आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अवस्थेत काय करायचं ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मी टू'च्या अनुषंगाने याच सदरात गेल्या पंधरवड्यात माझा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर मी काहीशी बदलून गेले आहे. हा बदल दोन्ही स्तरांवरचा आहे. माझ्या आतला आणि माझ्या बाहेरचा, मला लगटून असणाऱ्या भोवतालातला. हा भोवताल वेगवेगळ्या तऱ्हांनी आपल्या मनावर अंकुश ठेवत असतो, निर्बंध घालत असतो. तरीही वर्षानुवर्षं मनात दडवून ठेवलेलं सत्य आपण सांगून बसलो आणि आता आपल्याला एकाएकी बरं वाटेनासं झालेलं आहे. एक प्रकारची अस्वस्थता अचानकच आपल्या मनाचा ताबा घेऊन बसलेली आहे. या अस्वस्थतेचं नाव काय, तिचं अचूक शब्दांत वर्णन करता येऊ शकतं का, यात मी अडकून पडले आहे...

 

जगातल्या अनेक घटनांवर भाष्य करणारी मी, माझ्याच आयुष्यातल्या तुलनेने अतिशय लहानशा घटनेने काहीशा संभ्रमात पडले आहे, ते खरं तर ‘मी टू’च्या अनुषंगाने याच सदरात लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांमुळे. मुळात ज्या कवीबद्दल मी लिहिलं त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याचा मृत्यू झाल्यावर तो लेख लिहिल्याने त्याची बाजू मांडण्याचा त्याचा हक्क मी मारला आहे आणि त्याला ‘नैसर्गिक न्याय' वगैरे नाकारून त्याच्यावरच अन्याय केला आहे, अशीही प्रतिक्रिया माझ्या वाचनात आलेली आहे.

 

आजच्या जगात कोणत्याही प्रकारच्या न्यायाबद्दल बोलणं फारच जोखमीचं झालेलं आहे. सध्या आपण न्यायोत्तर काळात जगतो आहोत! त्यामुळे ‘न्याय म्हणजे अन्याय' आणि ‘अन्याय म्हणजे न्याय' असा झुंडशाहीचा प्रयोग आपण चारी बाजूला अनुभवतो आहोत. केरळच्या शबरीमला मंदिरात नुकतंच जे घडलं आहे ते न्याय-अन्यायाच्या पारंपरिक सीमारेषा ओलांडणारं आहे. त्यामुळे माझ्या मनात जी काही अस्वस्थता उभी राहतेय, ती नेमकी कोणत्या भोवतालातून साकारते आहे, हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो.

 

माझी ही अस्वस्थता-चिंता त्या कवीमुळे नाही हे उघडच आहे. चिंता-अस्वस्थता आहे, ती या व्यवस्थात्मक ढाच्याची. ही व्यवस्था तद्दन पुरुषी आहे. पण ती फक्त तेवढीच नाही. तिला जोडून येणारे आनुषंगिकच नव्हे, तर तिच्याशी अंगभूतपणे जोडलेले जात-धर्म-वंश-वर्गादी संरचनात्मक असे किती तरी पदर आहेत. काळ्या-पांढऱ्या अशा दोनच रंगांत जगाची विभागणी करून पाहणारी मी खचितच नाही.


साहजिकच ज्या दिवशी तो लेख छापून आला, त्या रात्री दिवसभरच्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने फेसबुकवर मी जी प्रतिक्रिया नोंदवली ती अशी होती, ‘बाई म्हणून जन्माला आलं की काही नकोशा गोष्टींना केवळ बाई म्हणून सामोरं जावंच लागतं. त्याचा प्रतिकार करावा लागतो. तो करताना कधी कधी अतिरेकी कडवटपणा निर्माण होऊ शकतो. विद्यमान जगात पुरुष असण्याची ‘गोची' कितीही समजून घ्यायची म्हटली, तरी जबरदस्तीचा मामला जस्टिफाय करता येत नाही. सेक्स सहमतीनेच घडतो आणि तसाच घडावा तरच तो समागम या सुंदर संज्ञेपर्यंत जाऊ शकतो, हे ‘नेकेड ट्रूथ’ का समजू शकत नसतील ही अज्ञ माणसं... या प्रश्नाने मला अस्वस्थ व्हायला होतं.


राहता राहिला प्रतिभावंत असण्याचा मुद्दा. तर समता, सहमती, निर्णयाचं स्वातंत्र्य आणि मुख्य म्हणजे, नकाराचा डोळस स्वीकार करण्यातला विवेक या बाबी प्रतिभावंत पुरुषाकडे नसतील तर प्रज्ञेने त्याला फाट्यावरच मारावं. स्त्री-पुरुषातल्या मैत्रभावाचं, प्रेमभावाचं इंगित स्वामित्वभावनेत नाही, दोस्तांनो. बाहेर पडूयात, निदान आता तरी त्या मध्ययुगीन मानसिकतेतून...


आजचा लेख लिहिणं माझ्यासारख्या व्यवस्थेशी कायम दोन हात करणाऱ्या बाईलाही सोपं नव्हतंच. सर्वात धीर दिलाय, तो घरातल्या पुरुषांनीच... पुरुषांबाबत मी माझ्या वयाच्या कुठल्याही टप्प्यावर कधीच कडवट झाले नाही, याचं कारणही माझ्या आयुष्यातले पुरुषच आहेत. वेगवेगळ्या नात्यांनी माझ्याशी जोडलेले.


शेवट एका बाबीने करते. ‘लिहिणारी बाई' असूनही कलात्मक आविष्कार वगैरे न करता मला हे असं लेखातून मांडावंसं वाटलं, कारण वरवर पाहता ते ‘व्यक्तिगत' दिसत असलं तरी फक्त माझ्याबद्दल नव्हतं. कधी कधी चळवळीची गरज म्हणूनही तथाकथित ‘व्यक्तिगत' बाबी उघड्या कराव्या लागतात, मित्रमैत्रिणींनो!’ माझ्या या वरील प्रतिक्रियेला आणि मुख्य म्हणजे, मूळ लेखाला मिळालेला (अजूनही सातत्याने मिळणारा) प्रतिसाद मला ताकद देणारा होता, माझं बळ वाढवणारा होता.

 

विशेषतः पुरुषांकडून (स्नेही, मित्र, हितचिंतक, वाचक, विद्यार्थी, सुहृद इ.) येणारे फोन, ईमेल्स, व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेजेसमधून माझ्यापर्यंत पोहोचणारी ती निव्वळ उपचारादाखल, सांत्वनपर अशी अक्षरे नव्हती, शब्द नव्हते, ओळी नव्हत्या. ‘तुम्ही सांगितलेल्या अनुभवाकडे मी लज्जित होऊन बघत आहे' यापासून ‘तो माझा मित्र होता, याचा खेद वाटतो' अशा टोकदार शब्दांमधून भावना व्यक्त होत होत्या. हे मेसेज पाठवणाऱ्यांमध्ये जाणकार लेखक, कवी, कार्यकर्ते यांचा मोठा वाटा होता. त्यांची मी मनोमन ऋणी आहे. एक मासलेवाईक प्रतिक्रिया इथे देते. सुरेश सावंत यांची. एक सामाजिक - राजकीय कार्यकर्ते म्हणून आपण त्यांना गेली अनेक वर्षे ओळखतो.


प्रज्ञा दया पवार यांनी ‘दिव्य मराठी'त लेख लिहून ‘मी टू'ची आपली वेदना जाहीरपणे मांडली आणि एकेकाळचा आपल्यावर प्रभाव टाकणारा ज्येष्ठ मित्रच आरोपी निघावा याने मी हादरून गेलो. प्रज्ञा पवारांचा लेख जसा शेअर करू लागलो तसे नात्यातल्या सहकारी-मैत्रिणी आपले मनात खूप तळात दडपलेले त्यांचे अनुभव सांगू लागल्यावर हे हादरे विलक्षण तीव्र झाले. वाटले, बापरे! नाही समजू शकत हे माझ्यासारखा पुरुष! म्हणजे मलाही तनुश्री दत्ताने वाचा फोडल्यावर ज्या वेगाने अनेक जणी व्यक्त होऊ लागल्या, तेव्हा त्याची तीव्रता जाणवली नव्हती. पण खरं तर हा हिमनगाचा केवळ बारीक अंश आहे, असे आता जाणवू लागले आहे. सगळ्याच स्त्रिया बोलू लागल्या, तर काय व केवढ्या तीव्रतेचे भूकंप होतील!
...अशा पुरुषजातीशी आपले नाते आहे, याने कसेसेच होऊ लागले आहे.'
सुरेश सावंत यांची ही प्रतिक्रिया खूप आतून आलेली आहे, प्रामाणिक आहे. पण जग फक्त अशा थोडक्या प्रामाणिक माणसांच्या कलाने चालत नसतं.


त्यामुळेच कदाचित माझ्यासारख्या पन्नाशी ओलांडलेल्या, बऱ्यापैकी दुनियादारी पाहिलेल्या शिवाय एक कवयित्री, लेखिका म्हणून सहसा कुठलेच टॅबू न मानणाऱ्या बाईला असं का लिहावंसं वाटलं, याचा विचार हाताच्या बोटांवर मोजणाऱ्यांनीच केल्याचं जाणवत होतं. कथित नैतिक-अनैतिकतेच्या पलीकडेही माणूस असतो, त्याचे मनोशारीर व्यापार असतात, सेक्स ही एकूणच गुंतागुंतीची गोष्ट असते आणि ती सामाजिकतेतच घडत असते, कलावंत म्हणवणाऱ्या माणसात तर त्यासंबंधीचे गुंते अधिक तीव्रतेने वास करत असणार, हे कितीही मानायचं म्हटलं तरी स्वतःला दुसऱ्यावर लादणं, केवळ पुरुष म्हणून जन्माला आलो आहोत म्हणून शारीर ताकदीचा बडेजाव करणं, तिला खिंडीत गाठून शिकारीचं सावज बनवणं हेच मुळात अत्यंत अमानवी आहे, घृणास्पद आहे. ही धग कळण्यासाठी तुम्हाला स्त्री असण्याची गरज नसते.

तुमच्यात जरा जरी संवेदनशीलता असेल, तर तुम्ही हे सहजच जाणून घेऊ शकता. तसाही ‘एम्पथी' हा शब्द आपण येता-जाता उच्चारत असतोच. पण प्रज्ञा तर बोल्ड लेखिका आहे, धाडसी आहे, अमुक आहे, तमुक आहे... मग तिने हे आत्ताच का लिहिलं, तेव्हाच का नाही बोलली, असं गॉसिप करून अथवा लेख प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तो कवी कसा माझा यार होता, हे दाखवण्यासाठी त्याचा फोटो आपल्या फेसबुक वॉलवर डकवून ‘यार, तुझी आठवण येते’ वगैरे समकालीन म्हणवणाऱ्या कथित प्रागतिक कवींनी लिहिणं हे कसल्या मानसिकतेचं लक्षण आहे? मी त्याचा जो अर्थ लावू पाहिला, तो काहीसा असा निघाला, ‘अरे, बघ त्या कवयित्री बाईनं काय लिहिलंय तुझ्याबद्दल. म्हणे तू तिचा जबरदस्तीने किस घेतलास.

तू फक्त तेवढ्यावरच का थांबलास? काय समजत होतो आम्ही तुला? रासवट, मर्द, कलंदर गडी होतास ना तू. असं अधुरं काम करायला नको होतंस. तू असायला हवा होतास. यार तुझी आठवण येतेय.’


माझी बोचरी, जीवघेणी अस्वस्थता जन्म घेते ती यातून! तिला माझा भोवतालही जबाबदार असतो आणि त्या भोवतालात जगावं लागणारी मी स्वतःही. प्रत्येक अत्याचारित व्यक्तीची (यात स्त्री नि पुरुष दोन्ही आले हे गरज नसतानाही आवर्जून सांगून टाकते) ही वेदना आपण समजून घेतली 
पाहिजे. इतकी मानवीयता तर आपल्यात हवीच, असं अधोरेखित करावंसं वाटतं.

 

- प्रज्ञा दया पवार
pradnyadpawar@yahoocom

बातम्या आणखी आहेत...