आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाचं चलचित्र माध्यम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही शाळा कोणत्या मोठ्या शहरात नाही, तर सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तालुक्यातल्या एका गावात भरते. शाळेत काम करणाऱ्या सुप्रिया शिवगुंडे यांनी स्काइप लेसन वा शिक्षणासाठी आकर्षक अशा साहित्याची निर्मिती करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमाविषयी त्या सांगतात, सुरुवातीला माळशिरस तालुक्यातील कुरबावी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिक्षका म्हणून रुजू झाले. त्या ठिकाणी जाणवले की, तेथील शाळेमध्ये उत्साहपूर्ण असे वातावरण नव्हते. मुले शाळेत येत नव्हती. पालकही मुलांना शाळेत जा असे सांगत नव्हते. शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांकडूनही मुलांची म्हणावी तितकी दखल घेतली जात नव्हती. हे लक्षात आल्यानंतर मी स्वत: मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना भेटू लागले. मुलांच्या शाळेबद्दल बोलू लागले. 


या कालावधीत माझ्याबरोबरच्या शिक्षक सहकाऱ्यांच्या मदतीने शाळेत न येणाऱ्या मुलांना मी शाळेत येण्यासाठी प्रेरित केले. हळूहळू ती शाळेत येऊ लागली. मात्र, मुलांमध्ये शैक्षणिक वर्षात हवे तसे बदल होत नव्हते. त्यासाठी मुलांच्या कलाने घेत त्यांना वाचनाची गोडी लावणे आवशयक होते. त्यासाठी विविध उपक्रम, प्रकल्प वर्गामध्ये राबवू लागले. केवळ सरधोपट पद्धतीने न शिकवता वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला. यातून मुलांची आणि माझी चांगली मैत्री होण्यास मदत झाली. उपक्रमानांही चांगला प्रतिसाद मिळू लागला. मुले पाठ करत असलेल्या कविता, कथांचे छोटे-छोटे व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली. त्याच कालावधीत तालुका स्तरावरील केंद्र, शाळेतील सहकारी व्हॉट्सअॅप ग्रुपवर हे छोटेछोटे व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली. मुलांच्या उपक्रमातील सहभागाबाबत त्यांचे कौतुक होऊ लागले. त्याच वेळी पालक सभा बोलवून पालकांकडून मुलांविषयी जाणून घेतले. त्यामध्ये अनेक पालकांनी मुलांना आवडत असलेल्या गोष्टी, त्यांचे आवडते विषय याविषयी सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलांच्यात बदल करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हे लक्षात आले.


पालक सभेनंतर सुप्रिया यांनी शिक्षक-पालकांचादेखील एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. “त्याच्या माध्यमातून मुलं करत असलेल्या विविध अॅक्टिव्हिटीज त्यांना या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून पाठवू लागलो. त्यामुळे आपला मुलगा/मुलगी शाळेत नेमके काय करतोय, याची माहिती पालकांना मिळू लागली. जिल्हा परिषदेच्या शाळेविषयी असलेले नकारात्मक मत बदलण्यास  मदत झाली. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दिल्या जात असलेल्या शिक्षणाचा मोठा प्रभाव मुलांवर पडत होता. मुलं शिकण्यास उत्साह दाखवू लागली. घड्याळ वाचन, कवितांचे पाठांतर याविषयी मुलं स्वत:हून आमचं व्हिडिओ शूटिंग कधी करणार, याची विचारणा करू लागली. त्यांना आवडणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टी माझ्याबरोबर शेअर करू लागली. व्हिडिओमध्ये आपण बोलताना दिसतो, याचे त्यांना अप्रूप वाटे. १६ एमबीपेक्षा मोठा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवरून जात नसल्यामुळे मग माझ्या नावाने यूट्यूब अकाउंट तयार केले. त्यावर तयार केलेले व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. त्यालाही विद्यार्थी, पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.”


मायक्रोसॉफ्टने घेतली कामाची दखल
मायक्रोसॉफ्ट एज्युकेशन.कॉम अंतर्गत जगभरातील एज्युकेशन एक्स्पर्टची दखल घेतली जाते. यामध्ये सुप्रिया यांच्या कामाची दखल घेत ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेशन एज्युकेशन एक्स्पर्ट’चा पहिला पुरस्कार हा आकर्षक साहित्यनिर्मितीसाठी २०१७-१८ व २०१८-१९ला सलग दुसऱ्यांदा स्काइप लेसनसाठी हा पुरस्कार मिळाला. स्काइप लेसनच्या माध्यमातून सुप्रिया जगभरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी वा शिक्षकांशी संवाद साधत असतात. याशिवाय पोर्तुगाल, आयर्लंड, स्पेन, बांगलादेशामधील मुलांना स्काइप लेसनच्या माध्यमातून शिक्षण दिले आहे. 


कुटुंबाकडून मिळाला शिक्षणाचा वारसा
माळशिरस तालुक्यातील शिवपुरी हे सुप्रिया यांचे गाव. घरात आई-वडील, पाच बहिणी आणि एक भाऊ अाहेत. सगळ्यात लहान असलेल्या सुप्रिया यांना  अभियांत्रिकी शिक्षणात रस होता. ‘मात्र आपल्याला हवे असणारे सगळ्यात चांगले बदल हे तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून घडवू शकता,’ या वडिलांनी सांगितलेल्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले करिअर करण्याचे करण्याचे ठरवले. आज केवळ त्याच रुळलेल्या वाटेनं न शिकवता वेगळ्या क्रिएटिव्ह पद्धतीचा वापर करून तुम्ही जगाशी जोडले जाऊ शकता हे 
त्यांनी दाखवून दिले आहे. उपलब्ध साधनसामग्रीमध्येही किती चांगल्या प्रकारे शिक्षण देता येते हे सुप्रिया यांच्या कामातून दिसून येते.
प्राजक्ता ढेकळे, पुणे
prajaktadhekale1@gmail.com

बातम्या आणखी आहेत...