गेमचेंजर / प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ९ मतदारसंघांत थेट दुसऱ्या स्थानी, काँग्रेस-राष्ट्रवादीला २५ जागी फटका


वंचितनेच भाजप-सेना युतीला बहुमतापर्यंत नेऊन सोडले...

प्रतिनिधी

Oct 26,2019 07:40:00 AM IST

मुंबई- लोकसभा निवडणुकीत ४१ लाख मते घेणाऱ्या वंचित आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. तसाच विधानसभा निवडणुकीतही बसला. वंचितने लढवलेल्या २३४ पैकी २५ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार अत्यंत कमी मतांनी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असले तरी २५ जागांवर या आघाडीचे उमेदवार तीन ते दहा हजारांच्या फरकाने पराभूत झाले आहेत.


अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने विधानसभेच्या २३४ जागा स्वबावर लढवल्या. २३ ठिकाणी समविचारी पक्षांना पाठिंबा दिला होता. त्यातील ५० जागी वंचितने चांगली मते घेतली. वंचितची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी असती तर आघाडीला सव्वाशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या. त्यामुळे सेना, भाजपचा वारू १४५ जागांवर म्हणजे काठावर रोखता आला असता, हे आता निकालाच्या आकडेवारीने स्पष्ट झाले आहे. या प्रकारे एकही जागा जिंकता आली नसली तरी वंचितने १४ व्या विधानसभेच्या निवडणुकीत गेमचेंजरची भूमिका पार पाडली आहे.


आंबेडकर यांचा निर्धार

वंचित आघाडीने विधानसभा निवडणुकीत चांगली लढत दिली. २४ लाखांपेक्षा जास्त मते मिळवली. एकही जागा जिंकू शकलो नाही, तरी १० ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. आम्ही संघर्षातून उभे राहिलो. वंचित,शोषितांच्या राजकारणासाठी यापुढेही त्याच ताकदीने लढू, असा निर्धार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर व्यक्त केला.

महायुती (१६१-२५=१३६)

काँग्रेस -राष्ट्रवादीचे २५ उमेदवार दुसऱ्या स्थानी आहेत. तेथे सेना-भाजपचे उमेदवार ज्या मताधिक्याच्या जिंकले त्यापेक्षा अधिक मते वंचितच्या उमेदवारांनी घेतली आहेत. सध्या महायुतीचा आकडा १६१ आहे, वंचित मैदानात नसती तर आकडा १३६ असता.

महाआघाडी (१०२+२५=१२७) सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १०२ जागा आहेत. वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला २५ ठिकाणी फटका दिला नसता तर आघाडी १२७ च्या आसपास असती. परिणामी आघाडी व युती दोघांनाही सरकार स्थापण्यासाठी अपक्षांवर अवलंबून राहावे लागले असते.


२५ जागी महायुती वंचितमुळे जिंकली

चाळीसगाव, दौंड, गेवराई, जिंतूर, खडकवासला, माळशिरस, उस्मानाबाद, तुळजापूर, पैठण, चेंबूर, यवतमाळ, अकोला पश्चिम, अर्णी, बल्लारशा, चिमूर, धामणगाव रेल्वे, खामगाव, नागपूर दक्षिण, नांदेड दक्षिण, राळेगाव, शिवाजीनगर, उल्हासनगर, चांदिवली,
पुणे कँटोनमेंट येथे वंचितमुळे महायुतीचा विजय.

९ जागी वंचित दुसऱ्या स्थानी

१. अकोला पूर्व, २. अकोट, ३. बाळापूर, ४. कळमनुरी, ५. लोहा, ६. मूर्तिजापूर, ७. सोलापूर शहर उत्तर, ८. वाशिम, ९. बुलडाणा.

X
COMMENT