Home | Maharashtra | Mumbai | Prakash Ambedkar's notice to the Election Commission

आयाेगाने मतमोजणी विसंगतीबाबत १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार : आंबेडकरांचा निवडणूक आयोगाला इशारा

विशेष प्रतिनिधी, | Update - Jun 09, 2019, 10:47 AM IST

मतमोजणीमध्ये आढळून आलेल्या तफावतीबद्दल जनतेने स्वतः निर्णय घेणे अपेक्षित

 • Prakash Ambedkar's notice to the Election Commission

  मुंबई - राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांमध्ये एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये तफावत आढळून येत असून २४ मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा कमी आहे. उर्वरित २४ मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या, मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा जास्त आहे. निवडणूक आयोगाने या तफावतीचे १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण द्यावे. पुराव्यासाठी सोबत वेबसाइटवरील निकालाचे स्क्रीन शॉट दिले आहेत. आयोगाने याचे स्पष्टीकरण न दिल्यास, वंचित बहुजन आघाडी याविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरू करेल, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगितले.
  मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले, एक-दोन ठिकाणांचे मोजके अपवाद वगळता यापूर्वी कोणत्याही निवडणुकीमध्ये अशा प्रकारे सर्व मतदारसंघांमध्ये अशा प्रकारची तफावत आलेली नाही. म्हणूनच आम्ही देशभरातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो की, त्यांनीदेखील त्यांच्या राज्यांमध्ये मतदान मोजणीसंदर्भात अशा प्रकारे तपासणी करावी. या तपासणीत त्यांना कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आल्यास त्यांनी सर्वप्रथम यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करावी. निवडणूक प्रक्रियेत बेकायदेशीर अवलंब झाला असेल तर न्यायालयालाच त्या निवडणुका रद्द करण्याचा अधिकार आहे. यासाठी लोक प्रतिनिधी कायद्याचादेखील आधार घेता येईल.


  वंचित आघाडी भूमिका निश्चितच घेईल
  वंचित बहुजन आघाडीदेखील राज्याबाहेर ज्या ठिकाणी अशा प्रकारे मतांच्या संख्येमध्ये तफावत आढळेल, तेथे योग्य ती भूमिका निश्चितपणे घेईल. या अनागोंदीमधील संपूर्ण सत्य लोकांसमोर, मतदारांसमोर मांडून त्यांना जागृत करण्याची आमची भूमिका आहे, जेणेकरून ते स्वतः ईव्हीएमबद्दल निर्णय घेतील. लोकांचे मत अशा प्रकारे ईव्हीएमच्या माध्यमातून दाबले जाणार असेल तर, यामुळे स्थापन झालेले सरकार सुद्धा बेकायदेशीरच ठरते. निवडणूक आयोगाकडून जर आकड्यांमधील तफावत पाठीशी घालण्याची भूमिका घेतली जाणार असेल तर मात्र हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होते असेही त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

  तफावतीचे कारण काय ?
  प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतांच्या संख्येमध्ये तफावत येण्याचे नेमके कारण काय असे स्पष्टीकरण आम्ही भारतीय निवडणूक आयोगाकडे मागत आहोत. विद्यमान सरकार या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाही तसेच त्यांचे स्वतःचे हितसंबंध जपले जातील अशी भूमिका सुद्धा घेणार नाही. निवडणूक आयोग एक स्वतंत्र, संवैधानिक आणि स्वायत्त संस्था आहे.

  जनतेने निर्णय घेण्याची वेळ आली
  मतमोजणीमध्ये आढळून आलेल्या तफावतीबद्दल त्यांनी स्वतः निर्णय घेणे अपेक्षित आहे. ते स्वतःच निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करू शकतात किंवा आयोगाने न्यायालयात सादर केलेल्या ऍफिडेव्हिटमधील, ईव्हीएमची छेडछाड करता येत नाही आणि त्यात हस्तक्षेप केला जाऊ शकत नसल्याचा दावा हा या निवडणुकीने खोटा असल्याचे सिद्ध केल्याचे, न्यायालयात मान्य करण्याचा पर्याय सुद्धा त्यांना आहे. आणि भारतीय निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणुका घेण्याची परवानगी सुद्धा मागितली पाहिजे, जेणेकरून लोकांना पारदर्शक मतदान प्रक्रियेत सहभाग घेता येईल आणि त्यांच्या मतांचा आदर राखला जाईल. पुन्हा ईव्हीएम कडे जायचे आहे कि बॅलेट पेपर कडे मतदानाकडे परत जायचे की नाही याचा निर्णय आत्ता जनतेनेच घेण्याची वेळ आली आहे असेही ते यावेळी म्हणाले.

Trending