्हांला वाटलं, यही है अपना हमसफर तर खुशाल सोबत चला एकमेकांचे लाईफ पार्टनर म्हणून! आफ्टर ऑल, इटस युवर लाईफ!’ पण इतक्या दिलखुलास आपल्याला बोलताच येत नाही. आपण एक घाव आणि दोन तुकडे स्टाईलने पोरांनी विणलेले रेशीम धागे तोडू पाहतो. पण या धाग्यांची मुळं खोल आत आत ह्रदयात आहेत, हेच उमगत नाही आपल्याला! या मोकळया संवादातून अनेकदा पोरं चुकली असली तर त्यांना आपल्या चुकाही उमजतात, ती शहाणी होऊन मागं देखील फिरतात, नाही असं नाही. पण मनातून आलेला संवाद हाच उपाय असतो या साऱ्यावर आणि त्यासाठी आपल्याला आपलं टीन एज आठवावं लागतं, पोर होऊन पोरांशी बोलावं लागतं पण आपण पोरांना कोंडतो, मारतो,पोरींची शाळा बंद करतो, हात लगोलग पिवळे करण्याच्या मागे लागतो. आणि मग की ‘तोडिला तरु फुटे अधिक भराने’, या न्यायाने पोरं नवथर उत्साहानं काही बाही करतात पण याला कारण आपणच असतो, पोरं नव्हे. आपल्याला पोरांची भाषा समजलेली नसते.

 

माझा एक बहुजन डॉक्टर मित्र कॉलेज दिवसात उच्च जातीच्या पोरीच्या प्रेमात पडला. तिच्या घरी समजले. व्ह्यायचं तेच झालं, पोरीचं कॉलेज बंद. या माझ्या मित्रानं प्रेयसीच्या वडिलांना पत्र लिहलं,
‘गीता सांगते, प्रत्येकाच्या शरीरात एकच आत्मा विराजमान आहे. असा आत्मा ज्याचं वर्णन गीता 


नैनं छिन्दन्ति शस्त्राणी नैनं दहति पावकः  
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः


असे करते. मला सांगा,ज्या आत्म्याला शस्त्राने कापता येत नाही, आगीने जाळता येत नाही,पाण्याने ओले करता येत नाही की वाऱ्याने सुकविता येत नाही त्या आत्म्याला जात धर्म कसा चिकटतो? तो एकाद्या जाती धर्माच्या स्पर्शाने कमी जास्त प्रतीचा कसा काय होऊ शकतो?’ मुलीच्या बापाने पोरगा हुशार आहे, हे ओळखलं पण तरीही त्यानं विचारलेल्या प्रश्नांना प्रामाणिक उत्तर देण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी मुलीला एवढेच सांगितले, ‘बेटा, आपल्या हातात पंचपक्वान्नाचे ताट जरी असले तरी ते कुणी उकिरडयावर बसून खात नाही.’ जातीव्यवस्थेचा उकिरडा आपल्याला अजूनही साफ करता आलेला नसतो.

 

आपल्या मनातली असली जळमटं आणि संवादाची हिरवळ हरवलेलं आपलं अंगण आपल्या पोरापोरींच्या आयुष्यात ओसाडाची पेरणी करतं आणि चार बोटं आपल्याकडे वळलेली असताना आपण आपलं बोट मात्र ‘सैराट’ आणि ‘फॅन्ड्री’कडे रोखत राहतो. 


खरं तर, अशा कलाकृती संवादहीन गर्तेतून आपल्याला माणसांच्या जगात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. पण या गर्तेतून बाहेर पडण्याचा थोडा तरी प्रयत्न आपणही करायला हवा ना. आताशा नीट दिसत नाहीय्ये आपल्याला, आपल्या चष्म्याचा नंबरही वाढतोय सारखा! आपल्या वयात आलेल्या पोरांचे डोळे उसने घेऊन बघू या हे जग... कुणी सांगावं, आपल्या भावगीतांइतकंच नव्या पिढीचं रॅपही मनोरम असू शकेल, ऐकू या, बोलू या तर खरं !  


प्रदीप आवटे
dr.pradip.awate@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६