आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुली पळून का जातात?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या मित्राने पळून जाऊन प्रेमविवाह केला की आम्ही त्याच्या हिमतीला दाद देतो. ‘तेरा प्यार जीत गया’ म्हणत त्याला प्रोत्साहित करतो. पण त्याच जागेवर मुलीने खानदानाचं नाव मातीत मिळवलं म्हणून तिला शिव्या हासडतो. मुलींच्या बाबतीत विचार करताना आपली मानसिकताही संकुचित बनते. एखादी मुलगी म्हणतही असेल माझ्या घरात प्रेमविवाहाला मान्यता आहे, तर तिला आपल्या जातीतलाच बघ, हा सल्ला नियम व अटी लागू  करून दिला जातो.

 

रवा एका मित्राचा कॉल आला,  ‘अरे आपल्याला अमुक मित्राच्या लग्नाला जायचंय.” 
“अरे, आत्ताच मागच्या महिन्यात झालं ना त्याचं लग्न ..”
“अरे, त्याची बायको पळून गेली.. ’
मी अचंबित झालो. मला क्षणभर कळलंं नाही. पुढच्या क्षणी मी त्याला विचारलं. 
“कस काय रे..?’
“अरे, लग्न झाल्यावर मांडवपरतणीला नवरीला घ्यायला तिच्या आत्याचा मुलगा आला होता. नवरदेवाच्या घरून नवरी गेली तरीही सायंकाळपर्यंत पोहोचली नाही, दोन्ही बाजूंचे घरचे परेशान झाले. मुलगी अजून पोहोचली कशी नाही? नाइलाजाने पोलिसांत तक्रार केल्यावर कळलं की, त्यांनी सारा ऐवज घेऊन पोबारा केलाय.”
“मग कसं रे.. सापडले का नाही ते?’
“सापडले, पण मुलगी त्याच्या बाजूने असल्याने कुणी काही नाही करू शकलं.. ’ माझ्यासमोर त्या मित्राचा केविलवाणा चेहरा आला. किती हौस होती बिचाऱ्याला लग्नाची, पैसे उसने घेऊन दागिने केले. Dj वाले, टेम्पोवाल्यांना त्याला कुठल्या तोंडाने त्याला पैसे मागावेत, हाच प्रश्न पडला असेल. पैशाचं सोडा, पैशाची भरपाई होईलही, पण समाजात जी थू-थू होईल त्याचं काय? खरंच या बाबीने समाजात खूप गंभीर रूप धारण केलेले आहे. आंतरजातीय विवाह, प्रेमविवाह, विवाहबाह्य संबंध या सर्व गोष्टी या बाबीसमोर गौण वाटा‌यला लागतात. त्यातल्या त्यात लग्न झाल्यावर पळून गेली ही खूपच टोकाची भूमिका वाटते. 


आपण सहजपणे बोलून जातो, मुलगी पळून गेली, पण खरंच मुलगी पळून जाते का?  ज्या घरातील मुलगी पळून जाते, ते घर मरणासन्न अवस्थेत पोहोचलेलं असतं. म्हणजे घराची अब्रू-इभ्रतीची राखरांगोळी होऊन जाते. म्हणजे घरातली लक्ष्मी ती,  घराची इभ्रत ती,  दोन्ही घरांची उद्धारक ती, इतकं काही तिच्याशी जुळलेलं असताना या कुठल्याही गोष्टींची पर्वा न करता ती सारं काही सोडून एका परक्या माणसाबरोबर निघून जायला तयार होते, इतकी हिंमत तिला देत कोण? मला वाटते पळून जाणाऱ्या मुलींमागे एक पुरुषी हात असतो. पण त्या भामट्यांवर कुणी कलंक लावत नाही. हे सारं त्या मुलीच्या माथी मारलं जातं. एखाद्या मित्राने पळून जाऊन प्रेमविवाह केला की आम्ही त्याच्या हिमतीला दाद देतो. ‘तेरा प्यार जीत गया” म्हणत त्याला प्रोत्साहित करतो, पण त्याच जागेवर मुलीने खानदानाचं नाव मातीत मिळवलं म्हणून तिला शिव्या हासडतो. मुलींच्या बाबतीत विचार करताना आपली मानसिकताही संकुचित बनते. एखादी मुलगी म्हणतही असेल, माझ्या घरात प्रेमविवाहाला मान्यता आहे, तर तिला आपल्या जातीतलाच बघ, हा सल्ला नियम व अटी लागू केल्यासारखा दिला जातो. मुली नेमकं पळून का जातात याची जर कारणमीमांसा आपण केली तर मोघम चार-पाच कारणं सापडतात. 


एक तर त्यांना व्यक्त होता येत नाही. 
त्यांना निर्णय घेता येत नाही. 
त्यांची बाजू समजून घेतली नाही. 
प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीला त्यांनाच कारणीभूत समजलं जातं.


पळून जाणाऱ्या मुली दबावाखाली जगत असतात. म्हणजे त्यांच्या भावनांचा, अपेक्षांचा कुठेही विचार होत नाही. मुलींना स्वत:चा जोडीदार निवडण्याचा अधिकार कुठाय? आवडी-निवडी कुठे आहेत? एखादीनं हिंमत करून पाऊल त्या दिशेने टाकलं की लगेच तिच्या चारित्र्यावर बोट ठेवलं जातं.  


वास्तविक, मुलगी पळून जाणे ही काही मोठी गोष्ट नाही,  पण त्यानंतर आपला निरुपयोगी समाज त्या कुटुंबाचा जो छळ करतो ना त्या अमानुष वागणुकीमुळे तो परिवार इतका असहाय होऊन जातो, त्यामुळे या गोष्टी जास्त संवेदनशील वाटायला लागतात. म्हणजे जात पंचायतवाले लोक अडाणी असतात,  त्यांच्या अघोरी गोष्टी  आपण समजू शकतो, त्या बदलण्याचा प्रयत्न करू शकतो, शिक्षणाने ते सुधारतीलही, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांचं कसं? आपण त्यांना पाटील, देशमुख, ९६ कुळी म्हणतो ना, त्या सुशिक्षित समाजातदेखील वाळीत टाकण्याची प्रथा अजूनही सुरू आहे आणि याच खोट्या अभिमानापायी  माझ्यासमोर कित्येक माझ्या बहिणी  वैधव्यात आयुष्य  जगत आहेत. आता हे वर्षानुवर्षे चालत आलंय, मला जर घरातला सत्यनारायणाची पोथी बंद नाही करता येऊ शकत तर समाजाची मानसिकता हा खूप खोल विषय आहे. पण ज्या दिवशी आपण सद्सद्विवेक बुद्धीने विचार करायला लागू ना,  ज्या वेळेस आपण स्त्रीला माणूस समजायला लागू ना तेव्हा हे त्या परिवाराला घालून-पाडून वागवण्याचे प्रकार बंद होतील. मुली ही टोकाची भूमिका घेतात याच्यामागे त्यांची घुसमट असते. या घुसमटीचा उद्रेक होऊन अशी काही तरी कृती त्यांच्याकडून घडते. एखादा बेवडा नवरा तिला रात्रंदिवस मारझोड करत असेल तर तिने किती पतीला परमेश्वर मानत आपल्या परिवाराच्या इभ्रतीसाठी आपल्या आयुष्याचा खेळ करून घ्यायचा. आता समाज काय एका दिवसात बदलणार नाहीये, जोपर्यंत आपल्यावर वेळ येणार नाही तोपर्यंत आपणही लोकांना असेच टोमणे मारत राहणार आहोत. म्हणून घरात थोडंसं निर्णय स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळायला पाहिजे. आपले पालक जो निर्णय घेतात त्यातही स्वारस्य घ्या. तुमच्या आवडी-निवडी, अपेक्षा सगळं स्पष्ट करा, तुमचं मन रितं  करा, कारण या  अव्यक्तपणाचे दूरगामी  परिणाम  परिवाराला भोगावे लागतात. तशाच मुलांच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. कुठल्याही मुलीशी लग्न करताना तिचं भावविश्व समजून घेणं गरजेचं आहे. आपली वैचारिक बैठक, आवडी-निवडी, जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा याचं पूर्वावलोकन करावं. मुलगी सुंदर आहे किंवा हुंडा जास्त मिळतोय म्हणून आपले निर्णय बदलू नयेत. ही आयुष्यभर सल राहणारी गोष्ट आहे किंवा तिला समजून घेण्याची वृत्ती अंगी बाळगायला हवी. 


नवी पिढी आणि जुनी पिढी ही तफावत कधी न मिटणारी आहे  आणि त्यामुळे पिढ्यांतलं अंतर ( Generation Gap) आहे,  हे या मतभेदाला कारणीभूत आहे.  पण या प्रवाहाच्या विरुद्ध वागून आपल्याला मिळवायचं काय? या प्रश्नाचं जर क्रांतिकारी उत्तर आपल्याकडे असेल तर हरकत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध लढायलाफक्त बोट 🚣मजबूत असली पाहिजे. कारण पळून जाऊन जरी आपण आपला संसार थाटत असू तरी प्रेम, लग्न आणि संसार या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असे निर्णय घेताना सारासार विचार करणे अत्यावश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...