आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा वर्षांच्या प्रज्ञाची सायकलस्वारी; १९ तासांत निगडी ते पंढरपूर २५० किमी अंतर पार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - अवघ्या पंधरा वर्षांच्या प्रज्ञाने फिटनेसचा संदेश देण्यासाठी एका दिवसात तब्बल अडीचशे किलोमीटरचा पल्ला पार करून साऱ्यांचे सक्ष वेधून घेणारी कामगिरी केली आहे. सायकलवरून पंढरीची वारी करण्यासाठी प्रज्ञा दिवसातले एकोणीस तास सायकल चालवत होती. प्रज्ञाच्या या आधुनिक वारीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असले, तरी प्रज्ञाचे लक्ष्य निराळे आहे. तिला उत्कृष्ट कुस्ती पटू व्हायचे आहे आणि धाडसी क्रीडाप्रकारांत रस असणाऱ्या प्रज्ञाला सर्वोच्च उंचीचे एव्हरेस्टही खुणावते आहे. 


‘स्टे फिट, कीप मेडिसीन अवे’ हा संदेश मला द्यायचा होता. त्यासाठी मला प्रेरणा मिळाली, ती सायकलवरून जगाला प्रदक्षिणा घालणाऱ्या वेदांती कुलकर्णी यांच्याकडून..असे सांगून प्रज्ञा म्हणाली,‘२९ जूनला पहाटे साडेचार वाजता मी आणि माझे बाबा, संदीप सावंत, आम्ही निगडी येथून वारीला प्रारंभ केला आणि रात्री अकरा वाजता आम्ही पंढरपूरला पोहाेचलो. सलग एकोणीस तास आम्ही सायकलिंग केले. वाटेत चढ, उतार, खड्डे, डबकी अशा अडचणी तर होत्याच, पण पाऊसही जोरात होता. त्यामुळे वेगावरही अनेक मर्यादा येत होत्या. अधिक शक्ती खर्चून सायकलिंग करावे लागत होते. पण निश्चय ठाम असल्याने ही वारी पूर्ण करू शकले, याचा आनंद आहे,”


प्रज्ञाच्या घरात वारीची परंपरा आहे. आम्ही कुटुंबीयांनी वारी केली आहे, असे प्रज्ञाच्या आई वनिता सावंत यांनी सांगितले. वनिता या शिक्षिका आहेत. स्वत: खेळाडू आहेत. तसेच प्रज्ञाचे वडील संदीप हेही क्रीडाप्रेमी आहेत. त्यामुळे प्रज्ञाच्या क्रीडा स्वप्नांना साकारण्यासाठी तेही प्रयत्नशील आहेत. दरम्यान, प्रज्ञाच्या या अनोख्या वारीचे अनेकांनी कौतुक करून तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 

प्रज्ञाला कुस्तीपटू होऊन देशासाठी पदक मिळवायचंय 
दहावीत प्रवेश केलेल्या प्रज्ञाचे स्वप्न अव्वल दर्जाची कुस्ती पटू होण्याचे आहे. ६० किलो वजनी गटात तिला थेट ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे आणि अर्थातच देशासाठी पदकाची कमाई करणे, हे ध्येय आहे. त्यादृष्टीने तिचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय साहसी क्रीडाप्रकारांत रस असणाऱ्या प्रज्ञाला जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पाऊल ठेवायचे आहे. निरडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेची विद्यार्थिनी असणाऱ्या प्रज्ञाकडून शाळेसह सगळ्यांनाच अपेक्षा आहेत.