Home | Magazine | Rasik | Pradnya Daya Pawar Write Article About Women Freedom

स्वातंत्र्याचं स्वागत वैगरे

प्रज्ञा दया पवार | Update - Aug 04, 2018, 01:34 PM IST

तू एकाच वेळी कुंती, शूर्पनखा, गुस्ताव फ्लोबर्टची मादाम बोव्हरी, हिरकणी, गॉर्कीची मदर, अॅना कॅरेनिना, बिल्किस नि थेरी पटा

 • Pradnya Daya Pawar Write Article About Women Freedom

  तू एकाच वेळी कुंती, शूर्पनखा, गुस्ताव फ्लोबर्टची मादाम बोव्हरी, हिरकणी, गॉर्कीची मदर, अॅना कॅरेनिना, बिल्किस नि थेरी पटाचारा शिवाय बागुलांच्या सूडमधली जानकीही. अशा सगळ्याच प्रचंड स्फोटक बायका राहताहेत तुझ्या एकाच शरीरात, मनात, मेंदूत म्हटल्यावर काय होणार दुसरं?...


  पावसाची रोमँटिक वगैरे प्रतिमा कधीच ठसली नाही माझ्या जाणिवेनेणिवेत. उलट त्याची विक्राळ अशी विध्वंसकताच राहिली आहे मनात घर करून.


  मी जवळपास सीनियर कॉलेजमध्ये जाईपर्यंत आमच्या आईवडिलांनी गोरेगावातल्या सिद्धार्थनगर नावाच्या पत्र्याच्या चाळीत संसार केला. पत्र्याच्याच भिंती. त्यामुळे घरात साधं बोललेलंही शेजारीपाजारी ऐकू जाणार. तिथे कसलं आलंय डोंबलाचं खासगीपण? कुणा एकीला पाळी जरी आली तरी कळायचंच. अगदी कुणी किती वेळ घेतं संडासासाठी हेही. सकाळी टमरेल घेऊन संडासासमोर रांगा लागायच्या. टोपलीचे संडास. त्यात अष्टौप्रहर वळवळणारे किडे. पांढऱ्या जर्द अळ्या. सतत खालून वर येत अंगावर चढणाऱ्या. शेजारी ओशिवरा खाडी. खाडीला लागून ज्ञानेश्वर नगर नावाची मोठी झोपडपट्टी.
  पावसात हे सगळं एकजीव व्हायचं. नरक वगैरे शब्द अथवा तत्सम संकल्पना मी मानत नाही. पण गदळगूघाणगटारनालेखाडी सगळंच घरात शिरायचं. सगळ्यांचेच संसार पाण्याखाली. आईदादांनी मेटाकुटीने जमवलेल्या, पोटाला चिमटा काढून घेतलेल्या चीजवस्तू अक्षरश: डोळ्यांदेखत वाहून जायच्या.


  माझा धाकटा भाऊ प्रशांत हातातल्या लांब काठीने साप आले की, त्यांना लांबवर ढकलत न्यायचा. दर पावसाळ्यात हे अघटित किमान १०-१५ वेळा घडायचं. त्यातच भांडणं, अर्वाच्य शिव्या, मारझोड आणि जगण्यातले अभाव, वंचना. बायांचं कमालीचं क्लेशकारक जगणं मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. अनुभवलंय. भरती ओसरल्यावर आम्ही सगळं घर अक्षरश: धुवून-पुसून स्वच्छ लखलखीत करत असू. सलग आठ-दहा तास खपून खपून.
  आणि रात्री थकूनभागून झोपलेल्या आम्हा सर्वांवर पुन्हापुन्हा तो विक्राळ पाऊस विळखा घालून बसलेला असायचा.
  “अरी भाभी, पानी तो सर तक आ गया... उठ उठ मरना है क्या?”
  आजही माझ्या कानात घुमतात ते आवाज. त्या किंकाळ्या.
  पण ‘जबरी संभोगासारखा पाऊस पडतो’ असं मी जेव्हा कवितेत लिहिते तेव्हा तथाकथित आंबेडकरवाद्यांना मात्र ते अश्लील वाटतं.
  त्या तथाकथित आंबेडकरवाद्यांसाठी पावसाच्या अशाच बेफाम झडीतून कोरडेठक्क वाचवू शकलेले हे काही शब्द... स्वगतच म्हणूया याला हवं तर. फार फार तर स्वातंत्र्याचं स्वगत वगैरे.
  एका लांबलचक बोगद्यातून चालली आहेस तू. बोगद्यातल्या त्या काळोखाला कापत जाताना कुठेतरी लांब दूरवर उजेडाचा कसलाही आकार नसलेला अमिबासारखा तुकडा कधीतरी दिसेल आणि जीव भांड्यात पडेल म्हणून डोळ्यांत प्राण आणून वाट पाहतेयस. चालता चालता अनेक प्रश्न पडतायत तुला. आश्चर्य याचं वाटतंय की, जीवासारखी अनमोल बाबही पडून पडून अखेर भांड्यातच पडावी? पण असो. भांडीही बेहद्द आवडतात तुला. पार मोहेंजोदडोतल्या उत्खननात सापडलेल्या खापराच्या आर्ष गाडग्या-मडक्यापासून ते आईने तुला लग्नात दिलेल्या तांब्या-पितळेच्या हंड्या-कळश्यांपर्यंत. व्हाया आज्जी घोळाची भाजी, मिठवांगं, डाळकांदा, मोठ्याचं मटण करायची त्या तवलीडेचकीपर्यंत. हरकत नाही. जीव भांड्यात पडला तरी काहीच हरकत नाहीये तुझी. मेल्यावर आवडती भांडीच पुरावीत सोबत असं कितीदा तरी वाटून गेलंय तुला. आणि प्रियतम पुरुषाचं निबवाल्या काळ्याश्यार शाईचं सोनेरी पेन. त्याच्या आवेगी प्रणयात चक्क शेप बदलून गेलेलं तुझ्या हातातलं सोन्याचं कडं. आणि पोटच्या मुलाने लहान असताना काढलेलं तुझं चित्र. त्या चित्रात त्याने त्याच्या आईला कविता लिहिताना दाखवलंय. पूर्णपणे बुडालेली त्या संपृक्त अनुभवात. जणू भोवताल मरून पडलाय सगळा आणि जिवंत ठिणगी दिसतेय ती केवळ त्याच्या कोवळ्या डोळ्यांनी पाहिलेल्या त्याच्या आईच्या मुद्रेत.


  ...थांब. थांब. यादी नको वाढवूस बये. तुझ्या आवडीच्या गोष्टी आहेत साडेसत्तावन्न हजार. पुरताना सगळ्याच पुरा म्हणशील हावरटासारख्या. हा जो काळाकभिन्न बोगदा आहे ना तोही आवडतोच की तुला. कधी स्वतःहून चालत गेलीस त्यातून. कधी तुझ्याच प्रियजनांनी लादला तो तुझ्यावर. एका आयुष्यात किमान दहा - पंधरा आयुष्यं जगलीस. अमुक एक आयुष्य चांगलं नि अमुक एक वाईट असं आलंच नाही मनात असं नाही. पण सर्वाधिक टोचलं, जिव्हारी लागलं, रक्तबंबाळ केलं ते आप्तस्वकीयांनी केलेल्या घावांनी. ‘हमें तो अपनों ने लूटा / गैरों में कहाँ दम था / मेरी कश्ती वहां डूबी / जहां पानी कम था'. हे असंच होत असतंय. तू एकाच वेळी कुंती, शूर्पणखा, गुस्ताव फ्लोबर्टची मादाम बोव्हरी, हिरकणी, गॉर्कीची मदर, अॅना कॅरेनिना, बिल्किस नि थेरी पटाचारा शिवाय बागुलांच्या सूडमधली जानकीही. अशा सगळ्याच प्रचंड स्फोटक बायका राहताहेत तुझ्या एकाच शरीरात, मनात, मेंदूत म्हटल्यावर काय होणार दुसरं? वेगवेगळे पिंजरे घेऊन वेगवेगळे चेहरे येतात, ती स्फोटक शक्ती कोंडून ठेवायला नि मोजूनमापून हलके हलकेच बाहेर काढायला. गोष्टीतला दुष्ट जादूगार नाही का, प्राण घेतो काढून आणि एखाद्या पोपटात किंवा अचेतन वस्तूमध्ये ठेवतो गोठवून. तसंच आहे हे. पण तुझ्या आयुष्यातले जादूगार हे काही गोष्टीतल्या जादूगाराइतके दुष्ट नाहीत. उलट प्रेमानेच भरलेले आहेत ओतप्रोत त्यांचे सुदुष्ट चेहरे. प्रेमच करायला लावतं हे सगळं. प्रेमच घेत राहतं परीक्षा. प्रेमच बसवतं पुन्हा पुन्हा एकाच वर्गात. प्रेमच करतं पास किंवा नापास आणि तू तर कायमच नापास!


  नापासांच्या डोळ्यांनी जग बघता येणं हे चांगलंच आहे. ‘नापास मुलांची गोष्ट' हे पुस्तक मग लागतं अभ्यासक्रमाला. पण त्यातली सगळी माणसं ही आधी नापास होऊन मग उत्तुंग वगैरे म्हणतात तसलं यश संपादन केलेली असतात. जे कायमच नापास असतात त्यांच्यावर का नाही निघत एखादं पुस्तक? नाव असलेली, चेहरा असलेली कितीतरी माणसं नापासांच्या गर्दीत एक बनून राहतात. त्यांच्याबद्दल नाहीच आवडत का काही वाचायला कुणाला? म्हणजे जग तद्दन यशस्वी माणसांकडेच बघत असतं का कायम? मान नाही का दुखत अशाने सारख्या टाचा उंचावून उंचावून यशस्वी माणसाकडे पाहिल्याने? मग तुझ्यात का नाही ही असोशी? तद्दन यशस्वीपणाची? यशस्वीपणा दिसतोय रे दिसतोय म्हटलं की काहीतरी भयानक धोका जाणवतो तुला. लगेच काटे पेरले जातात तुझ्या हातून त्या रस्त्यावर. जाणवतो तो सापळा तुला आणि त्यात सापडू नये म्हणून जीवाच्या आकांताने तू केलेला आटापिटा. जगणं परात्म आणि निकृष्ट करण्याची पूर्ण क्षमता राखून असते ही यशस्विता. ही शिरली आत की, सगळं काही कन्सील्ड फिटिंगसारखं होऊन बसतं. कळतच नाही, कुठून कुठवर खेळवत आणला होता विजेचा प्रवाह. खरं तर तो दिसला पाहिजे. उघडावाघडा. नागडा नागडा.
  कुठं जाणार आहेस, रानोमाळ. नागड्या
  डोळ्यांनी नागड्या पायांनी
  धगीत कोणत्या शेकणार आहेस भाकरी.
  आकाराचा थांग हरवलेली
  कशी सोडशील पाखरं. कोंडून कोंडून
  घातलेली तीक्ष्ण चोचींची बाकदार
  बय, तू माझी बय.
  ये इथं. बस जरा घडीभर.
  टाक तुझ्या हाडामासाची कुडी ह्या निद्रिस्त
  भाषेच्या कुडीवर
  बघ. पेटते का ठिणगी
  रानोमाळ
  जाळ जाळ आगजाळ

  हा लांबलचक काळोखाचा बोगदा जर तूच निवडला आहेस तर प्रेम कर त्याच्यावर. जशी करत आलीयस आजवर. बॅटलचा बोगदा नि बोगद्यातलं बॅटल. जे दिसत नाही कुणालाच. जाणवत नाही कुणालाच. पण रोजच लढावं लागतं त्याविरोधात. जातीबाहेर गेलीस म्हणून. स्त्रीची संहिता मोडली म्हणून. साचीव आईपणाला नकार दिला म्हणून. कळपात राहिली नाहीस म्हणून. कुणाचाच टिळा माथ्यावर मिरवला नाही म्हणून. अस्मिताकेंद्री होण्यापासून वाचवलंस स्वतःला म्हणून. या लांबलचक बोगद्यात लालबुंद पेटलेले तप्त निखारे आहेत जागोजागी. तुला यापुढेही दिसणार आहेत ते. ओढून घेणार आहेत तुला आत आत. तुझ्या स्व-प्रेरणेने झेपावणार आहेस तू त्यात. वाचलीस तर राहशील नाही तर संपशील. पण अशीतशी नाही संपणार तू. ठेवशील मागे तुझा सगळा इतिहास अन् भूगोलही. काळ अन् अवकाशही. मग तुला पास अथवा नापास ठरवणारे तथाकथित आंबेडकरवादी ठरवोत काहीही...!


  - प्रज्ञा दया पवार
  pradnyadpawar@yahoo.com

Trending