आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रज, काँग्रेसप्रमाणेच भाजप सरकारही जनतेस मूर्ख बनवतेय, पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या बंधूंची सरकारवर टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - 'अाधी इंग्रजांचे, नंतर काँग्रेसचे व आताचे सरकार हे जनतेला मूर्ख बनवू इच्छितेय. पैसे देऊन लोकांना मारण्याचा धंदा करीत आहे. जनतेचे कंबरडे मोडून देशाचा विकास झाल्याचे दाखवत अाहे. राज्यातील जनतेचा आक्रोश लक्षात घेतला तर फडणवीसांना सरकार चालवणे कठीण होईल,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू तथा ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. 

जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोदींच्या नेतृृत्वात डीबीटीविरोधात रेशनकार्डधारक व दुकानदारांचा मोर्चा निघाला. तत्पूर्वी सभेत मोदी म्हणाले, 'कुत्रा व मांजरीचे कधीच पटत नाही. त्याचप्रमाणे रेशन दुकानदार व कार्डधारकांचे कधीच पटत नव्हते; परंतु या मोर्चाने ही बाब चुकीची ठरवली. भावाला विरोध करण्यासाठी येथे आलो, हे चुकीचे आहे. मी एक रेशन दुकानदार असून अहमदाबाद येथे माझे रेशन दुकान आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

रेशनचे धान्य बंद केल्यास देशात भूकबळी वाढतील 
स्वस्त धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने बायोमेट्रिक पद्धती अवलंबली. मात्र त्यात जनतेचे कोट्यवधी रुपये वाया घालवले. सरकारला गरिबांना त्रास द्यावयाचा आहे. पैशाने नव्हे तर धान्याने लोक जगणार आहेत. रेशनवरचे धान्य बंद केल्यास देशात भूकबळी वाढतील. एकेकाळी रांगेत उभे राहून ऑस्ट्रेलियन लाल गहू व ज्वारी मीसुद्धा खाल्ली. लोकांना धान्यच हवे; परंतु सरकार त्यांना पैसे देऊन मारण्याचे काम करीत आहे, असा अाराेप माेदींनी केला. देशातील रेशन दुकानदारांना ५ हजार रुपये मानधन देण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली. 

 

बातम्या आणखी आहेत...