आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरमित्रांची निजखूण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोकणातल्या खोतांनी वंचित समूहातल्या कातकऱ्यांना, गवळी-धनगर समूहाला निमसरंजामी व्यवस्थेतल्या गुलामांसारखंच आजही पदरी बांधलेलं आहे. त्या ज्वलंत स्फोटक परिस्थितीत  शाळा चालवताना मुलांचे कोणकोणते अनुभव येत गेले,याचा अस्वस्थ करणारा पण तितकाच मनोज्ञ आविष्कार ‘मोरमित्रांची शाळा’ या पुस्तकातून साक्षात झाला आहे. वंचितांच्या घरात, वाडीत म्हणजेच त्यांच्या भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, जैविक पर्यावरणात शाळा आणून  शोषित-वंचितांच्या औपचारिक शिक्षणाची अनौपचारिक वाट कशी मोकळी झाली हे नोंदवणारा हा मूल्यवान असा दस्तऐवज आहे...


शिक्षण क्षेत्रात मी गेली एकोणतीस वर्षे वावरते आहे. नव्हे, जगते आहे त्यात. कधी कधी आयुष्य आपला हात धरून आपल्याला नेत असतं, त्याच्या कक्षेला धरून. कधी आपणच आयुष्याला वळवत असतो कक्षा फोडून. कधी या दोहोंना जोडणारा एक खांब असतो भरभक्कम. माझ्यासंदर्भात तो कायम ‘शिक्षण’ हा राहिला. खरं तर शिक्षण हा फार जड शब्द झाला. ‘शिकणं’ हेच खरं. ते शिकणं मी पीएच.डी.पर्यंतची पदवी जरी मिळवली असली तरी अजिबात थांबलेलं नाही. उलट त्या अभ्यासातून सभोवताल न्याहाळताना, त्यावर विचार करताना अधिक व्यापकतेने पाहायला शिकलेय मी.

 

ठाण्यातल्या ज्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात मी गेली तीन दशकं प्राध्यापकी करते आहे, तिथलं मला सर्वात खेचून घेणारं वेगळेपण म्हणजे आमचा विद्यार्थीवर्ग. बाकीची महाविद्यालयं ऐंशी-नव्वद टक्के मिळवलेल्यांसाठी रेड कार्पेट टाकून स्वागत करायला सज्ज असताना आमच्याकडे एके काळी जेमतेम काठावर उत्तीर्ण झालेली मुलं यायची.

 

विपन्नावस्थेतली, हडकलेली. रोजचा दिवस किती यातायातीचा, परम कष्टाचा जात असेल या मुलामुलींचा, त्यांच्या आईवडिलांचा, याचा जिताजागता पुरावा त्यांच्या डोळ्यांत दिसायचा. पण त्या खातेऱ्यातून बाहेर पडायची आसही दिसायची तीव्र. फार  रसरसून जीव ओतून शिकवायला भाग पाडायची ही मुलं! औपचारिक शिक्षणव्यवस्थेत उभं राहूनच आपल्याला शिकवायचं आहे, हे भान सहसा सुटत नाही माझ्याकडून. पण हे सांगायलाच हवं की, चौकटीच्या आत राहून चौकटीच्या साहाय्याने चौकटीपलीकडे कसं नेता येईल आपल्या विद्यार्थ्यांना, या प्रश्नाने मला पाट्या टाकण्यापासून वाचवलं. मी सतत जिवंत, प्रवाहित राहिले ती त्यांच्यामुळेच. आज माझ्या विद्यार्थी परिवारातली किती तरी मुलं वेगळा विचार करताहेत, अपारंपरिकता ही दृष्टिकोनाला धार आणणारी आणि पारंपरिकतेकडेही वेगळ्या कोनातून पाहायला लावणारी सुंदर गोष्ट आहे, हे त्यांना आकळलं आहे. विशेषतः मुलींमधून उठणाऱ्या ठिणग्या फार आश्वासक वाटताहेत. संघर्ष तर त्यांनाही चुकलेला नाही रोजचा, पण स्वतःसोबतच अवघ्या समष्टीचा अर्थ लावण्याची प्रक्रिया त्यांच्यात घडत जाताना पाहणं हे माझ्यासारख्या शिक्षिकेला अप्रूपाचं आहे!

 

माझ्यातल्या शिक्षकी पेशाला अधिक खुराक मिळाला, जेव्हा माझी "बालभारती'च्या मराठी भाषा समितीवर २०१२ मध्ये निवड झाली. तोवर मी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावरच्या विद्यार्थ्यांनाच शिकवलेलं. साहजिकच अभ्यासक्रम त्या स्तरावरचा. विद्यार्थी कळत्या वयातले. पण मी जेव्हा बालभारतीत लहानग्या मुलांसाठी काम करू लागले तेव्हा इयत्ता पहिलीपासूनच्या मराठीच्या पुस्तकनिर्मितीतले अनेक अडथळे जाणवू लागले. मुळात प्रमाण मराठीतच बालभारतीच्या पुस्तकातले सर्व धडे छापणं हे पटत नव्हतं. महाराष्ट्रातल्या वाड्यावस्त्यांमधून, पाड्याखेड्यांमधून, ग्रामीण, दलित, बहुजन ,कष्टकरी, आदिवासी समूहातून शिक्षण घेणाऱ्या मुलांच्यादृष्टीने प्रमाण मराठी ही हिंदी, इंग्रजीइतकीच परकीय भाषा असते. बाराखडीतली स्वर, व्यंजनं आणि त्यांचं यांत्रिकपणे केलेलं पाठांतर हा सगळा व्यवहारच काहीसा अमूर्त होऊन बसतो त्यांच्यासाठी. त्याऐवजी बोलीभाषेतल्या त्यांच्या अनुभव-आशयाशी जुळणारा मजकूर, गाणी, म्हणी, उखाणे, जंगलझाडीतले, रानावनातले, पशुप्राणीपक्ष्यांचे, निसर्गातल्या हरएक घटितातल्या त्यांच्या सूक्ष्म ज्ञानाला चालना देणारा आणि जवळिकीचं नातं निर्माण करणारा पाठ्यक्रम तयार व्हावा, यासाठी घमासान चर्चा त्या काळात झाल्याचं लख्ख आठवतंय. अभ्यासक्रमातून अशा वंचित घटकातील मुलांना परात्मतेची जाणीव तर होणार नाहीच, शिवाय आधुनिक मूल्यांचा पायाही टिकून राहील, असं काही करता येऊ शकेल का, यासाठी स्वतःलाच उपसून काढण्याचा चांगला बौद्धिक व्यायाम होता, तो.

 

भारतासारख्या खंडप्राय देशातलं प्राथमिक शिक्षण विशेषतः भाषाशिक्षण हे मूळातूनच अत्यंत पेचदायक आहे, आव्हान उभं करणारं आहे. त्यामुळे ते तयार करताना, अभ्यासक्रम आखताना इतकंच नव्हे, तर त्या धड्यांवरची चित्र रेखाटतानाआपल्या जाणिवेत, नेणिवेत जातवर्गधर्मलिंगभेदजन्य ठोकळे  कसे ठाण मांडून बसलेले असतात,याचा रोकडा प्रत्यय तेव्हा  येत गेला. हिंदू स्त्रीचं चित्र काढायचं असेल तर ते साडी- टिकली- मंगळसूत्रासकट काढायचं, शाळेतली मुलं दाखवायची असतील तर ती एकजात गोऱ्या रंगातच चित्रित करायची, मुस्लिम समूहातील व्यक्ती दाढीधारीच असली पाहिजे, आईला नेहमी स्वयंपाकघरात काम करतानाच दाखवायचं, बाबा नेहमी ऑफिसात किंवा घरी असताना पेपर वाचताना दिसले पाहिजेत अशी ही सनातन रचिते! त्याला टाचणी लावायची तर त्याचा भाग होऊन आतूनच ती लावली पाहिजेत किंवा वेगळ्या प्रयोगशील वाटा धुंडाळल्या पाहिजेत हेही खरंच आहे. त्यासाठी देशात ठिकठिकाणी होणाऱ्या प्रायोगिक शाळांची, त्यांच्या शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींची माहिती घेणं आलं. "बालभारती'चं काम तर चार वर्षांपूर्वीच संपलं, पण त्या अनुषंगाने वाचन मात्र सुरूच राहिलं. त्या वाचनप्रवासाला हा एक अलीकडे लागलेला थांबा. स्तंभित करून टाकणारा, खिळवून ठेवणारा.  राजन इंदूलकर यांनी संपादित केलेलं ‘मोरमित्रांची शाळा’ हे पुस्तक नुकतंच माझ्या हाती लागलं. हे पुस्तक म्हणजे, भारतीय राज्यघटनेतील ‘शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या’ १४व्या कलमाचं प्रत्यक्षात काय झालं, त्यात नेमके कोणते अडसर आहेत, त्यातून मार्ग कसा शोधता येईल हे सारं प्रत्यक्ष तळपातळीवर उलगडू पाहणाऱ्या शिक्षकांचं एक जिवंत अनुभवकथन आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेबाहेर राहणाऱ्या शोषित - वंचित समाजघटकातील (गवळी-धनगर, कातकरी-आदिवासी) मुलांच्या शिक्षणाच्या पद्धती आणि शालेय व्यवस्थांचा पुनर्विचार करण्याची प्रेरणा शासनासह समाजाला मिळावी, या हेतूने ‘श्रमिक सहयोग’ ही रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्य करणारी संस्था गेली २३ वर्षे नेटाने प्रयत्न करते आहे. नामवंत शिक्षणतज्ज्ञ दत्ता सावळे यांच्या दूरदृष्टीतून, लोकचळवळीतल्या त्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून, मार्गदर्शनातून ‘श्रमिक सहयोग' या संस्थेचे शिक्षक घडत गेलेले आहेत. शिक्षणाचं क्षेत्र हे फक्त शिक्षणापुरतं मर्यादित राहणारं क्षेत्र नाही, त्याचा संबंध शोषित-वंचितांच्या जगण्याच्या हर एक संदर्भाशी जाऊन भिडतो, हे त्यांच्या कामाचं सूत्र आहे. तळकोकणातल्या चिपळूण, संगमेश्वर, खेड, गुहागर या चार तालुक्यातल्या १०४ प्राथमिक शाळांचं सर्वेक्षण करून जे निष्कर्ष या मंडळींच्या हाती आले,त्यात शोषितपणाचं-वंचितपणाचं जे आदिकारण समोर आलं ते म्हणजे,कुळांचा प्रश्न. हा प्रश्न म्हणजे कोकणातलं मूळ दुखणंच आहे आणि कुळकायद्याचा अंमल झाल्यानंतरही खेड्यापाड्यातली हजारो कुळे त्यापासून बेदखल राहिलेली आहेत.

 

एका अर्थाने तिथल्या खोतांनी वंचित समूहातल्या कातकऱ्यांना, गवळी-धनगर समूहाला निमसरंजामी व्यवस्थेतल्या गुलामांसारखंच आजही पदरी बांधलेलं आहे. कुळ प्रश्न हा तिथल्या कष्टकरी वर्गाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्या ज्वलंत स्फोटक परिस्थितीशी भिडताना, तिथे शाळा चालवताना मुलांचे कोणकोणते अनुभव त्यांना येत गेले,याचा अस्वस्थ करणारा पण तितकाच मनोज्ञ अविष्कार 'मोरमित्रांची शाळा' या पुस्तकातून साक्षात झाला आहे. इंदूलकर यांनी या पुस्तकाची लिहिलेली प्रस्तावना आपल्याला कोकणातल्या जीवघेण्या वास्तवाची वेगवेगळी कॅलिडोस्कोपिक रूपं दाखवतात आणि 'मोर बनण्यापासून आपल्याला कुणीच रोखू शकत नाही' हा टणक आशावादही जागवतात.  या अनुभवकथनातली जी मुलं आहेत, त्यांचं आणि त्यांच्या आईबापांचं जीणं मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या आमच्या कॉलेजात प्रवेश घेऊ पाहणाऱ्या त्या हडकलेल्या मुलांपेक्षाही अत्यंत भीषण आहे. कमालीचे शारीरिक कष्ट, उपासमार, कुपोषण, व्यसनाधीनता, जगण्याची कसलीही शाश्वती नसणं आणि या सगळ्याबाबत संवेदनाहीन, बेपर्वा असलेली शासन -प्रशासन यंत्रणा यांच्या एकत्रित परिणामातून हा एकेकाळचा आदिम गुणी समूह कसा नामशेष, उद्ध्वस्त होत चालला आहे, हे वाचून पोटात खड्डा पडतो आपल्या. सविता भोसले ही शिक्षिका लिहिते, 'मी गरीब खरी, पण असली गरीबी मी पाहिली नव्हती. मुलं भाकरीचे तुकडे चुलीत भाजून खात होती. कुणी उंदीर भाजून खात होतं. कुणी नुसता मिठाचा खडाच चोखत होतं. तर कोणी मुरमाचा खडा बिस्किटासारखं खात होतं. हे सारं पाहून मन उदास झालं. मनात ठरवलं की आपण इथून पळून जायचं नाही. काही करून ही शाळा उभी राहिली पाहिजे. शाळा उभी राहिली तर कातकऱ्यांचं जीवन उभं राहील, कातकरी उभे राहतील तर माझ्याही जीवनाला अर्थ प्राप्त होईल.'  जगण्याचं प्रयोजन गवसलेली सविता शिकत-शिकवत राहते. ढेकण्या, पितलांड्या, सशा, डोकऱ्या अशी मुलांची एकमेकांना हाका घालायची पद्धत समजून घेते. रानात भटकते. शिकारीला त्यांच्यासोबत जाते. आणि प्राण्यांच्या नावावरून या मुलांना अक्षरओळख शिकवणं सोपं होईल,हे उमजून आपल्या शिकवण्याच्या नवनव्या वाटा धुंडाळत राहते. सविताने नोंदलेलं एक निरीक्षण आपल्याला स्तब्ध करून जातं. 'घरात जेवणाचे वाटे करून ठेवलेले असतील, तर (ही मुलं) आपलाच वाटा खातात. भूक असली तरी दुसऱ्यांचा वाटा ते खाणार नाहीत.'

 

सविता भोसले, संतोष खरात, मंगेश मोहिते, सुरेश मोहिते, अरुण पाचांगणे आणि राजन इंदूलकर यांनी या शोषित-वंचितांच्या प्रयोगशील शिक्षणप्रवासातल्या काही मोरखुणा या पुस्तकातील लेखांमधून आपल्यासमोर ठेवल्या आहेत. मुलांना शाळेकडे "नेणाऱ्या' वाटांऐवजी या मुलांकडे - त्यांच्या घरात, वाडीत, पाड्यात, परिसरात म्हणजेच त्यांच्या भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, जैविक पर्यावरणात शाळा आणून या शोषित-वंचितांच्या औपचारिक शिक्षणाची अनौपचारिक वाट कशी मोकळी झाली हे नोंदवणारा हा मूल्यवान असा दस्तऐवज आहे.

 

नामदेव ढसाळांच्या एका कवितेतली "डोळे धुऊन घ्यावं असं पाणीच नाही इथे' ही ओळ खूप रुतून बसली होती मनात, फार पूर्वीपासून. बेचैन करत होती. पण डोळे धुणारं हे स्वच्छ पाणी मला 'मोरमित्रांच्या शाळे'नं दिलेलं आहे. त्यांच्या/माझ्या प्रवासाला माझ्या/त्यांच्या मन:पूर्वक सदिच्छा आहेत... ही निजखूण मनाशी आहेच.

 

बातम्या आणखी आहेत...