Home | Magazine | Rasik | pradnya daya pawa's article on sardar vallbhbhai patel Statue

पायरी प्रतिमा एक चि पाषाण

प्रज्ञा दया पवार | Update - Nov 11, 2018, 09:16 AM IST

2019 च्या निवडणुकीचा बिगुल त्यांनी या निमित्ताने वाजवल्याची वदंता आहे.

 • pradnya daya pawa's article on sardar vallbhbhai patel Statue

  प्रतिमा कशा निर्माण होतात, कशा संवर्धित केल्या जातात, त्यामागचा नेमका अजेंडा कोणता याचा विविध पातळीवर सूक्ष्म विचार करुन त्या अनुषंगाने प्रतिमानिर्मितीतून राजकारण पुढे आणलं जातं, कधी लपवलं जातं, पार्श्वभूमीदाखल मांडलं जातं, प्रतिमांतरण केलं जातं अथवा गायबही केलं जातं...

  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची अलीकडे बरीच चर्चेत होती. हा पुतळा जगातला सर्वाधिक उंच पुतळा असावा असा प्रधानसेवकांचा दुर्दम्य निर्धार होता आणि अर्थातच तो त्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करुन अंमलात आणला. २०१९च्या निवडणुकीचा बिगुल त्यांनी या निमित्ताने वाजवल्याची वदंता आहे. महात्मा गांधींना स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसॅडर बनवून आणि जवाहरलाल नेहरूंवर गेल्या साठ वर्षातल्या भारतातल्या यच्चयावत समस्यांचं खापर फोडून सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या उंच खांद्यावरून आपलं लक्ष्य गाठायचा त्यांचा प्रयत्न आहे.

  प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर आखण्यात आलेला पुतळा अनावरणाचा जो कार्यक्रम गुजरातमध्ये पार पडला त्याचे वर्तमानपत्रात, सोशल मीडियात आलेले फोटो पाहताना पटेलांच्या उंचीपर्यंत प्रधानसेवकांना नेऊन ठेवल्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात असल्याचं दिसलं. ते पाहून एका बंगाली नाट्यप्रयोगाच्या संदर्भातला मागे कधी तरी वाचलेला एक तपशील आठवला. त्या नाटकात हिटलरच्या व्यक्तिमत्वाचं एक विशाल छायारूप प्रकाशतंत्राच्या साहाय्याने रंगमंचावर सादर केलं होतं. हिटलरने त्याच्या अत्यंत आक्रमक प्रचारतंत्राच्या साहाय्याने आपली प्रतिमा आहे त्याहूनही कितीतरी पटीने मोठी केलेली होती आणि हेच त्या नाटकातून उभं करायचं होतं. ते ज्या प्रकारे रंगमंचावरुन साक्षात केलं गेलं ते अतिशय वेधक होतं.

  प्रयोगात वर्तमानपत्राचा एक शुभ्र पडदा रंगमंचावर मागे टाकला गेला. त्यावर हिटलरच्या नावाचा प्रचारवजा जाहिराती लिहिल्या गेल्या. आणि रंगमंचावर एका बाजूला उंच चबुतऱ्यावर हिटलरचा एक लहानसा पुतळा ठेवण्यात आला. त्या पुतळ्यावर प्रकाशाचा झोत अशा रीतीने टाकला की, त्या लहान पुतळ्याची वर्तमानपत्राच्या पांढऱ्या शुभ्र पडद्यावर काळ्या रंगाची प्रचंड मोठी छायाप्रतिमा प्रेक्षकांना दिसावी. अत्यंत कल्पक अशा प्रकाशतंत्राच्या साहाय्याने एक अर्थपूर्ण रंगचिन्ह रंगप्रतिमेत बदलून गेलं आणि त्यातून हिटलरच्या व्यक्तिमत्वाचं आणि त्याच्या प्रचारतंत्राचं गमक उघड करण्यात आलं.

  उपरोक्त नाट्यप्रयोगातील ते घटित विद्यमान प्रधानसेवकांबाबतही प्रस्तुत ठरतं. यातून दोन प्रकारच्या प्रतिमानिश्चितीचा अथवा प्रतिमासंवर्धनाचा हेतू दृगोच्चर होताना दिसतो. खरं तर पटेलांचं केवळ निमित्त! पटेलांच्या प्रतिमेचा वापर चार-साडेचार वर्षांत स्वतःच्या घासून घासून अति गुळगुळीत झालेल्या ‘विकासपुरुष’ या प्रतिमेवर इंपोज करण्यासाठीच असावा अशी रास्त शंका येते. भारतातल्या तमाम वंचितांचे, कष्टकऱ्यांचे, दलितांचे, अल्पसंख्यांकांचे, आदिवासी आणि शेतकरी वर्गाचे, विद्यार्थ्यांचे आणि स्त्रियांचे जगण्याच्या रणधुमाळीतले सगळे मूलभूत प्रश्न जणू निकालात निघालेले असावेत आणि हा सुजलाम सुफलाम झालेला देश ‘तुमच्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टीला आमच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी’ने उत्तर देता झाला की, महासत्तावान अमेरिकेला तोंडात बोटं घालणंच भाग पडावं लागेल असा पवित्रा प्रधानसेवकांनी घेतलेला आहे. ज्या गुजरातमध्ये हा ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ उभारला गेला तिथे केवळ एक महिन्यापूर्वी अन्य राज्यातील भारतीयांवर (उत्तर प्रदेश आणि बिहार ही भारतीय राज्ये आहेत) दडपशाही करून, हल्ले चढवून गुजरात राज्य सोडून जाण्यास बाध्य केलं गेलं होतं हे आपण कसं विसरू शकतो? तसंही उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो नाही तर राजस्थान, या सर्व भाजपशासित राज्यांमधून गेल्या चार वर्षात एका बाजूला पोलीस यंत्रणेकडून कायद्याचा बडगा दाखवून तर दुसऱ्या बाजूला बेफाम झुंडींकडून कायद्याला धाब्यावर बसवून दलित-वंचित-अल्पसंख्यांक समूहांना (हेही सगळे भारतीयच) असुरक्षित करण्याची, सळो की पळो करून सोडण्याची आणि प्रसंगी थेट होत्याचं नव्हतं करण्याची नियोजनबद्ध पावलं टाकली जात आहेत. आणि आता पुतळ्याद्वारे म्हणे, हे करत आहेत एकतेचा पुरस्कार!


  अर्थातच या सगळ्यात एक प्रकारचं राजकारण आहे. प्रतिमा कशा निर्माण होतात, कशा संवर्धित केल्या जातात, त्यामागचा नेमका अजेंडा कोणता याचा विविध पातळीवर सूक्ष्म विचार करुन त्या अनुषंगाने प्रतिमानिर्मितीतून राजकारण पुढे आणलं जातं, कधी लपवलं जातं, पार्श्वभूमीदाखल मांडलं जातं, प्रतिमांतरण केलं जातं अथवा गायबही केलं जातं.


  आपल्या एकसाची, एकजिनसी नसलेल्या संस्कृतीतल्या अनेक प्रतिमांचा व्यवहार पाहू गेल्यास हे प्रतिमानिर्मितीचं चलाख राजकारण जाणवतं. अगदी रामायण-महाभारतापर्यंत जरी जायचं म्हटलं तरी राम-रावणाची दृश्य पातळीवरील प्रतिमा आणि सीता-शूर्पणखेची प्रतिमा यांच्याकडे पाहिलं तर वस्तुतः मुळातला आर्य-द्रविडांमधला सांस्कृतिक संघर्ष प्रतिमेच्या दृश्यरुपांमधून सूर-असुरांच्या झगड्यात कसा स्थिर करण्यात आला हे सहज लक्षात येतं. रामाला मदत करणारे तत्कालिन लढाऊ समूह नंतर वानरं, माकडं या प्रजातीत गोठवून त्यांच्या वीरतेला, शौर्याला ‘सेवा आणि भक्तीच्या’ कोंदणात कसं पद्धतशीर बसवण्यात आलं याचे अनेक दाखले अभ्यासकांनी दिले आहेत. भक्तीची प्रचीती देताना हनुमानाने स्वतःच्या हाताने फाडलेल्या त्याच्या छातीत राम-सीतेची विराजमान झालेली प्रतिमा आपण पिढ्यानपिढ्या पाहात आलेलो आहोत. केवळ बालवाङ्मयातूनच नव्हे तर आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकांमधूनही प्रतिमानिर्मितीच्या सांस्कृतिक राजकारणाला वैधता देण्यात आलेली आहे.

  ‘शिक्षणाचं भगवेकरण’ ही तर तशी अलीकडची गोष्ट पण त्याआधीपासूनच आपल्या व्यवस्थेतल्या सर्वच स्तरांमध्ये हा अभिजनवादी, प्रस्थापित, उतरंडप्रधान तोंडवळा असलेला ढाचा ठासून भरलेला आहे आणि अलीकडच्या, विशेष करुन २०१४पासून त्यासंबंधीच्या कुठल्याही प्रतिमानांना अतीतीव्र उमाळे फुटताना आपण प्रत्यही बघत आलेलो आहोत. वस्तुतः केवळ वर्तमानकाळाचंच नव्हे तर गतकाळाचंही प्रतिमावाचन आपण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या अंगाने करू लागलो की, आपल्याला शह- काटशहाचं राजकारण स्वच्छपणे दिसू लागतं. वितंडेचे कितीतरी पदर दिसू लागतात. प्रतिमेत वस्तुस्थिती आहे की वस्तुस्थितीचा भास आहे, वास्तव आहे की वास्तवाचा आभास आहे, तिला प्रवाहीपण दिलं गेलं आहे की अपरिवर्तनीय राखलं गेलं आहे, ती दृश्यात्मकता नेमकी कशी आहे- संदर्भरहित की संदर्भांनी ओतप्रोत असलेली, हे प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि आपण ते वारंवार विचारायला हवेत. प्रतिमावाचनासंबंधीचे हे प्रश्नही जग समजून घेण्याचे, ते तसे का आहेत हे जाणण्याचे आणि अर्थातच जगाचा अर्थ लावण्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत.


  निक यूटची व्हिएतनाम युद्धावरची ‘नापाम गर्ल’ ही प्रतिमा, केविन कार्टरची सुदानच्या जमिनीवरुन खुरडत खुरडत सरकणाऱ्या, कुपोषणामुळे जणू शरीराचे अवयवच नष्ट झालेली - पाठपोट एकच झालेली - हाडांना कातडी चिकटलेली - केवळ धुगधुगी उरलेल्या मुलीची आणि ती ज्याचं खाद्य आहे त्या गिधाडाची प्रतिमा, गुजरात दंगलीत होरपळून निघालेल्या आणि समोरच्या हिंस्र जमावासमोर आपल्या प्राणांची याचना करणारी, टाहो फोडणारी कुतुबुद्दीन अन्सारीची प्रतिमा, स्थलांतरितांचं दुःख ज्या एका प्रतिमेतून अवघ्या जगासमोर अधोरेखित झालं ती समुद्रात बुडुन मेलेल्या आणि वाहात वाहात किनाऱ्याला लागलेल्या चिमुरड्या अॅलन कुर्दीच्या पालथ्या शवाची प्रतिमा, ‘टायरचा कचरा’ ही एडवर्ड बर्टिन्स्की यांची औद्योगिकीकरणाच्या भयाण वस्तुस्थितीची, निसर्गाच्या नृशंस संहाराची, ऱ्हासाची प्रतिमा - या आणि अशा कितीतरी प्रतिमा जगाचं अर्थनिर्णयन करणाऱ्या ताकदीच्या प्रतिमा आहेत. त्यात काळ आणि अवकाश आहे. इतिहास आणि भूगोल आहे. त्यात हिंसेची, यातनेची अनंत रुपे आहेत आणि त्याचं दस्तावेजीकरण आहे. अर्थात या प्रतिमाही राजकीयच आहेत! पण ते मुक्तीचं राजकारण आहे. पृथ्वी आणि त्यावर वसणाऱ्या व्यक्ती-समष्टी-सृष्टीच्या एकमय नात्याला तीव्रतेने वाचवू पाहणारं राजकारण आहे. ते आपण प्रार्थनेइतक्या आर्तपणे अंगभूत करणं अनिवार्य आहे.


  बाकी राहिला प्रश्न सरदार पटेल यांच्या पुतळ्यातून मोदी जे काही साध्य करू पाहात आहेत त्याबद्दलचा. पण ते खरंच सर्वस्वी त्यांच्या हातात आहे? मला त्याची खासी शंका आहे. तसं असतं तर पुतळ्यांचं राजकारण करणाऱ्या सुश्री बहेन मायावतींच्या उत्तर प्रदेशाचा वर्तमान आज काही निराळाच दिसला असता. माझा कविमित्र असलेल्या अरुणने (म्हात्रे) विद्यमान पुतळ्यातील पटेलांना उद्देशून म्हटलंय,
  सरदार वल्लभभाई ...
  कुठूनही पहा, कसेही पहा ...
  विकासाचा मागमूस नाही,
  आणि बदललेल्या इतिहासाचे उपरणे तुमच्या खांद्यावर इतके उंच
  की कोणी त्याला हात लावू शकणार नाही...


  विकासाचा ‘व’देखील पाहू न शकणाऱ्या सामान्य भारतीयांच्या मनातल्या व्यथेलाच अरुणने इथे वाट मोकळी करून दिलेली आहे. तेव्हा प्रधानसेवकांना असं सांगावसं वाटतं की, प्रतिकं-प्रतिमांचा खेळ हा कधीच एकतर्फी खेळता येत नसतो. खोट्याच्या प्रचारासाठी फोटोशॉप नि आयटीचा पुरेपूर वापर करणाऱ्या प्रधानसेवकांच्या ‘माहितीकारणा’चा विरोधकही जवळपास तेवढ्याच ताकदीने वापर करू शकतात असं दिसलं तेव्हा सत्ताधाऱ्यांची पाचावर धारण बसल्याचं आणि ते ‘फेक न्यूज’, ‘फेक न्यूज’ असं अरण्यरुदन करू लागल्याचं आपण पाहिलं आहे. ‘पायरी प्रतिमा एक चि पाषाण / परि तें महिमान वेगळालें’ या संतकवी तुकारामांच्या सर्वसाक्षी ओळीचं स्मरण आपल्याला कायमच ठेवावं लागेल.

  - प्रज्ञा दया पवार

  pradnyadpawar@yahoo.com

 • pradnya daya pawa's article on sardar vallbhbhai patel Statue
 • pradnya daya pawa's article on sardar vallbhbhai patel Statue

Trending